नेर तालुका क्रीडा संकुलाची दैना
By Admin | Updated: January 4, 2015 23:20 IST2015-01-04T23:20:54+5:302015-01-04T23:20:54+5:30
नेर येथील क्रीडा संकुलाची दयनीय अवस्था झाल्याने प्रतिभावान खेळाडूंची परवड सुरू आहे. तब्बल एक कोटी रुपयांच्या निधीतून उभारण्यात आलेले हे संकुल शोभेची वस्तू ठरले आहे.

नेर तालुका क्रीडा संकुलाची दैना
नीलेश भगत - यवतमाळ
नेर येथील क्रीडा संकुलाची दयनीय अवस्था झाल्याने प्रतिभावान खेळाडूंची परवड सुरू आहे. तब्बल एक कोटी रुपयांच्या निधीतून उभारण्यात आलेले हे संकुल शोभेची वस्तू ठरले आहे. मैदानात सतत जनावरांचा मुक्तसंचार असतो. त्यामुळे या संकुलाला कुरणाचे स्वरूप आले आहे. सतत कुलूपबंद अवस्थेत असलेला गोदामवजा बॅडमिंटन हॉल, ४०० मीटर ट्रॅकच्या नावाखाली पसरविलेली लाल माती, ओबडधोबड व खडकाळ मैदान यामुळे खेळाडूंना आपली प्रतिभा सिद्ध करण्यात अडचणी निर्माण झाल्या आहे.
जिल्ह्याप्रमाणेच तालुक्यातील खेळाडूंनाही अद्ययावत क्रीडांगण मिळावे, त्यांना क्रीडाविषयक सर्व पायाभूत सुविधा मिळाव्या, या उदात्त हेतूने प्रत्येक तालुक्यात एक कोटी रुपये निधीतून तालुका क्रीडा संकुल उभारण्याचे शासनाने निश्चित केले आहे. यानुसार नेर येथे तहसील कार्यालयामागे विस्तीर्ण जागेत क्रीडा संकुल उभारले गेले. संकुलाच्या नावावर बॅडमिंटन हॉल, ४०० मीटर धावण पथ, कबड्डी-खो-खोचे क्रीडांगण, क्रीडा संकुलाला भिंत आदी भौतिक सुविधा तसेच प्रशासकीय व्यवस्था म्हणून दोन क्रीडा मार्गदर्शक लिपिक, शिपाई, पहारेकरी प्रत्येकी एक यांची मानधन तत्त्वावर नियुक्ती केली आहे.
प्रभारी तालुका क्रीडा अधिकारी म्हणून कबड्डीचे राज्य क्रीडा मार्गदर्शक किशोर बोंडे नियुक्त आहेत. त्यांच्याकडे जिल्ह्यातील खेळाडूंना मार्गदर्शनासोबतच दारव्हा, दिग्रस तालुक्यातील क्रीडा संकुलाचाही अतिरिक्त प्रभार आहे. या क्रीडा संकुलातील हॉलमध्ये सध्या भंगार पडून आहे. कबड्डी खेळाच्या मॅटला स्थानिक खेळाडूंच्या पायाचा अजूनही स्पर्श झाला नाही. राज्य शासनाकडून या क्रीडा संकुलासाठी आतापर्यंत ७५ लाख रुपयांपेक्षा अधिक निधी मिळाला. याचा योग्य विनियोग झाला नाही. संपूर्ण मैदानावर झुडपं व गवत वाढले आहे. मानधनावरील एकही कर्मचारी शोधूनही सापडत नाही. पहारेकरी असूनही हॉलची तावदाने फुटलेली आहे. संकुलाला असलेली दोन्ही दरवाजे सताड उघडी असतात. पिण्याच्या पाण्याची सोय नाही. अशा दैनावस्थेमुळे गावातील एकही खेळाडू संकुलाकडे फिरकत नाही. नाईलाजाने ते एका महाविद्यालयाच्या क्रीडांगणावर सराव करतात.