महिनाभराने होणार दहावी, बारावीची पुरवणी परीक्षा
By Admin | Updated: June 12, 2016 02:15 IST2016-06-12T02:15:06+5:302016-06-12T02:15:06+5:30
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे फेब्रुवारी-मार्चमध्ये घेतलेल्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेचे निकाल नुकतेच जाहीर झाले.

महिनाभराने होणार दहावी, बारावीची पुरवणी परीक्षा
वणी : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे फेब्रुवारी-मार्चमध्ये घेतलेल्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेचे निकाल नुकतेच जाहीर झाले. या परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची पुरवणी परीक्षा महिनाभरानेच घेतली जाणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाणार नाही.
येत्या जुलै-आॅगस्टमध्ये होणाऱ्या दहावी व बारावीच्या पुरवणी परीक्षेचे वेळापत्रक शिक्षण मंडळाने प्रसिद्ध केले आहे. त्यानुसार बारावीची परीक्षा ९ जुलैपासून सुरू होऊन २९ जुलैपर्यंत चालणार आहे. १ जुलै ते ८ जुलैदरम्यान तोंडी व प्रात्याक्षिक परीक्षा होणार आहे. दहावीची लेखी परीक्षा १८ जुलैपासून सुरू होऊन तीन आॅगस्टपर्यंत चालणार आहे. या परीक्षेसाठी आॅनलाईन आवेदपत्रे भरणे सुरू आहेत.
बारावीची आवेदनपत्र विलंब शुल्कासह १४ जुनपर्यंत भरली जाईल, तर दहावीची आवेदनपत्र १० ते २० जुनपर्यंत व विलंब शुल्कासह २१ ते २४ जूनपर्यंत भरता येणार असल्याचे मंडळाने प्रसिद्धीपत्रकाव्दारे जाहीर केले आहे. (स्थानिक प्रतिनिधी)