काम होण्यापूर्वीच उखडला राष्ट्रीय महामार्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2020 05:00 IST2020-07-29T05:00:00+5:302020-07-29T05:00:07+5:30

या मार्गावर दिग्रस ते दारव्हापर्यंत काँक्रीटीकरण आणि दारव्हा ते कारंजापर्यंत डांबरीकरण केले जात आहे. नव्याने केलेल्या डांबरीकरणाला काही दिवसांतच खड्डे पडायला सुरूवात झाली. काँक्रीटीकरणसुद्धा अंदाजपत्रकानुसार झाले की नाही, याबाबत शंका उपस्थित केली जात आहे. या कामाची गुणनियंत्रक विभागाकडून चौकशी करण्याची मागणी होत आहे.

The national highway was demolished before the work could be completed | काम होण्यापूर्वीच उखडला राष्ट्रीय महामार्ग

काम होण्यापूर्वीच उखडला राष्ट्रीय महामार्ग

ठळक मुद्देदिग्रस-दारव्हा-कारंजा : जागोजागी पडले खड्डे, कामाच्या दर्जावर शंका, पावसाने उघड केली कामाची गुणवत्ता

लोकमत न्यूज नेटवर्क
दारव्हा : बहुप्रतीक्षित दिग्रस-दारव्हा-कारंजा राष्ट्रीय महामार्गाचे बांधकाम अद्याप अपूर्ण आहे. कामाच्या विलंबामुळे नाराजी आहे. आता काम झालेल्या ठिकाणचा काही भाग उखडण्यास सुरूवात झाली. यामुळे तालुक्यात संताप व्यक्त केला जात आहे.
या मार्गावर दिग्रस ते दारव्हापर्यंत काँक्रीटीकरण आणि दारव्हा ते कारंजापर्यंत डांबरीकरण केले जात आहे. नव्याने केलेल्या डांबरीकरणाला काही दिवसांतच खड्डे पडायला सुरूवात झाली. काँक्रीटीकरणसुद्धा अंदाजपत्रकानुसार झाले की नाही, याबाबत शंका उपस्थित केली जात आहे. या कामाची गुणनियंत्रक विभागाकडून चौकशी करण्याची मागणी होत आहे. नोव्हेंबर २०१५ ला पूर्वीच्या २८२ क्रमांकाच्या यवतमाळ-कारंजा राज्य मार्गाला दिग्रस-दारव्हा-कारंजा नवीन राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देण्यात आला. नंतर भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधीकरणाने ७० किलोमीटर काँक्रीटीकरणासाठी ७०० कोटी रुपये मंजूर केले.
मार्च २०१८ मध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाकडून हा मार्ग राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे हस्तांतरित करण्यात आला. त्यानंतर मार्गाच्या बांधकामाला सुरुवात झाली. त्यावेळी संपूर्ण रस्त्याच्या काँक्रीटीकरणाची चर्चा असताना मात्र बांधकाम कंत्राटदार कंपनीने खोदकाम करुन केवळ डांबरीकरण सुरू केले. यावरुन शिवसेनेने रस्त्यावर नांगर फिरवून आंदोलनही केले होते. संपूर्ण महामार्गाचे काँक्रीटीकरण करावे, अशी मागणी केली होती. मात्र त्याउपरही जवळपास निम्म्या मार्गावर डांबरीकरण तर निम्म्या मार्गावर काँक्रीटीकरण केले जात आहे.
दरयान, डांबरीकरण केलेल्या रस्त्यावर आत्तापासूनच खड्डे पडायला सुरूवात झाली आहे. तसेच काँक्रीटीकरणाच्या दर्जावरही शंका उपस्थित केली जात आहे. स्थानिक पातळीवर या मार्गाच्या कामाचे अंदाजपत्रक, आराखडा उपलब्ध होऊ शकला नाही. कोणत्याही मार्गाचा आराखडा त्या मार्गावरील वाहतुकीची वर्दळ लक्षात घेता तयार केला जातो. त्यात राष्ट्रीय महामार्गाचे स्टेटस जास्त असल्याने मजबुतीवर जास्त लक्ष दिले जाते. मात्र या राष्ट्रीय महामार्गाची कामाच्या चालू स्थितीतच दुरवस्था होत आहे. त्यामुळे कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. हा महामार्ग मजबूत व टिकावू होण्यासाठी अंदाजपत्रकानुसार काम होणे आवश्यक आहे.

गैरप्रकार रोखण्याची जबाबदारी कुणाची
कोट्यवधी रुपये खर्चून हा महामार्ग बांधला जात आहे. मात्र कामाच्या दर्जाबद्दल सतत तक्रारी होत आहे. असुविधेमुळे तीन वर्षांपासून वाहनधारक त्रस्त आहे. मात्र याविरुद्ध कुणीही आवाज उठवायला तयार नाही. लोकप्रतिनिधी, सत्ताधारी, विरोधक सर्वच गप्प असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अधिकारीसुद्धा कामाचा आढावा घेताना दिसत नाही. त्यामुळे गैरप्रकार रोखण्याची जबाबदारी नेमकी कुणाची, असा प्रश्न सामान्य नागरिकांना पडला आहे.

Web Title: The national highway was demolished before the work could be completed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.