पावसाने काढले नव्या रस्त्याचे वाभाडे
By Admin | Updated: September 25, 2016 02:54 IST2016-09-25T02:54:45+5:302016-09-25T02:54:45+5:30
रस्त्याच्या बांधकामानंतर कमीत-कमी दोन वर्षापर्यंत त्या कामात कोणताही दोष निघू नये, असे अपेक्षित असते.

पावसाने काढले नव्या रस्त्याचे वाभाडे
निकृष्ट काम : दोषदायित्व कालावधीतच लागली वाट
कळंब : रस्त्याच्या बांधकामानंतर कमीत-कमी दोन वर्षापर्यंत त्या कामात कोणताही दोष निघू नये, असे अपेक्षित असते. परंतु, येथील कळंब-जोडमोहा रस्ता दोषदायित्व कालावधीतच उखडू लागला आहे. परतीच्या पावसाने या रस्त्याच्या बांधकामातील दोष चव्हाट्यावर आणले आहे. त्यामुळे आता या रस्त्याची पूर्ण दुरुस्ती कंत्राटदाराकडून करून घेण्यात यावी, अशी मागणी नागरिकांतून करण्यात येत आहे.
कोणत्याही रस्त्याच्या बांधकामानंतर तो कमीत-कमी दोन वर्षापर्यंत सुस्थितीत असणे शासनास अभिप्रेत आहे. तसा नियमही आहे. यालाच दोषदायित्व कालावधी म्हटले जाते. या कालावधीत काही त्रुटी उघड झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित कंत्राटदाराची असते. परंतु, कंत्राटदार व अधिकाऱ्यांच्या अर्थपूर्ण संबंधांतून कंत्राटदाराला वाचविण्याचाच प्रयत्न केला जातो. अशीच परिस्थिती कळंब-जोडमोहा रस्त्याच्या बाबतीत घडण्याची शक्यता वर्तविली जात आहे. या डांबरी रस्त्यावरुन पावसाळ्याच्या दिवसात ‘जलवाहतूक’ करावी लागते. कारण पाऊस आला की संपूर्ण रस्ता जलमय होतो आणि नागरिकांना गुडघाभर पाण्यातून मार्ग काढावा लागतो. शाखा अभियंत्याकडे वारंवार तक्रारी केल्यानंतरही दखल घेण्यात आली नाही.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून कळंब शहरातून दत्तापूरकडे जाणारा हा रस्ता जवळपास अर्धा किलोमीटर दुतर्फा करण्यात आला. रस्त्याचे डांबरीकरण व नालीचे बांधकाम करण्यात आले. यासाठी जवळपास ७० लाख रुपये खर्च करण्यात आले. दोन्ही बाजूला लाखो रुपये खर्च करुन सिमेंट नाल्या तयार करण्यात आल्या. परंतु, पावसाचे पाणी वाहून जाण्यास व्यवस्थित उपाययोजना करण्यात आली नाही. त्यामुळे पाऊस पडला की, संपूर्ण पाणी रस्त्यावर साचते. विशेष म्हणजे, जेव्हा सदर बांधकाम सुरु होते, तेव्हा संबंधित शाखा अभियंत्याला वारंवार पाणी जाण्यासाठी व्यवस्थित व्यवस्था केल्या जात नाही, याची कल्पना देण्यात आली. परंतु, लोकांच्या सूचनेकडे साफ दुर्लक्ष करीत कंत्राटदाराला पाठीशी घालण्याचे काम करण्यात आले. आता हा रस्ता उखडू लागला आहे. दोषदायित्व कालावधीत उखडलेला रस्ता नियमानुसार कंत्राटदाराकडून करुन घेणे बंधनकारक आहे. त्यामुळे संबंधित विभाग कोणती ठोस कारवाई करते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
लाखो रुपये खर्च करून बांधकाम करण्यात आलेला हा रस्ता पावसाळ्यात नागरिकांनाची डोकेदुखी ठरतो. एवढेच नाहीतर रस्त्यावर पाणी साचून राहत असल्यामुळे डांबरी रस्ता खराब व्हायला लागला आहे. कुठे उखडला गेला तर काही ठिकाणी खड्डे पडायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे आतापासूनच या रस्त्याच्या उपयोगितेविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यामुळे संबंधित कंत्राटदार व अभियंत्याविरुद्ध कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे. (तालुका प्रतिनिधी)