सचिवांनी शोधला नवा फंडा
By Admin | Updated: July 1, 2014 23:43 IST2014-07-01T23:43:34+5:302014-07-01T23:43:34+5:30
अतिवृष्टी, नापिकी आणि अकाली पावसामुळे शेतकऱ्यांना गतवर्षी शेती उत्पादन झाले नाही. लागलेला खर्चही निघाला नाही. घरात असलेला सर्व पैसा आणि दागदागिने गहाण ठेवून उत्पादनासाठी केलेली धडपड व्यर्थ ठरली.

सचिवांनी शोधला नवा फंडा
शेतकऱ्यांची लूट : ग्रामीण भागातील सोसायट्यांचे कर्मचारी आघाडीवर
किशोर वंजारी - नेर
अतिवृष्टी, नापिकी आणि अकाली पावसामुळे शेतकऱ्यांना गतवर्षी शेती उत्पादन झाले नाही. लागलेला खर्चही निघाला नाही. घरात असलेला सर्व पैसा आणि दागदागिने गहाण ठेवून उत्पादनासाठी केलेली धडपड व्यर्थ ठरली. शिवाय सोसायट्यांमार्फत बँकांचे कर्ज घेतले. याची परतफेड ते करू शकले नाही. याचाच फायदा सोसायटीचे सचिव आणि ग्रामीण भागातील बँकांचे कर्मचारी घेत असल्याचे दिसून येत आहे. या प्रकारात शेतकरी मात्र नाडवला जात आहे.
शेतकऱ्यांना सोसायट्यांमार्फत पीककर्ज दिले जाते. बहुतांश शेतकऱ्यांनी २०१३ मध्ये घेतलेल्या कर्जाची परतफेड केली नाही. कर्जाचा भरणा कुणी केला आणि कुणी नाही केला याची यादी बँकांकडून सोसायटीला पाठविली जाते. थकीत कर्जदारांकडून वसुलीचे सत्र बँक अधिकारी आणि सोसायटीच्या सचिवांनी राबविणे सुरू केले आहे. याच संधीचा फायदा घेणे बँकांचे काही अधिकारी, कर्मचारी यांनी सचिवांमार्फत सुरू केले आहे.
थकीत कर्जदाराला पुढे भराव्या लागणाऱ्या व्याजाची कल्पना दिली जाते. मात्र शेतकरी ही रक्कम भरण्यास असमर्थता दर्शवितो. अशावेळी आपण व्याजाने पैसे देवू, असे सांगितले जाते. संबंधिताला रक्कम देवून ती लगेच कर्ज खात्यात भरण्यास सांगितले जाते. खाते नील झाल्यानंतर दोन दिवसात पुन्हा कर्ज उपलब्ध करून देत कर्जाऊ दिलेली रक्कम पाच टक्के व्याजासह परत घेतली जाते. या प्रकारातून शेतकरी मात्र आर्थिकरीत्या लुटला जात आहे.
एकीकडे शेतकऱ्यांकडे दुबार पेरणीसाठी पैसा नाही. होता नव्हता तो सर्व पहिल्या पेरणीतच संपला. अशाही स्थितीत सोसायटी आणि बँकांच्या सचिवांनी त्यांच्या गरजेचा फायदा घेणे सुरू केले आहे. यासाठी काही दलालही सक्रीय झाले आहेत. ही बाब संबंधित वरिष्ठांनी गांभीर्याने घ्यावी, अशी मागणी होत आहे.