यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्यात एकतर्फी प्रेमातून युवतीचा खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 19:15 IST2021-05-15T18:13:38+5:302021-05-15T19:15:11+5:30
Yawatmal news एकतर्फी प्रेमप्रकरणातून गावातीलच युवकाने युवतीच्या घरी जावून गुप्तीने भोसकून निर्घृण खून केल्याची खळबळनजक घटना पुसद तालुक्यातील खंडाळा पोलीस ठाण्यांतर्गत रामपूरनगर येथे घडली.

यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्यात एकतर्फी प्रेमातून युवतीचा खून
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : एकतर्फी प्रेमातून तरुणाने एका युवतीचा चाकू व गुप्तीने भोसकून खून केला. तालुक्यातील रामपूरनगर येथे शनिवारी (१५ मे) सकाळी ९.३० वाजताच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली. यातील आरोपीला सायंकाळच्या सुमारास खंडाळा पोलिसांनी धनसळ परिसरातील जंगलातून अटक केली.
सुवर्णा अर्जुन चव्हाण (२१) असे मृत युवतीचे नाव आहे. आकाश श्रीराम आडे (२५) असे आरोपी युवकाचे नाव आहे. खंडाळा पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या रामपूरनगरात ही घटना घडली. मृत युवती सुवर्णा आणि आरोपी आकाश हे दोघेही एकाच गावात राहात होते. त्यांच्यात ओळख झाली. आकाश हा सुवर्णावर एकतर्फी प्रेम करीत होता. सुवर्णाने दहावीपर्यंतचे शिक्षण गावात घेतले. त्यानंतर तिने पुसद येथे बारावीचे शिक्षण घेऊन नंतर डीएड पदविका प्राप्त केली. त्यानंतर ती गावी आई-वडिलांसोबत राहत होती.
शनिवारी सकाळी सुवर्णाचे आई व वडील पांढुर्णा (केदारलिंग) येथे एका नातेवाईकाच्या लग्नासाठी गेले होते तर तिचा भाऊ श्याम काही कामानिमित्त देवठाणा येथे गेला होता. यावेळी घरी सुवर्णा व तिची वृद्ध आजी होती. सुवर्णा भांडे घासत असताना आरोपी आकाश तिच्या घरी पोहोचला. त्याने सुवर्णाच्या आजीला एका खोलीत कोंडून ठेवले. नंतर भांडे घासत असणाऱ्या सुवर्णावर चाकू व गुप्तीने सपासप वार केले. काही क्षणातच सुवर्णा रक्ताच्या थारोळ्यात कोसळली. त्यानंतर आकाशने घटनास्थळावरून पळ काढला.
या घटनेची माहिती गावकऱ्यांनी खंडाळा पोलिसांना व तिच्या पालकांना दिली. पोलिसांनी त्वरित घटनास्थळ गाठले. गंभीर जखमी अवस्थेत सुवर्णाला पुसद येथील एका खासगी रुग्णालयात नेले. मात्र काही वेळातच उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.
पाच पथके होती मागावर
आरोपी फरार झाल्याने खंडाळा पोलिसांनी त्याचा शोधासाठी पाच पथक तयार केले होते. अखेर शनिवारी सायंकाळी आकाशला धनसळ परिसरातील जंगलातून अटक करण्यात आली.
दोनही कुटुंब सर्वसाधारणच
मृतक सुवर्णा व आरोपी आकाश या दोघांचेही कुटुंब सर्वसाधारणच आहे. रोजमजुरी करून त्यांचा उदरनिर्वाह चालतो. काही महिन्यांपासून आकाश सुवर्णावर एकतर्फी प्रेम करीत होता. याची तिला खबरबातही नव्हती. अखेर शनिवारी आकाशने तिचे घर गाठून निर्घृण खून केला. या घटनेने संपूर्ण गावात खळबळ उडाली आहे.