‘मेडिकल’मध्ये न्युरो सर्जन व फिजिशियनची सेवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2019 06:00 IST2019-09-20T06:00:00+5:302019-09-20T06:00:14+5:30
मेंदूच्या संदर्भातील कुठलाही आजार असल्यास यवतमाळ मेडिकलमध्ये उपचाराची सुविधा नव्हती. आता डॉ. हर्षल राठोड व डॉ. चेतन राठोड हे दोन बंधू आठवड्यातून एक दिवस बाह्यरुग्ण तपासणी व मेंदूच्या शस्त्रक्रियेसाठी देणार आहेत. यातून अतिउच्च दर्जाची सेवा यवतमाळातील गरीब रुग्णांना उपलब्ध होणार आहे.

‘मेडिकल’मध्ये न्युरो सर्जन व फिजिशियनची सेवा
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात केवळ न्युरो सर्जन व फिजिशियनची सुविधा नाही. त्यामुळे अनेक रुग्णांना नागपूर रेफर केले जाते. लवकरच रुग्णालयात आठवड्यातून एक दिवस या दोनही तज्ज्ञ डॉक्टरांची उपस्थिती राहणार आहे.
मेंदूच्या संदर्भातील कुठलाही आजार असल्यास यवतमाळ मेडिकलमध्ये उपचाराची सुविधा नव्हती. आता डॉ. हर्षल राठोड व डॉ. चेतन राठोड हे दोन बंधू आठवड्यातून एक दिवस बाह्यरुग्ण तपासणी व मेंदूच्या शस्त्रक्रियेसाठी देणार आहेत. यातून अतिउच्च दर्जाची सेवा यवतमाळातील गरीब रुग्णांना उपलब्ध होणार आहे. बाह्यरुग्ण तपासणी व शस्त्रक्रियेचा दिवस अद्याप निश्चित झाला नाही. मात्र तो लवकरच जाहीर केला जाईल, असे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले.
किडनीच्या रुग्णांनाही मिळते जीवनदान
१२ डायलिसीस मशीन मेडिकलमध्ये आल्या आहेत व स्वतंत्र विभागच स्थापन केला गेला आहे. आता केवळ तीन डायलिसीस मशीन कार्यान्वित असून ५०४ रुग्णांना याचा लाभ मिळाला आहे. मेडिसीन विभागातील सहयोगी प्रा. शेखर घोडेस्वार यांनी नेफ्रॉलॉजीचे प्रशिक्षण पूर्ण केले आहे. त्यांच्याच अधिपत्याखाली डायलिसीस विभाग कार्यान्वित आहे. महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून या विभागात तंत्रज्ज्ञांची पाच पदे भरण्याची परवानगी मेडिकल प्रशासनाने मागितली आहे. केवळ दोन तंत्रज्ज्ञ सध्या डायलिसीस विभागाचे कामकाज सांभाळत आहे. थोरात व शहाणे यांचे विशेष परिश्रम आहे. सर्व सुविधांमुळे रुग्णालयात एका दिवशी तीन हजार रुग्ण तपासणीसाठी येत आहेत.
केवळ ३५ हजार रक्तपेशी असूनही प्रसूती सुरक्षित
स्त्री रोग विभागात ग्रामीण भागातील अतिशय गंभीर स्वरूपाच्या महिला प्रसूतीसाठी येतात. ३५ हजार पेशी असलेल्या महिलेचीही सुरक्षितरित्या प्रसूती करण्यात आली. तिच्या अंगात ६.४ एवढेच हिमोग्लोबीन होते. या गंभीर स्थितीतही डॉक्टरांनी तिला तीन बॉटल रक्त व चार बॉटल प्लेटलेट्स, दोन बॉटल एफएफपी देऊन तातडीने उपचार केले. प्रा.डॉ. श्रीकांत वºहाडे यांच्या मार्गदर्शनात डॉ. चेतना ढवळे, डॉ. प्रीती वर्मा, डॉ. वृषाली गद्रे, डॉ. मयूर दुधे, डॉ. मरियम मोतीवाला, डॉ. भाग्यश्री भानुशाली यांनी एकत्रितपणे प्रयत्न करून नंदा संदीप वाघमारे (रा.महागाव) या महिलेला व तिच्या बाळाला जीवदान दिले.
रुग्णालयात विविध प्रकारच्या सुधारणा केल्या. डॉक्टर वेळेवर उपलब्ध होतात. शस्त्रक्रियेचे प्रमाण वाढले. यामुळेच रुग्णांचा विश्वास संपादन करण्यात यशस्वी झालो. परिणामी मेडिकलमध्ये येणाऱ्या रुग्णांची संख्या नागपूर जीएमसीपेक्षाही अधिक आहे.
- डॉ. मनीष श्रीगिरिवार,
अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, यवतमाळ