वेगळ्या विदर्भासाठी आंदोलन
By Admin | Updated: April 1, 2015 23:53 IST2015-04-01T23:53:59+5:302015-04-01T23:53:59+5:30
विदर्भ राज्य आंदोलन समितीने वेगळ्या विदर्भ राज्याच्या निर्मितीसाठी बुधवारी येथील बसस्थानक चौकात ‘स्टिकर्स लावा’ आंदोलन केले. ..

वेगळ्या विदर्भासाठी आंदोलन
दीड हजार वाहनांना लावले स्टिकर्स : अनुशेष दूर करण्याची मागणी
यवतमाळ : विदर्भ राज्य आंदोलन समितीने वेगळ्या विदर्भ राज्याच्या निर्मितीसाठी बुधवारी येथील बसस्थानक चौकात ‘स्टिकर्स लावा’ आंदोलन केले. तब्बल दीड हजार वाहनांना स्टीकर्स लावण्यात आले. यावेळी वेगळ्या विदर्भासाठी नारेबाजी करण्यात आली.
१९०५ सालापासून स्वतंत्र विदर्भ राज्याची मागणी जोर धरून आहे. यानंतरही सरकारने विदर्भ राज्य निर्माण केले नाही. जनतेमध्ये याचा प्रचंड रोष आहे. पश्चिम महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधींनी काँग्रेसला बहुमत मिळावे म्हणून विदर्भाला नागपूर कराराच्या रूपाने आश्वासने दिली. मात्र पूर्तता केली नाही. यातून सिंचन घटले. शेती बुडाली. उद्योग संपले. शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या. हे विदर्भाचे भीषण वास्तव आहे. वीज विदर्भात तयार होते, तर मुंबईत झगमगाट होतो.
पाच लाख २६ हजार कृषिपंपांचा अनुशेष आजही कायम आहे. या स्थितीत १३२ वीज प्रकल्प विदर्भात येणार आहे. यामुळे प्रदूषण वाढेल. विजेचा फायदा मात्र पश्चिम महाराष्ट्रालाच होईल. हे वास्तव बदलण्यासाठी स्वतंत्र विदर्भ राज्य निर्माण करणे, हाच एकमेव पर्याय असल्याचे मत विदर्भ राज्य आंदोलन समितीने म्हटले आहे.
आंदोलनाचे नेतृत्व प्रकाश पांडे, दत्ता चांदूरे, अॅड.अजय चमेडिया, कृष्णराव भोंगाडे, विजय निवल, अशोक कपिले, राजेंद्र हेंडवे, दिलीप गौतम, जयवंत बापट, प्रदीप धामणकर, जितेंद्र हिंगासपुरे, हनवंतराव देशमुख, चित्रा मुडे आदींनी केले. या आंदोलनात विदर्भवादी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. (शहर वार्ताहर)