नवे साहेब आले हो, धंदे बंद करा !
By Admin | Updated: May 22, 2015 23:55 IST2015-05-22T23:55:01+5:302015-05-22T23:55:01+5:30
सुमारे वर्षभर जिल्ह्यात सर्वत्र दारू-जुगाराचे अवैध धंदे खुलेआम सुरू होते.

नवे साहेब आले हो, धंदे बंद करा !
दारू-जुगार व्यावसायिकांना पोहोचला संदेश : ‘आलबेल’ दाखविण्याचा प्रयत्न
यवतमाळ : सुमारे वर्षभर जिल्ह्यात सर्वत्र दारू-जुगाराचे अवैध धंदे खुलेआम सुरू होते. त्यातील लाभाचे पाटही यवतमाळ-अमरावतीपर्यंत वाहत होते. परंतु पोलीस प्रशासनात फेरबदल झाला. नवे एसपी शुक्रवारी रुजू होताच जिल्हाभरातील अवैध धंदे व्यावसायिकांना ‘साहेब आले हो, धंदे बंद करा’ असा संदेश पोलीस वर्तुळातील त्यांच्या पाठीराख्यांकडून पाठविण्यात आला.
येथील जिल्हा पोलीस अधीक्षक संजय दराडे आणि अपर अधीक्षक जानकीराम डाखोरे यांची राज्य राखीव पोलीस दलात अनुक्रमे नागपूर व अमरावती येथे समादेशक म्हणून बदली झाली आहे. नवे एसपी म्हणून धुळ्याचे अखिलेशकुमार सिंग शुक्रवारी दुपारी येथे रुजू झाले. दराडे यांच्याकडून त्यांनी यवतमाळ एसपी पदाची सूत्रे स्वीकारली. डाखोरे यांच्या जागी अद्याप नव्या अपर अधीक्षकांची नियुक्ती न झाल्याने ते सध्या तरी कायम आहेत. त्यांची जागा घेण्यासाठी सुनील लोखंडे हे पोलीस अधिकारी इच्छुक असून त्यांच्यासाठी भाजपाचे एक माजी आमदार फिल्डींग लावून आहेत. लोखंडे यांची यवतमाळातील अॅडिशनल एसपी म्हणून नियुक्ती जवळजवळ निश्चित मानली जात आहे.
नवे एसपी सिंग हे नॉन करप्ट म्हणून ओळखले जातात. तरीही त्यांचे पुढील धोरण काय असेल याचा अंदाज येईस्तोवर जिल्हाभरातील दारू-जुगार, अवैध प्रवासी वाहतूक, अमली पदार्थांची तस्करी व विक्री या सारखे अवैध धंदे बंद ठेवण्याचा संदेश तमाम धंदेवाईकांना पोहोचविला गेला आहे. कारवाई झाल्यास आम्ही जबाबदार नाही, अशी भूमिकाही घेतली गेली आहे. तरीही काही धंदेवाईक मंडळी आपल्या रिस्कवर अवैध धंदा सुरू ठेवू पाहत आहे. नव्या एसपींची काय भूमिका असेल त्याचा अंदाज येण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांना पहिल्या-वहिल्या क्राईम मिटिंगची प्रतीक्षा लागली आहे.
जिल्ह्यात उमरखेडपासून वणीपर्यंत सर्वत्र गेली वर्षभर अवैध धंदे जोरात सुरू होते. पूर्वी चोरुन लपून चालणारे हे धंदे अक्षरश: रस्त्यावर आले होते. त्यातून होणारी उलाढालही तेवढीच मोठी होती. या ‘उलाढाली’मध्ये काही राजकीय नेतेही ‘वाटेकरी’ असल्याची चर्चा पोलीस वर्तुळात आहेत. ते वाटेकरी असल्यानेच अवैध धंद्यांना खुलेआम आणि तेवढे व्यापक स्वरूप दिले गेल्याचे सांगितले जाते. कुणाचेच कुणावर नियंत्रण नसल्याने सर्वकाही बिनधास्त सुरू होते. त्यातूनच गुन्हेगारीने डोके वर काढले आहे. जिल्ह्यात मालमत्तेचे गुन्हे प्रचंड वाढले आहेत. चोरी-घरफोडी, जबरी चोरी-वाटमारी या गुन्ह्यात बरीच वाढ झाली.
बंद असलेली घरे फोडणे, बसस्थानकावर खिसा कापणे, बॅग पळविणे, दागिने लुटणे, मंगळसूत्र चोरी हे गुन्हे नित्याचेच झाले आहे. दरदिवशी कुठे ना कुठे मोठ्या घरफोड्या होत आहेत. या चोऱ्या-घरफोड्या रोखण्यासाठी पोलिसांकडून प्रतिबंधात्मक पुरेशा उपाययोजना होताना दिसत नाहीत. झालेले गुन्हे उघडकीस आणण्याची धडपडही ठाणेदारांमध्ये पहायला मिळत नाही. वणी, शिरपूर, पांढरकवडा, उमरखेड येथील पोलिसांचा तर अवैध धंदे आणि वरकमाईतच अधिक ‘इन्टरेस्ट’ पाहायला मिळतो. स्थानिक राजकीय नेत्यांना ‘खूश’ करून आपली खुर्ची शाबूत ठेवण्याकडेच बहुतांश पोलीस अधिकाऱ्यांचा कल असल्याचे चित्र पाहायला मिळाले. अशा खुशमस्कऱ्यांमुळेच जिल्ह्यातील पोलीस यंत्रणेची पार वाताहत झाली आहे. कायदा व सुव्यवस्थेचा जरब निर्माण करण्याची गरज आहे. (प्रतिनिधी)
यवतमाळ विभाग एसडीपीओ राहुल मदनेंच्या नियंत्रणाबाहेर
गुन्हेगार, चोरटे आणि अवैध धंदेवाईकांचा सर्वाधिक धुमाकूळ यवतमाळ शहर व विभागात पाहायला मिळतो आहे. राहुल मदने हे यवतमाळचे उपविभागीय पोलीस अधिकारी असले तरी या विभागातील ठाणेदार त्यांना जुमानत नसल्याचे चित्र आहे. स्वत: मदने यांच्या कर्तव्यदक्षता व प्रामाणिकपणावर संशय व्यक्त केला जात आहे. कारण त्यांच्या कार्यालयापासून चहुबाजुने अगदी ५० मीटर अंतरावर खुलेआम जुगाराचे अड्डे सुरू आहे. कॉटन मार्केट चौकात पानठेल्याच्या आडोशाने, अप्सरा टॉकीजच्या अगदी समोर, पोलीस मुख्यालयासमोर, गुजरी, आर्णी आदी अड्ड्यांसमोरुन त्यांची नियमित ये-जा सुरू असते. मात्र त्यानंतरही त्यांनी या धंद्यांबाबत कोणताही आक्षेप घेतला नाही. यावरून हे धंदेवाईक त्यांना किती ‘खूश’ ठेवत असतील याचा अंदाज येतो. यवतमाळ शहर, वडगाव रोड या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात चोऱ्या-घरफोड्या सुरु आहेत. पोलीस ठाण्याच्या अगदी समोरील दुकाने फोडली जात आहे. मात्र त्याबाबत कुणी गंभीर नाही. गुन्हेगारी नियंत्रणाऐवजी ‘कोण आले, किती आले’ यातच त्यांचा अधिक ‘इन्टरेस्ट’ पाहायला मिळत असल्याचे पोलीस वर्तुळातून सांगितले जाते. यवतमाळ जिल्ह्यात पाच एसडीपीओ आहेत. त्यातील सर्वाधिक गोंधळ हा यवतमाळ उपविभागात पहायला मिळतो.
चोरीतील सोने घेऊनही सराफ-सुवर्णकार (आरोपीऐवजी) साक्षीदार कसे ?
यवतमाळ जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात चोऱ्या-घरफोड्या होतात. त्यात महिन्याकाठी लाखो रुपयांचे सोने-चांदीचे दागिने चोरीला जाते. मात्र चोरीतील हे दागिने घेणारे कोण यावर पोलिसांकडून सहसा प्रकाश टाकला जात नाही. चोरट्याने एखाद्या सराफ-सुवर्णकाराचे नाव सांगितल्यास पोलीस त्याच्याकडून सोन्याची जप्ती करतात. मात्र त्याला चोरटा माल खरेदी केल्याप्रकरणी भादंवि ४११ कलमान्वये आरोपी बनविण्याऐवजी त्याला साक्षीदार बनवून अप्रत्यक्ष खाकी वर्दीचे संरक्षण दिले जाते. यवतमाळ जिल्ह्यात चोरीतील सोने-चांदी व अन्य माल खरेदी करणाऱ्या प्रतिष्ठितांची एक टोळीच सक्रिय आहे. चोर आणि पोलिसांचे त्यांच्याशी लागेबांधे आहे. नेहमी चोरट्या मालाची खरेदी करूनही अनेकदा त्यांचे नाव उघडच केले जात नाही. हेतुपुरस्सर अशा प्रकरणांपासून दूर असलेल्या व्यापारी-व्यावसायिकांना (चोरट्याला हुशार करुन) गोवले जाते. चोरट्या मालाच्या या खऱ्या खरेदीदारांचा पर्दाफाश करण्याचे आव्हान नवे जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंग यांच्या पुढे आहे.
शिरपूर पॅटर्न गुंडाळणार
नवे जिल्हा पोलीस अधीक्षक रुजू होताच मावळत्या काळात चालणारा शिरपूर पॅटर्न गुंडाळला जाण्याची चिन्हे आहेत. आतापर्यंत शिरपूर पॅटर्ननुसारच कामकाज केले जात होते. कोण येणार, किती देणार, कुणाला कुठे जायचे अशा सर्वच बाबींचे नियंत्रण शिरपूरवरून केले जायचे. त्यामुळे अन्य वरिष्ठ अधिकारी या पॅटर्नमुळे आपल्या वरिष्ठांपासून कोसोदूर होते. ‘जी-हुजरी’मुळे सुमारे वर्षभर हा पॅटर्न चालला. मात्र यापुढे हा पॅटर्न चालण्याची चिन्हे नाहीत. उलट त्याचा फटका या पॅटर्नला बसण्याची शक्यताही नाकारता येत नाही.