भेसळयुक्त पदार्थापासून सावध राहण्याची गरज
By Admin | Updated: October 22, 2014 23:26 IST2014-10-22T23:26:14+5:302014-10-22T23:26:14+5:30
सणासुदीच्या विशेषत: दिवाळीच्या दिवसांमध्ये खाद्य पदार्थांमध्ये मोठ्या प्रमाणात भेसळीची शक्यता असते. अशा पदार्थांच्या सेवनामुळे आरोग्यावर विपरित परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

भेसळयुक्त पदार्थापासून सावध राहण्याची गरज
यवतमाळ : सणासुदीच्या विशेषत: दिवाळीच्या दिवसांमध्ये खाद्य पदार्थांमध्ये मोठ्या प्रमाणात भेसळीची शक्यता असते. अशा पदार्थांच्या सेवनामुळे आरोग्यावर विपरित परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्या अनुषंगाने नागरिकांनी कोणतेही पदार्थ खरेदी करण्यापूर्वी सावधानता बाळगण्याचे आवाहन अन्न व औषधी प्रशासन विभागाने केले आहे.
दिवाळीच्या दिवसांमध्ये खाद्यपदार्थांची खरेदी मोठ्या प्रमाणात केली जाते. विशेषत: दुधजन्य पदार्थांना या काळात मोठी मागणी असते. मागणी जास्त आणि पुरवठा कमी यामुळे अशा पदार्थांमध्ये भेसळीची शक्यता अधिक असते. इतर शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात अशा भेसळयुक्त खवा पकडण्याच्या घटना घडल्या आहेत. यवतमाळ जिल्हयात मात्र अद्याप यावर्षी असा प्रकार उघडकीस आला नाही. परंतु तरीदेखील ग्राहकांनी सावधानता बाळगणे आवश्यक आहे.
खव्यापासून बनविण्यात आलेल्या विविध पदार्थांना ज्या प्रमाणात मागणी असते त्या प्रमाणात खवा उपलब्ध होत नसल्याने भेसळयुक्त खव्याची विक्री अशा दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात होते. स्थानिक विक्रेत्यांशिवाय बाहेरगावहून आणि इतर प्रांतातूनही असा खवा विक्रीस येतो. अशा खव्यापासून बनविण्यात आलेले पदार्थ निश्चितच आरोग्यास हानीकारक असतात. दुकानांमध्ये आकर्षक पॅकींगमध्ये वेगवेगळ्या मिक्स मिठाई सजविलेल्या असतात. असे पदार्थ पाहून कुणालाही ते घेतल्यावाचून राहवत नाही. परंतु असे पदार्थ घेताना खात्रीपूर्वक दुकानातूनच ते खरेदी करणे आवश्यक आहे. शिवाय आपण खरेदी करीत असलेल्या पदार्थांचे पक्के बील घेणे गरजेचे आहे.
कोणताही पदार्थ खरेदी करण्यापूर्वी एमआरपी व एक्सपायरी तारीख पाहून घ्यावी. कालबाह्य तारखेतील पदार्थ घेऊ नये. मिळायांसोबतच किराणा दुकानातील साहित्य खरेदी करतानासुद्धा काळजी बाळगणे गरजेचे आहे. काही दुकानांमध्ये वर्षभरात न खपलेला कालबाह्य माल दिवाळीतील गर्दी पाहून विक्रीस काढण्यात येतो. तेंव्हा ग्राहकांनी खात्रीच्याच दुकानातून आणि नीट पाहणी केल्यानंतरच अशा मालाची खरेदी करणे आवश्यक आहे. आपली कोणतीही फसवणूक होणार नाही, याबाबत ग्राहकांनी स्वत: तत्पर असणे केंव्हाही चांगले.
त्यानंतरसुद्धा ग्रहकांना आपली फसगत झाल्याचे लक्षात आल्यास त्यांनी त्वरित अन्न औषधी प्रशासनच्या स्थानिक कार्यालयात संपर्क साधून लेखी तक्रार करावी, तसेच अखिल भारतीय ग्राहक कल्याण परिषदेला कळवावे, असे आवाहन जिल्हा अध्यक्ष नितीन कापसे यांनी केले आहे. (प्रतिनिधी)