बायको पळविल्याच्या रागातून युवकाचा खून; यवतमाळ जिल्ह्यातील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2020 18:45 IST2020-08-13T18:44:04+5:302020-08-13T18:45:11+5:30
वर्षभरापूर्वी लग्न करून आणलेल्या पत्नीला जवळच्या मित्रानेच फूस लावून पळविले. याचा वचपा काढण्यासाठी मध्यरात्री मित्राच्या घरात शिरून त्याला ठार केले. ही थरारक घटना यवतमाळ शहरालगतच्या भोयर येथे घडली.

बायको पळविल्याच्या रागातून युवकाचा खून; यवतमाळ जिल्ह्यातील घटना
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : वर्षभरापूर्वी लग्न करून आणलेल्या पत्नीला जवळच्या मित्रानेच फूस लावून पळविले. याचा वचपा काढण्यासाठी मध्यरात्री मित्राच्या घरात शिरून त्याला ठार केले. ही थरारक घटना यवतमाळ शहरालगतच्या भोयर येथे घडली. यातील आरोपीला ग्रामीण पोलिसांनी अटक केली.
रंगराव श्रावण घोटेकर (३५) रा.चाणी असे आरोपीचे नाव आहे. रंगरावने वर्षभरापूर्वी लग्न केले होते. त्याच्या पत्नीला त्याचा जवळचा मित्र असलेल्या गणेश शंकर टेकाम (३४) याने पळवून नेले. तो रंगरावच्या पत्नीसह भोयर येथे राहात होता. या घटनेपासून रंगरावच्या मनात प्रचंड राग होता. मंगळवारी सायंकाळी रंगरावने गणेशच्या घरी येऊन त्याच्यासोबत वाद घातला. यावेळी दोघांमध्ये चांगलीच झटापट झाली. पत्नी सोबत येत नाही हे पाहून चिडलेल्या रंगरावने गणेशला जीवानिशी ठार करण्याची धमकी दिली व निघून गेला.
मध्यरात्री १ वाजता रंगरावने झोपडीवजा घरात शिरून गणेशवर झोपेतच हल्ला चढविला. त्याच्या छातीवर लाथाबुक्क्यांचे जबर प्रहार केले. गणेशला वाचविण्यासाठी भाग्यश्री धावून आली. मात्र रंगराव जुमानला नाही. यातच गणेशचा जागीच मृत्यू झाला. नंतर रंगराव घटनास्थळावरून पळून गेला. याप्रकरणी भाग्यश्रीने दिलेल्या तक्रारीवरून रंगरावविरूद्ध ग्रामीण पोलिसांनी गुन्हा दाखल केला. ठाणेदार संजय शिरभाते यांनी आरोपी रंगरावला चाणी(कामठवाडा) येथून गुरुवारी ताब्यात घेतले. त्याच्या अटकेची कार्यवाही सुरू होती.