माझी शिक्षकाची भूमिका अत्यंत आवडीची
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2017 22:25 IST2017-08-18T22:24:40+5:302017-08-18T22:25:07+5:30
वृत्तपत्राचे संपादन, विविध विषयांवरील भाषणे, आकाशवाणीचे चिंतन-भाषण, साप्ताहिकातील लेखन, ‘नुटा’चे संघटन, कवी, लेखक या विविध भूमिका मी केल्या असल्या तरी शिक्षकाची भूमिका ही माझी सर्वात आवडती आहे.

माझी शिक्षकाची भूमिका अत्यंत आवडीची
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : वृत्तपत्राचे संपादन, विविध विषयांवरील भाषणे, आकाशवाणीचे चिंतन-भाषण, साप्ताहिकातील लेखन, ‘नुटा’चे संघटन, कवी, लेखक या विविध भूमिका मी केल्या असल्या तरी शिक्षकाची भूमिका ही माझी सर्वात आवडती आहे. कारण, जीवनाचा अर्थ सांगणारा संदेश शिक्षकांना विद्यार्थ्यांकडून मिळत असतो. विद्यार्थी हेच शिक्षकांची प्रेरणा असते, असे प्रतिपादन साहित्यिक प्रा.डॉ. शरद कळणावत यांनी ‘कृतार्थ’ पुरस्कार स्वीकारताना केले. अध्यक्षस्थानी दीपक आसेगावकर, तर प्रमुख वक्ते म्हणून विचारवंत आशुतोष अडोणी होते.
डॉ. कळणावत पुढे म्हणाले, आयुष्यात भीती बाळगण्याचे कारण नाही. आपले कसे होईल, ही काळजी न करता कोणतेही काम करण्याची लाज वाटता कामा नये. आपल्याबरोबर काम करणारी सर्व माणसे सारखी आहेत, बरोबरीची आहेत, ही वागणूक दिली तर माणसे जोडता येतात. डोक्यावर बांधलेला फेटा डोक्यात जाता कामा नये, एवढी काळजी मात्र घ्यायला हवी.
प्रमुख वक्ते आशुतोष अडोणी म्हणाले, ‘कृतार्थ’ पुरस्कार सोहळा हा संवेदनतेचा-आत्मियतेचा, हृदयंगम सोहळा आहे. डॉ. कळणावत यांच्या साहित्याची जातकुळीच वेगळी आहे.
अध्यक्ष दीपक आसेगावकर यांचे यावेळी मार्गदर्शन झाले. आचार्य पदवी प्राप्त झाल्याबद्दल सतपाल सोहळे यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक विद्या शेट्टीवार यांनी केले. संचालन जयंत चावरे यांनी, तर सन्मान पत्राचे वाचन मंगेश खुने यांनी केले. विचारपीठावर कृतार्थ पुरस्कार समितीचे कार्याध्यक्ष असलम गफ्फार खान, आयोजन समितीचे अध्यक्ष अनंत कवलगीकर, लीलाताई बनगीनवार आदींची उपस्थिती होती.