नाईकांचा दबदबा कायम

By Admin | Updated: October 19, 2014 23:19 IST2014-10-19T23:19:58+5:302014-10-19T23:19:58+5:30

पुसद विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार मनोहरराव नाईक यांनी ९४ हजार १५२ मते घेऊन विजय संपादन केला. त्यांनी शिवसेनेचे प्रकाश पाटील देवसरकर यांचा पराभव करून राष्ट्रवादीचा

Nayaka's control continues | नाईकांचा दबदबा कायम

नाईकांचा दबदबा कायम

पाचव्यांदा विजय : ६५ हजारांचे मताधिक्य, शिवसेनेला नाकारले
अखिलेश अग्रवाल/अशोक काकडे- पुसद
पुसद विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार मनोहरराव नाईक यांनी ९४ हजार १५२ मते घेऊन विजय संपादन केला. त्यांनी शिवसेनेचे प्रकाश पाटील देवसरकर यांचा पराभव करून राष्ट्रवादीचा गढ अबाधित राखला आहे.
रविवारी सकाळी ८ वाजता येथील बचत भवनात कर्नाटक येथून आलेले निवडणूक निरिक्षक मीर अनिस अहमद यांच्या मार्गदर्शनात निवडणूक निर्णय अधिकारी चंद्रकांत जाजू व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी भगवान कांबळे यांच्या चमुने मतमोजणीला सुरूवात केली. मनोहरराव नाईकांनी पहिल्या फेरीपासून २१ व्या फेरीपर्यंत मतांची आघाडी कायम ठेवली. मत मोजणीच्या २२ फेऱ्या झाल्या. प्रशासकीय यंत्रणेचे मिडिया सेंटरकडे दुर्लक्ष असल्यामुळे यावेळी वेळेवर माहिती प्रसारमाध्यमांना मिळत नव्हती. मतमोजणीचे काम संथगतीने सुरू होते. पहिली फेरी ९ वाजता पूर्ण झाली. २२ वी अंतिम फेरी पूर्ण होण्यास २ वाजले तर निवडणूक निर्णय अधिकारी चंद्रकांत जाजू यांनी २.३० वाजता अंतिम निकाल जाहीर केला. त्यानंतर मनोहरराव नाईक यांना विजयाचे प्रशस्तीपत्र देण्यात आले. यावेळी माजी उपसभापती विजय जाधव जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सदबाराव मोहोटे उपस्थित होते. प्रमाणपत्र घेतल्यानंतर कार्यकर्त्यांसह मनोहरराव नाईक बचत भवनातून बाहेर पडत असतानाच त्यांनी उपस्थित जनता व पत्रकारांच्या शुभेच्छा स्वीकारल्या. त्यानंतर ते आपल्या बंगल्याकडे गेले. उल्लेखनीय म्हणजे मनोहरराव नाईक हे कधीही विजयी रॅली काढत नाहीत. ही परंपरा त्यांनी यावेळीसुद्धा कायम ठेवली.
पुसद मतदारसंघात एकूण ६७० एवढी पोस्टल मते होती. त्यातील सर्वाधित ४२६ मते मनोहररावांनी घेऊन येथेही आघाडी मिळविली. त्या खालोखाल सेनेचे प्रकाश देवसरकर यांनी ८६, काँग्रेसचे सचिन नाईक यांनी ४३ व भाजपाचे पाटील यांनी ६० पोस्टल मते मिळविली. पुसद विधानसभा निवडणुकीत यावेळी एकूण १५ उमेदवार रिंगणात होते. त्यापैकी काँग्रेस-भाजपा व बसपा उमेदवारासह १२ उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली. भाजपाचे वसंतराव पाटील तिसऱ्या क्रमांकावर तर काँग्रेसचे सचिन नाईक चौथ्या क्रमांकावर राहिले.
अपक्ष उमेदवार विशाल जाधव यांनी ५ हजार ५३५ मते घेऊन ते पाचव्या स्थानी राहिले. २२ व्या फेरीत सेनेचे प्रकाश पाटील देवसरकर यांना अनामत रक्कम वाचविता आली. त्यानंतरच्या प्रत्येक फेरीत राष्ट्रवादी काँग्रेसचे मनोहरराव नाईक यांनीच आघाडी घेतली. पुसद मतदारसंघात २ लाख ८१ हजार ५६१ एकूण मतदार असून, १ लाख ७२ हजार ३८९ मतदारांनी यावेळी आपला मतदानाचा हक्क बजावला. त्यापैकी राष्ट्रवादीचे नाईक यांना ९४ हजार १५२ मते मिळाली. त्यांच्या मतांची ही टक्केवारी ५५ आहे.

Web Title: Nayaka's control continues

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.