जनुनाची महाराष्ट्रात ‘आदर्श’ ओळख
By Admin | Updated: September 6, 2016 02:13 IST2016-09-06T02:13:44+5:302016-09-06T02:13:44+5:30
तालुक्यातील दऱ्या खोऱ्यात वसलेले जनुना गाव आज संपूर्ण महाराष्ट्राला माहीत झाले आहे. ही किमया घडविली

जनुनाची महाराष्ट्रात ‘आदर्श’ ओळख
के. बी. पठाण : राष्ट्रीय कार्याला झोकून देणाऱ्या शिक्षकाची राज्यस्तरावर दखल
अविनाश खंदारे ल्ल उमरखेड
तालुक्यातील दऱ्या खोऱ्यात वसलेले जनुना गाव आज संपूर्ण महाराष्ट्राला माहीत झाले आहे. ही किमया घडविली येथील एका शिक्षकाने. राष्ट्रीय कार्यासाठी झोकून देऊन काम करणाऱ्या के. बी. पठाण यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार घोषित झाला आणि अख्ख्या तालुक्याला आनंद झाला.
अत्यंत गरीब कुटुंबात आणि खडतर परिस्थितीत पठाण यांनी शिक्षण पूर्ण केले. वडील वसंत सहकारी साखर कारखान्यात हंगामी कर्मचारी होते. त्यामुळे घरची परिस्थिती जेमतेम होती. हलाखीची जाणीव असलेले खुर्शिदखॉ बिस्मिल्लाखॉ पठाण हे २२ वर्षांपूर्वी उमरखेड तालुक्यातील अंबाळी गावाला ११ वर्षे शिक्षक होते. तेथे त्यांनी इंग्रजी लॅब निर्माण केली. विद्यार्थी इंग्रजीत बोलत होते. त्यांच्या काळात शाळेल अनेक पुरस्कारही मिळाले. त्यानंतर २००५ साली जनुना येथील जिल्हा परिषद शाळेत त्यांची बदली झाली. अंबाळीतील अनुभवाची शिदोरी सोबत असल्यामुळे जनुनातील विद्यार्थ्यांची प्रगती जोमात सुरू होती. गावकरीही शाळा आदर्श बनविण्यासाठी धडपड करू लागले. के. बी. पठाण यांच्या धडपडील सहकारी शिक्षकांचीही साथ मिळू लागली. बंजारा आणि आदिवासीबहुल असलेले आणि डोंगर कपारीत वसलेले जनुना गाव बदलू लागले. त्याचबरोबर शाळेचेही नाव होऊ लागले.
अमरावतीला जिल्हा समाजकल्याण अधिकारी भाऊराव चव्हाण, सावनेरचे मुख्याधिकारी विनोद जाधव, वर्धा येथील कृषी अधिकारी गोवर्धन चव्हाण, महाराष्ट्रात युवा उद्योजक म्हणून ओळख असलेले शंकर बळीराम चव्हाण तसेच काही महिन्यापूर्वीच एमपीएससीच्या उपजिल्हाधिकारी पदाच्या परीक्षेत राज्यात दुसरा आलेला रवींद्र राठोड हे सर्व जण याच शाळेतून घडले. जनुना गावातील अनेक विद्यार्थी याच शाळेत शिकून डॉक्टर, इंजिनियर झालेत.
विद्यादान करणाऱ्या खुर्शिदखॉ बिस्मिल्लाखॉ पठाण या सहायक शिक्षकाने राष्ट्रीय कार्यालया झोकून दिले आहे. १५ वर्षांच्या सेवाकाळात केलेल्या कार्याची पावती त्यांना विविध पुरस्काराच्या रुपात मिळाली. २००६ मध्ये आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला. २००३-०४ मध्ये विद्यार्थ्यांच्या गुणात्मक प्रगतीसाठी केलेल्या कार्याबद्दल सन्मानपत्र देण्यात आले. विद्यार्थ्यांसाठी पठाण यांच्या पुढाकारात विविध उपक्रम राबविण्यात येत आहे. यापूर्वी अंबाळी येथे असताना उत्कृष्ट शैक्षणिक साहित्य व इंग्रजी प्रयोगशाळा त्यांनीच निर्माण केली. प्रयोगशाळेला अनेक मान्यवरांनी भेटी देऊन उत्तम अभिप्राय नोंदविले. तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन, लेझिम स्पर्धा, गायन स्पर्धा आदींमध्ये त्यांच्या मार्गदर्शनात तयार झालेल्या विद्यार्थ्यांनी मोठी मजल मारली. शाळेत येणाऱ्या अधिकाऱ्यांसोबत या विद्यार्थ्यांनी इंग्रजीमध्ये संवाद साधला. उत्साही, धडपडे, उपक्रमशील, प्रयोगशील, परिश्रमी आदर्श शिक्षक अशी के. बी. पठाण यांची ओळख आहे. त्यांना मिळालेल्या राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने जनुना गावाची संपूर्ण महाराष्ट्रात वेगळी ओळख निर्माण झाली आहे.
पोफाळी, अंबाळी, जनुनात जल्लोष
४जनुना जिल्हा परिषद शाळेचे सहायक शिक्षक के. बी. पठाण यांना महाराष्ट्र शासनाने राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार घोषित केला. ही वार्ता कळताच उमरखेड तालुक्यातील पोफाळी, अंबाळी आणि जनुना या गावांमध्ये जल्लोष करण्यात आला. जनुनामध्ये पठाण कार्यरत आहे. अंबाळीत त्यांनी पूर्वी काम केले आहे.