राष्ट्रवादीत दुफळी कायमच

By Admin | Updated: June 28, 2014 23:49 IST2014-06-28T23:49:49+5:302014-06-28T23:49:49+5:30

वणी विधानसभा क्षेत्रात राष्ट्रवादी काँंग्रेस पक्ष केवळ नावापुरताच उरल्याचे दिसून येते. या पक्षाची गटा-तटात विभागणी झाली. वणी, मारेगाव आणि झरीजामणी या तीन तालुक्यात या पक्षाचा एकही जिल्हा परिषद आणि

NCP is always in the fray | राष्ट्रवादीत दुफळी कायमच

राष्ट्रवादीत दुफळी कायमच

उमेदवार कोण : स्वतंत्र लढल्यास पक्षासमोर निर्माण होणार पेच
रवींद्र चांदेकर - वणी
वणी विधानसभा क्षेत्रात राष्ट्रवादी काँंग्रेस पक्ष केवळ नावापुरताच उरल्याचे दिसून येते. या पक्षाची गटा-तटात विभागणी झाली. वणी, मारेगाव आणि झरीजामणी या तीन तालुक्यात या पक्षाचा एकही जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्य नसून केवळ वणी नगरपरिषदेत चार सदस्य आहे.
राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून स्थानिक नेते संजय देरकर पक्षासोबत होते. पक्षाने त्यांना जिल्हाध्यक्ष आणि राज्य सरचिटणीस पदाची जबाबदारीही दिली होती. मात्र अल्पावधीतच त्यांच्याकडून जिल्हाध्यक्षपद काढून घेण्यात आले. वणी विधानसभेची जागा आघाडीत काँग्रेसच्या वाट्याला आहे. लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोनही पक्षात ‘एकला चलो रे’चा राग आळविला जात आहे. ही जागा काँग्रेसच्या वाट्याला असल्याने राष्ट्रवादीत आत्तापर्यंत नाराजीच व्यक्त होत आहे. त्यातूनच गेल्या विधानसभा निवडणुकीत देरकर यांनी बंडखोरी केली होती. त्यावेळी त्यांनी अपक्ष लढून चक्क तिसऱ्या क्रमांकाची मतेही प्राप्त केली होती. मागील विधानसभा निवडणुकीनंतर पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले. तेव्हापासूनच देरकर पक्षापासून दुरावत गेले. त्यानंतर वणी उपविभागात पक्ष पदाधिकारी निवडतानाही त्यांना पद्धतशीरपणे ‘इंगा’ दाखविण्यात आला. त्यामुळे पक्षापासून ते पुन्हा दुरावले गेले. नाही म्हणायला ते पक्षाच्या कार्यक्रमांना हजेरी लावत होते, हे मात्र खरे. आता या पक्षात किमान तीन गट पडल्याचे दिसून येते.
मागीलवर्षी देरकर यांनी एका फॉर्म हाऊसमध्ये आपल्या ‘खास’ कार्यकर्त्याची बैठक घेतली. त्यात सर्वांनीच त्यांना पक्ष सोडण्याची गळ घातली. मात्र त्यांनी त्यावेळी सावध पवित्रा घेत संघर्ष समिती स्थापन करून या समितीच्या माध्यमातून समस्या सोडविण्याचा प्रयत्न करण्याचे सुतोवाच केले होते. तथापि अद्याप ही संघर्ष समिती प्रत्यक्षात आलीच नाही. आता लोकसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी पुन्हा आपल्या त्या ‘खास’ कार्यकर्त्यांना बोलावून घेतले. या बैठकीत त्यांनी अनाकलनीयपणे कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीची साथ सोडत ‘आम आदमी’ पक्षाचे उमेदवार वामनराव चटप यांना पाठींबा जाहीर केला. त्यामुळे देरकर येत्या विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षातर्फे लढतील, असे कयास बांधले गेले. मात्र चटप यांचा पराभव झाला अन् देरकर यांचा पाठींब्याचा ‘तो’ निर्णय त्यांनाच घातक ठरला, असे बोलले जाऊ लागले.
या सर्व घटनाक्रमानंतर आजपर्यंत मात्र अधिकृतपणे अद्याप पक्षाने त्यांना बाहेरचा रस्ता दाखविला नाही किंवा त्यांनीही पक्ष सोडण्याची घोषणा केली नाही. त्यात आता राष्ट्रवादी आणि काँग्रेस स्वतंत्र लढण्याची भाषा करीत आहे. मात्र या पक्षाकडे वणी विधानसभा क्षेत्रात सध्या तगडा उमेदवारच नाही. देरकर यांनी लोकसभा निवडणुकीत आम आदमीच्या उमेदवाराला पाठींबा दिल्यामुळे त्यांना राष्ट्रवादीची उमेदवारी मिळणेही कठीण जाण्याचे संकेत आहे.

Web Title: NCP is always in the fray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.