नवीन एसडीओ कार्यालयांना पूर्णवेळ पुरवठा निरीक्षकच नाही
By Admin | Updated: December 20, 2014 22:47 IST2014-12-20T22:47:06+5:302014-12-20T22:47:06+5:30
दोन तालुके मिळून एक याप्रमाणे राज्यात अनेक ठिकाणी १५ आॅगस्ट २०१३ रोजी नवे उपविभागीय कार्यालये सुरू झाली. १६ महिन्यात एक-एक करता विविध पदे भरण्यात आली. आवश्यक त्या यंत्रणा,

नवीन एसडीओ कार्यालयांना पूर्णवेळ पुरवठा निरीक्षकच नाही
राळेगाव : दोन तालुके मिळून एक याप्रमाणे राज्यात अनेक ठिकाणी १५ आॅगस्ट २०१३ रोजी नवे उपविभागीय कार्यालये सुरू झाली. १६ महिन्यात एक-एक करता विविध पदे भरण्यात आली. आवश्यक त्या यंत्रणा, सुविधा या ठिकाणी उपलब्ध झाल्या. परंतु उपविभागीय स्तरावर नायब तहसीलदार दर्जाचे पुरवठा निरिक्षण अधिकारी (आयओ) या पदाचा पदभार कनिष्ठ तालुका पुरवठा निरीक्षकाकडे सोपविण्यात आला आहे.
उपविभागस्तरावर पुरवठा निरीक्षक अधिकारी हे अत्यंत महत्त्वाचे पद आहे. पुरवठ्यासंदर्भात विविध कर्तव्य आणि जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी या पदाची निर्मिती करण्यात आली. शासनाकडून येणाऱ्या विविध प्रकारच्या रेशन साहित्याची तपासणी, वाटपाचे नियोजन, नियंत्रण, रेशन दुकानांची आणि केरोसीन दुकानांची तपासणी आदी कामे त्यांच्याकडून केली जात आहे. गैरप्रकार आढळल्यास तसा अहवाल वरिष्ठांकडे सादर करून त्यावर पुढील कारवाईसाठी प्रकरणे पाठविली जाते.
गॅस सेवा, पेट्रोल पंपावरील सेवा आदींवर लक्ष ठेवणे, विविध प्रकारच्या रेशन कार्डाच्या प्रकारांवर नियंत्रण, जिल्हा, उपविभाग आणि तालुकास्तरावरील बैठकीला हजेरी लावणे, रेशन व रॉकेल दुकानदारांची बैठक घेवून समन्वय ठेवणे आदी कामे या पदावरील अधिकाऱ्यांकडून अपेक्षित असते. वेळोवेळी गोडावूनचा आणि रॉकेलचा साठाही तपासावा लागतो. मात्र एवढे महत्त्वाचे पद कनिष्ठ त्यातही तालुका स्तरावरील पुरवठा निरीक्षकाकडे देण्यात आले. या पदाचीच विविध कामे आणि जबाबदाऱ्या असताना पुन्हा अतिरिक्त जबाबदाऱ्या टाकण्यात आल्याने पुरवठा निरीक्षक अधिकाऱ्याचे काम सुयोग्यपणे होईलच आणि झालेच असेल याची कोणतीही शाश्वती नाही.
एकाच व्यक्तीकडे महत्त्वाच्या दोन जबाबदाऱ्या देण्यात आल्याने गैरप्रकार दुर्लक्षिले जावू शकतात किंवा दडपलेही जावू शकतात. यापूर्वीच्या जुन्या उपविभागीय कार्यालयाच्या ठिकाणी पुरवठा निरिक्षण अधिकाऱ्याचे पद नायब तहसीलदार दर्जाच्या अधिकाऱ्याकडे स्वतंत्रपणे आहे. केवळ नव्या उपविभागातच असा प्रकार निभावून नेला जात आहे. राळेगाव तालुका पूर्वी पांढरकवडा उपविभागाशी संलग्नित होता. येथे उपविभाग निर्माण झाल्यानंतर अनेक महिने पांढरकवडा येथील पुरवठा निरिक्षण अधिकारी रजनलवार यांनी काम पाहिले होते. (तालुका प्रतिनिधी)