राष्ट्रवादीचे सोशल इंजिनिअरिंग

By Admin | Updated: May 30, 2014 00:23 IST2014-05-30T00:23:28+5:302014-05-30T00:23:28+5:30

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस ख्वाजा बेग यांना पक्षाने अखेर आमदारकी बहाल केली. राज्यपाल नियुक्त कोट्यातून बेग यांच्या गळ्यात आमदारकीची माळ टाकण्यात आली. या माध्यमातून राष्ट्रवादीने

Nationalist Social Engineering | राष्ट्रवादीचे सोशल इंजिनिअरिंग

राष्ट्रवादीचे सोशल इंजिनिअरिंग

ख्वाजा बेग विधानपरिषदेवर : आघाडीच्या लोकसभेतील पराभवाचे डॅमेज कंट्रोल
संतोष अरसोड -यवतमाळ
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस ख्वाजा बेग यांना पक्षाने अखेर आमदारकी बहाल केली. राज्यपाल नियुक्त कोट्यातून बेग यांच्या गळ्यात आमदारकीची माळ टाकण्यात आली. या माध्यमातून राष्ट्रवादीने सोशल इंजिनिअरिंग करण्याचा प्रयत्न केला आहे. लोकसभा निवडणुकीत पुसद वगळता सर्वच मतदारसंघात आघाडीच्या उमेदवाराची पीछेहाट झाली होती. ख्वाजा बेग यांच्या निवडीने संपूर्ण विदर्भात अल्पसंख्यकांच्या मतांची डागडुजी करण्याचा प्रयत्न होणार आहे.
सन १९९९ च्या निवडणुकीत ख्वाजा बेग यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे दिग्रस मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली होती. काँग्रेस पक्षातून बाहेर पडून राष्ट्रवादीची स्थापना झाली होती. राजाभाऊ ठाकरे यांनी भाजपाला रामराम करून राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. राजाभाऊ ठाकरे आणि बेग यांचे असलेल्या मैत्रीपूर्ण संबंधातूनच खुद्द शरद पवार यांनी ख्वाजा बेग यांना दिग्रसमधून लढण्याचा आग्रह केला. बी.ई. सिव्हिलचे उच्च शिक्षण घेतलेल्या ख्वाजा बेग यांना ही निवडणूक अगदी नवीन होती. कुठल्याही राजकीय दिशा ठरल्या नसताना अचानक पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी त्यांना उमेदवारी दिल्यामुळे त्यांच्यावरील राजकीय जबाबदारी वाढली होती. अल्पसंख्यक समुदायातील असूनही धर्मनिरपेक्ष प्रतिमा असलेल्या ख्वाजा बेग यांचा सन १९९९ च्या निवडणुकीत अपक्ष उमेदवार संजय देशमुख यांनी केवळ १२६ मतांनी पराभव केला होता. प्रशासकीय उणिवा व कर्मचार्‍यांची हातचलाखी यामुळे ही मतमोजणी संशयाच्या भोवर्‍यात सापडली होती. मतमोजणीचे प्रकरण न्यायालयापर्यंतही पोहोचले होते.
बेग यांचा १२६ मतांनी झालेला पराभव सर्व जाती धर्मातील मित्रमंडळाच्या जिव्हारी लागला. त्यामुळे या मतदारसंघात मिशन-१२६ राबविण्यात आले. २00४ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस व राष्ट्रवादीची युती होती. दिग्रस मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचा दावा प्रबळ होता. त्यातच १२६ मतांनी सन १९९९ च्या निवडणुकीत झालेल्या पराभवामुळे ख्वाजा बेग यांची उमेदवारी पक्की होती. मात्र याही वेळेस बेग यांच्यासोबत पंक्तिप्रपंच झाला. युती असतानाही दिग्रस मतदारसंघात काँग्रेसने सुमनताई राठोड यांना उमेदवारी दिली. अखेरच्या क्षणी मुंबई येथे जाऊन राजाभाऊ ठाकरे यांनी जोरदार फिल्डींग लावून बेग यांच्यासाठी उमेदवारी खेचून आणली. त्यामुळे संपूर्ण राज्यात पहिल्यांदाच २00४ मध्ये काँग्रेस व राष्ट्रवादीमध्ये मैत्रीपूर्ण लढत झाली. या निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवार सुमनताई राठोड यांचे डिपॉझिट जप्त झाले. काँग्रेसने उमेदवार उभा केला नसता तर त्याही वेळेस त्यांच्या गळ्यात आमदारकीची माळ पडली असती.
मधल्या काळात बेग यांना अल्पसंख्यक आयोग, मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळ यावर काम करण्याची संधी देण्यात आली. सच्चर समितीच्या शिफारशीमध्ये त्यांचा मौलिक वाटा आहे. सर्वधर्म समभावाचे राजकारण करत असताना मधल्या काळात ते काहीसे निराश होते. दरम्यान, प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरचिटणीसपदाची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर येऊन पडली. नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारासाठी त्यांनी राज्यात अनेक ठिकाणी प्रचारसभाही घेतल्या. यातून त्यांच्यातील असलेला तळमळीचा कार्यकर्ता जिवंत असल्याची जाणिव पक्षाला झाली. अखेर पक्षाध्यक्ष शरद पवार यांनीच विधान परिषदेसाठी त्यांचे नाव निश्‍चित केले. त्यांच्या या निवडीसाठी ना.मनोहरराव नाईक, आमदार संदीप बाजोरिया, जिल्हाध्यक्ष नाना गाडबैले यांच्यासह राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाने जोरदार प्रयत्न केले. आज त्या प्रयत्नाला मूर्तरूप प्राप्त झाले आहे. एका उच्चशिक्षित व धर्मनिरपेक्ष प्रवृत्तीच्या तरुणाला आमदार होण्याची संधी दिल्यामुळे विदर्भातील राष्ट्रवादीला सोनेरी दिवस आणण्याचा पक्षाचा प्रयत्न असल्याचे राजकीय वर्तुळातून बोलले जात आहे.
 

Web Title: Nationalist Social Engineering

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.