यवतमाळमध्ये आई व मुलीला डांबून वर्षभरापासून अघोरी कृत्य

By सुरेंद्र राऊत | Updated: July 7, 2025 19:49 IST2025-07-07T19:48:55+5:302025-07-07T19:49:38+5:30

शेजाऱ्यांमुळे वाचले प्राण : पोलिसांची धाड पडताच मांत्रिकाने कापला गळा

Mother and daughter held captive in Yavatmal for a year, brutal act | यवतमाळमध्ये आई व मुलीला डांबून वर्षभरापासून अघोरी कृत्य

Mother and daughter held captive in Yavatmal for a year, brutal act

यवतमाळ : शहरातील वंजारी फैल भागात शववाहिनीवर चालक म्हणून असणाऱ्या एकाने भोंदूगिरी सुरू केली. याला विभक्त राहणारी महिला बळी पडली. उपचारासाठी तिला मांत्रिकाने स्वत:च्या घरातच डांबून ठेवले. त्या महिलेच्या १४ वर्षीय मुलीवरही अघोरी उपचार करत होता. तब्बल वर्षभरापासून सुरू असलेला हा प्रकार शेजाऱ्यांनी पोलिसांना सांगितला, त्यावरून शहर पोलिसांनी सोमवारी दुपारी धाड टाकून पीडित महिला व मुलीची सुटका केली.

महादेव परशुराम पालवे उर्फ माऊली असे या मांत्रिकाचे नाव आहे. तो एका ट्रस्टच्या शववाहिनीवर चालक म्हणून काम करतो. महादेवची पत्नी व मुलगी त्याच्यासोबत झोपडी वजा घरात राहतात. महादेवकडे उपचारासाठी नीतू रामप्रसाद जयस्वाल रा. बाजीरावनगर दिग्रस ही महिला येत होती. तिच्यासोबत तिची मुलगी होती. नंतर महादेवने त्या महिलेला संमोहित करून स्वत:च्या घरी ठेवून घेतले. नीतू सोबत तिची मुलगीही महादेवच्या घरी राहू लागली. उपचाराच्या नावाखाली महादेव नीतूवर अघोरी कृत्य करू लागला. नंतर त्याने नीतूची मुलगी आजारी असल्याचे सांगून तिच्यावरही हे उपाय सुरू केले.

महादेव दोन्ही मायलेकींना चटके देत होता, बेदम मारहाण करीत होता, एका पडक्या खोलीत दोघींना रात्रंदिवस डांबून ठेवले होते. महादेव मनात आले तरच जेवण देत असे. कित्येक दिवस उपाशी राहिल्याने दोघी मायलेकी अशक्त झाल्या आहेत. अघोरी पूजा व उपचार करणाऱ्या महादेवच्या मागील दोन दिवसात हालचाली वाढल्या. त्याने स्वत:च्या घरातच देव्हाऱ्याच्या बाजूला मोठा खड्डा खोदला होता. अमावश्या असल्याने नीतूच्या मुलीचा नरबळी देण्याचा प्रयत्न असल्याचा संशय पोलिसांना धाड टाकल्यावर आला.

पोलिस देवघरात जाताच महादेवने कापला गळा
कारवाईसाठी शहर ठाणेदार रामकृष्ण जाधव शोध पथक घेवून महादेवच्या घरी धडकले. नीतू जयस्वाल व तिच्या मुलीची सुटका केली. नंतर घर झडती घेताना पोलिस देवघरात पोहोचताच महादेवने चाकूने स्वत:चा गळा कापला. त्यामुळे पोलिसही भांबावले. कारवाई थांबवून महादेवला रुग्णालयात हलविण्यात आले.

तिने खाल्ल्या एकाच वेळी आठ पोळ्या

महादेवच्या तावडीतून नीतू व तिच्या मुलीची पोलिसांनी सुटका केली. अनेक दिवसांपासून उपाशी असल्याने त्यांनी जेवण मागितले. शेजारी नागरिकांनी त्यांना जेवू घातले. यावेळी उपाशी असलेल्या मुलीने एकाच वेळी सात पोळ्या फस्त केल्या. यावरून त्यांचे किती हाल करण्यात आले, याची कल्पना येते.
 

विभक्त नीतूच्या मानसिकतेचा गैरफायदा
पतीपासून विभक्त झालेली नीतू मुलीला घेवून दारव्हा येथे भाड्याच्या खोलीत राहत होती. तिची प्रकृती वारंवार बिघडत असल्याने ती उपचारासाठी मांत्रिक महादेवच्या संपर्कात आली. येथूनच नीतू व तिच्या मुलीचा छळ सुरू झाला. वडील व पती यांच्याकडून विचारणा होत नसल्याने महादेवने मनमानी पद्धतीने त्यांच्यावर अघोरी उपचार केले.

प्लास्टिक पिशवीत करत होत्या शौच

नीतू व तिच्या मुलीला शौचासाठीही बाहेर जाण्यास बंदी होती. खोलीतच दोघीही मायलेकी प्लास्टिक पिशवीत शौच करून तेथेच बांधून ठेवत होत्या. पोलिस कारवाईमध्ये शौचाने भरलेल्या पिशव्यांचा मोठा साठाच त्या खोलीत आढळून आला. तेथेच दिवसरात्र मायलेकी राहत होत्या.

Web Title: Mother and daughter held captive in Yavatmal for a year, brutal act

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.