धनगर बांधवांचा मेंढरांसह मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2018 22:00 IST2018-08-27T22:00:29+5:302018-08-27T22:00:44+5:30
धनगर समाजाला तत्काळ आरक्षण लागू करण्यात यावे या मागणीसाठी धनगर समाज संघर्ष समिती सोमवारी मेंढरांसह रस्त्यावर उतरली. यावेळी आंदोलकांनी राज्य शासनाचा निषेध नोंदविला. अहिल्यादेवींच्या जयंतीपर्यंत आरक्षण लागू करण्याचा अल्टीमेटम मोर्चेकऱ्यांनी दिला.

धनगर बांधवांचा मेंढरांसह मोर्चा
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : धनगर समाजाला तत्काळ आरक्षण लागू करण्यात यावे या मागणीसाठी धनगर समाज संघर्ष समिती सोमवारी मेंढरांसह रस्त्यावर उतरली. यावेळी आंदोलकांनी राज्य शासनाचा निषेध नोंदविला. अहिल्यादेवींच्या जयंतीपर्यंत आरक्षण लागू करण्याचा अल्टीमेटम मोर्चेकऱ्यांनी दिला.
महात्मा फुले चौकातून मोर्चाला प्रारंभ झाला. मोर्चामध्ये मेंढ्याचा कळपही आणला होता. यावेळी मेंढपाळ आणि धनगर बांधवांनी ‘येळकोट येळकोट जय मल्हार’चे नारे दिले. हातात पिवळा ध्वज, हळदेची उधळण आणि पारंपरिक वाद्याच्या गजरात मोर्चाने आगेकूच केली. नेताजी मार्केट, दत्त चौक, बसस्थानक चौकातून फिरल्यावर तिरंगा चौकात मोर्चाचा समारोप झाला.
धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या आरक्षणाची ८ सप्टेंबरपर्यंत अंमलबजावणी करण्यात यावी, मेंढपाळांना ताबडतोब चराईची पास देण्यात यावी, सोलापूर विद्यापीठाला अहिल्यादेवी होळकरांचे नाव देण्यात यावे, धनगर विद्यार्थ्यांसाठी तालुकास्तरावर वसतिगृह उभारण्यात यावे आदी या मागण्यांचे निवेदन जिल्हा प्रशासनाकडे देण्यात आले. एलआयसी चौकात सभा घेण्यात आली.
संघटनेचे अध्यक्ष अविनाश जानकर, कार्याध्यक्ष रमेश जारंडे, उपाध्यक्ष दीपक पुनसे, सचिव विठ्ठलराव बुचे, कोषाध्यक्ष संदीप खांदवे, पांडुरंग खांदवे, संजय शिंदे पाटील, बाळासाहेब शिंदे, श्रीधर मोहड, डॉ. संदीप धवने, प्रकाश नवरंगे आदी उपस्थित होते.