शहरात अनुदानित सिलिंडरचा गैरवापर
By Admin | Updated: June 26, 2014 23:32 IST2014-06-26T23:32:14+5:302014-06-26T23:32:14+5:30
घरगुती वापरासाठी देण्यात येणाऱ्या अनुदानित लाल सिलिंडरचा शहरातील हॉटेल्स, टपऱ्या, चायनीज सेंटर येथे सर्रासपणे गैरवापर केला जात आहे़ यामुळे शासनाचे मोठे नुकसान होत असून डीलर मात्र मालामाल होत आहे़

शहरात अनुदानित सिलिंडरचा गैरवापर
वणी : घरगुती वापरासाठी देण्यात येणाऱ्या अनुदानित लाल सिलिंडरचा शहरातील हॉटेल्स, टपऱ्या, चायनीज सेंटर येथे सर्रासपणे गैरवापर केला जात आहे़ यामुळे शासनाचे मोठे नुकसान होत असून डीलर मात्र मालामाल होत आहे़
गॅस सिलिंडरचा काळाबाजार रोखण्यासठी तेल कंपन्यांनी ग्राहकांना थेट आॅनलाईनद्वारे कंपन्यांशी जोडले़ त्यावरही मात करून डिलर अनुदानित गॅस सिलिंडर दुप्पट भावाने विकून प्रचंड नफा कमावीत आहे़ ग्राहकांना घरगुती वापरासाठी वर्षातून १० सिलिंडर अनुदानाच्या दरात दिले जातात़ त्यानंतरचे सिलिंडर पूर्ण किंमतीला घ्यावे लागते़ व्यावसायीक उपयोगासाठी कंपन्यांनी विना अनुदानाचे १९ किलोचे निळे सिलिंडर उपलब्ध करून दिले आहे़ परंतु व्यावसायीक हे निळे सिलींडर न वापरता सर्रासपणे लाल सिलिंडरचाच उपयोग करताना दिसत आहे़ टपरीवर एखाद्या कापडाने गुंडाळून असलेले सिलिंडर दिसते़ त्यामध्ये हमखास लाल सिलिंडर आढळून येते़ एका चहा टपरीवर व चायनीज दुकानात दोन-दोन सिलिंडर दिसून येतात़ हे सिलिंडर येतात कुठून, याचे अनेकांना आश्चर्य वाटते़
ग्राहकांना सिलिंडर मिळविण्यासाठी कंपनीकडे एसएमएसद्वारे मागणी नोंदवावी लागते़ त्यानंतर दोन-तीन दिवसांनी सिलिंडर प्राप्त होतो़ मात्र व्यावसायीकांना एक हजार रूपये दिल्यास चटकन लाल सिलिंडर मिळते, असे व्यावसायीकच सांगतात़ येथील तहसील कार्यालयातील अन्न व पुरवठा विभागाने आता शहरात धडक मोहीम राबवून अनुदानित सिलींडरच्या गैरवापराला आळा घालण्याची गरज निर्माण झाली आहे़ (स्थानिक प्रतिनिधी)