आमदार एप्रिलपर्यंत ‘वेटींग’वर

By Admin | Updated: November 20, 2014 22:58 IST2014-11-20T22:58:41+5:302014-11-20T22:58:41+5:30

जिल्ह्यातील भाजपाच्या पाचही आमदारांना विकास निधीसाठी एप्रिलपर्यंत वेटींगवर रहावे लागणार आहे. कारण आमदार निधीचे दोन कोटी रूपये काँग्रेस आमदारांनी विधानसभा निवडणुकीपूर्वीच पूर्ण खर्च केले.

MLAs wait till 'waiting' | आमदार एप्रिलपर्यंत ‘वेटींग’वर

आमदार एप्रिलपर्यंत ‘वेटींग’वर

विकास निधी : काँग्रेस आमदारांनी दोन कोटींचा निधी निवडणुकीपूर्वीच केला खर्च
राजेश निस्ताने - यवतमाळ
जिल्ह्यातील भाजपाच्या पाचही आमदारांना विकास निधीसाठी एप्रिलपर्यंत वेटींगवर रहावे लागणार आहे. कारण आमदार निधीचे दोन कोटी रूपये काँग्रेस आमदारांनी विधानसभा निवडणुकीपूर्वीच पूर्ण खर्च केले.
यवतमाळ जिल्ह्यात सात पैकी पाच जागा भाजपाने पटकाविल्या आहेत. यापूर्वी या जागा काँग्रेसकडे होत्या. २०१४ च्या निवडणुकीत यवतमाळातून मदन येरावार, राळेगावमधून प्रा.डॉ.अशोक उईके, उमरखेडमधून राजेंद्र नजरधने, वणीतून संजीवरेड्डी बोदकुरवार तर आर्णी-केळापूरमध्ये राजू तोडसाम निवडून आले. यातील येरावार वगळता भाजपाचे अन्य चारही आमदार पहिल्यांदाच विधानसभेवर गेले आहेत. गेली महिनाभर हार-तुरे, सत्कारात निघून गेल्यानंतर आता हे आमदार विकास कामांचा विचार करीत आहेत. सत्कार घेणारी मंडळीही आपल्या गावाला, संस्थेला निधी मिळावा, आपली रस्ते, नाल्या, समाज मंदिर, प्रवासी निवारे आदी विकास कामांसाठी निधी मिळावा म्हणून आस लावून आहेत. सत्कार घेणाऱ्यांचा छूपा अजेंडा ओळखून आमदारही आश्वासन देण्यात कुठे कमी पडताना दिसत नाहीत. तुमच्या गावाचा सर्वागिण विकास करू, समस्या सोडवू, कायापालट करू असे भरीव आश्वासन ही आमदार मंडळी देत आहेत. मात्र प्रत्यक्षात या आमदारांकडे सध्या तरी कोणताही विकास निधी उपलब्ध नाही. या निधीसाठी त्यांना आणखी चार महिने अर्थात नव्या ‘बजेट इअर’ची प्रतीक्षा करावी लागणार आहे. सरकारने प्रतीक्षेत न ठेवता विशेष निधीची काही तरी तरतूद करावी म्हणून भाजपा आमदारांचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती आहे.
आमदारांना आपल्या विधानसभा मतदारसंघातील विकास कामे मार्गी लावण्यासाठी शासन वर्षाकाठी दोन कोटी रुपयांचा निधी देते. हा निधी वर्षभरात खर्च केला जातो. त्यासाठी कधी नागरिक कामे सूचवितात तर कधी आमदार आपल्या सोईने कामांचे प्रस्ताव तयार करतात. बहुतांश आर्थिक वर्ष संपण्यापूर्वी मार्च महिन्यात अधिकाधिक कामांचे प्रस्ताव मंजूर केले जातात. परंतु यावर्षी भाजपाच्या पाच विद्यमान आमदारांवर तशी वेळच येणार नाही. कारण त्यांच्या मतदारसंघासाठीचा आमदार निधीच शिल्लक नाही. या पाचही मतदारसंघाचे नेतृत्व आधी काँग्रेसकडे होते. नंदिनी पारवेकर, वसंत पुरके, विजय खडसे, वामनराव कासावार, शिवाजीराव मोघे या काँग्रेस आमदारांनी विधानसभेच्या निवडणुका लागण्यापूर्वीच आपला सन २०१४-१५ वर्षासाठी तरतूद झालेला दोन कोटींचा वार्षिक निधी पूर्णत: खर्च केला. त्यामुळे नव्याने निवडून आलेल्या आमदारांना आता निधीसाठी वाट पाहण्याशिवाय पर्याय नाही. काँग्रेस आमदारांनी दोन कोटींच्या विकास निधीतून मंजूर केलेली कामे प्रत्यक्षात सुरू झाली की नाही, हा मात्र संशोधनाचा विषय ठरला आहे.
पुसदमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे मनोहरराव नाईक तर दिग्रसला शिवसेनेचे संजय राठोड आमदार आहेत. त्यांनीही आपला बहूतांश निधी निवडणूकीपुर्वी खर्च केला. मात्र ते पुन्हा निवडून आल्याने त्यांची तेवढी अडचण होताना दिसत नाही.

Web Title: MLAs wait till 'waiting'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.