नागपूर-तुळजापूर महामार्गाला अल्पावधीतच तडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2020 05:00 IST2020-02-04T05:00:00+5:302020-02-04T05:00:18+5:30
उमरखेड येथून हा राष्ट्रीय महामार्ग क्र.६१ गेला आहे. उमरखेड आणि महागाव तालुक्यात बांधकाम कंपनीतर्फे सिमेंट काँक्रिटचा रस्ता तयार केला जात आहे. काही ठिकाणी रस्ता पूर्णपणे तयार झाला. मात्र अल्पावधीतच त्याला तडे गेले आहे.

नागपूर-तुळजापूर महामार्गाला अल्पावधीतच तडे
लोकमत न्यूज नेटवर्क
उमरखेड : नागपूर-बोरी-तुळजापूर राष्ट्रीय महामार्गाला अल्पावधीतच तडे गेले आहे. यामुळे रस्ता बांधकाम कंपनीच्या कामावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
उमरखेड येथून हा राष्ट्रीय महामार्ग क्र.६१ गेला आहे. उमरखेड आणि महागाव तालुक्यात बांधकाम कंपनीतर्फे सिमेंट काँक्रिटचा रस्ता तयार केला जात आहे. काही ठिकाणी रस्ता पूर्णपणे तयार झाला. मात्र अल्पावधीतच त्याला तडे गेले आहे. यामुळे सिमेंट रस्त्याच्या गुणवत्तेबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे. या रस्त्याने धावणाऱ्या वाहनधारकांसाठी हे तडे भविष्यात अडचणीचे ठरण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
उमरखेड ते मार्लेगावदरम्यान या रस्त्याला अवघ्या तीन महिन्यातच तडे गेले आहे. या सिमेंट रस्त्यावर आतापर्यंत कोट्यवधींचा खर्च झाला. मात्र अल्पावधीतच तडे गेल्याने बांधकाम कंपनीचे पितळ उघडे पडले आहे.
नवनिर्मित रस्त्यावरून वाहतूक सुरू होताच रस्त्याची गुणवत्ता दिसून आली. चौपदरीकरण होवून अद्याप वर्षेही लोटले नाही. या रस्त्याची विविध विभागांनी तपासणीसुद्धा केली. गुणनियंत्रण विभागानेही तपासणी करणे गरजेचे आहे. अन्यथा भविष्यात तड्यांच्या ठिकाणी मोठे खड्डे पडण्याची शक्यता बळावली आहे.
दरम्यान, महागावनजीक कंपनीने मशनरी झाकून ठेवली आहे. काही ठिकाणी काम बंद आहे. त्यामुळे हा रस्ता कधी पूर्णत्वास जाईल, याबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे.
१०० वर्षांची हमी
बांधकाम कंपनीने हा रस्ता १०० वर्षे टिकण्याची हमी दिली आहे. मात्र वर्ष लोटत नाही तोच ठिकठिकाणी रस्त्याला तडे गेले आहे. त्यामुळे कंपनीच्या हमीबाबतही साशंकता निर्माण झाली आहे. वाहनधारकांमध्ये मात्र भीतीचे वातावरण दिसत आहे.