Mudana-Sadhunagar seal, police stationed | मुडाणा-साधूनगर सील, पोलिसांच्या राहुट्या तैनात

मुडाणा-साधूनगर सील, पोलिसांच्या राहुट्या तैनात

ठळक मुद्देकोरोनामुळे सराफा व्यावसायिकाचा मृत्यू : तीन सुवर्णकार स्वत:हून क्वारंटाईन, गावकऱ्यांचीही तपासणी सुरू

लोकमत न्यूज नेटवर्क
मुडाणा : कोरोनामुळे येथील एका इसमाचा मृत्यू होताच प्रशासनाने त्याच्या संपर्कातील सर्वांना क्वारंटाईन केले आहे. तर तातडीची दक्षता म्हणून संपूर्ण गाव सील करण्यात आले आहे. गावात दोन्ही बाजूंनी येणारे प्रमुख मार्ग बंद करून तेथे पोलीस तैनात करण्यात आले आहे.
येथील एक इसम महागावात सराफा व्यवसाय करतो. काही दिवसांपूर्वी तो जळगावातून परतल्यानंतर त्याला प्रकृती अस्वस्थ जाणवू लागली. तपासणीदरम्यान तो कोरोना पॉझिटिव्ह निघाला. दुर्दैवाने सोमवारी रात्री त्याचा मृत्यू झाला. आता गाव सील करण्यात आले आहे. त्याला चार मुली असून त्यांना क्वारंटाईन करण्यात आले. त्याच्या संपर्कात आलेल्या इतरांनाही क्वारंटाईन करण्यात आले आहे. तर तीन सोनार स्वत:हून क्वारंटाईन झाले.
महसूल, आरोग्य व पोलीस यंत्रणेने गाव सील केले आहे. आशा सेविकेच्या माध्यमातून गावकऱ्यांची तपासणी सुरू करण्यात आली आहे. राहुटीवर पोलीस शिपाई रुपेश डोंगरे, होमगार्ड गजानन तरटे, ग्रामविकास अधिकारी गजानन टाके, सामाजिक कार्यकर्ते मयूर काळे, ज्ञानेश्वर पानपट्टे व ग्रामपंचायत लिपिक संतोष धुळधुळे तैनात आहे. सध्या गावात कुणालाही प्रवेश नाही. तर गावातून कुणीही बाहेर जाण्यावर निर्बंध घालण्यात आले आहे. गावकºयांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

Web Title: Mudana-Sadhunagar seal, police stationed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.