मोजक्याच सदस्यांची चलती
By Admin | Updated: July 28, 2016 01:11 IST2016-07-28T01:11:58+5:302016-07-28T01:11:58+5:30
जिल्हा परिषदेत काही मोजक्याच सदस्यांची चलती असल्याची ओरड होत आहे.

मोजक्याच सदस्यांची चलती
जिल्हा परिषद : साधारण सदस्यांना ठेंगा, विकासकामे रेंगाळली
यवतमाळ : जिल्हा परिषदेत काही मोजक्याच सदस्यांची चलती असल्याची ओरड होत आहे. उर्वरित साधारण सदस्यांना सर्वांकडून ठेंगा दाखविण्यात येत असल्याची कुजबूज सुरू आहे. त्यामुळे विकासकांमांनाही खिळ बसते.
जिल्ह्याचे ‘मिनी मंत्रालय’ म्हणून जिल्हा परिषदेची ओळख आहे. याच मिनी मंत्रालयाने आत्तापर्यंत राज्याला अनेक आमदार, खासदार, मंत्री दिले आहेत. राज्यस्तरीय राजकारणात उतरण्यासाठी जिल्हा परिषद हे प्रथम पाऊल म्हणून ओळखले जाते. शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात जिल्हा परिषदेचे प्रचंड आकर्षण आहे. ग्रामीण भागातील जनतेचा जिल्हा परिषदेशी नेहमी संबंध येतो. आपल्या मतदार संघातील सदस्यांकडून अनेक नागरिक आपली कामे करवून घेतात. मात्र सध्या जिल्हा परिषदेत काही मोजक्याच सदस्यांची चलती असल्याची ओरड सुरू आहे.
जिल्हा परिषदेत काही सदस्य गेल्या अनेक वर्षांपासून सतत वावरत आहेत. त्यापैकी काहींनी आत्तापर्यंत पदेही उपभोगली आहेत. मतदारांनी त्यांना अनेकदा सदस्य पदाची संधी दिली आहे. काहींनी तर गेल्या निवडणुकीत आपला मतदार संघ बदलवूनही विजय प्राप्त केला आहे. त्यामुळे त्यांच्यावर मतदारांचा विश्वास असल्याचे अधोरेखीत होत आहे. अशा सदस्यांसह काही मोजक्याच नवोदित सदस्यांची जिल्हा परिषदेत चलती असल्याची ओरड आता होत आहे. त्याला काही सदस्य अपवादही आहेत. ते जनतेची कामे करण्यासाठी नेहमीच आघाडीवर असतात.
जिल्हा परिषदेत उपाध्यक्षांच्याच दालनात सर्वाधिक गर्दी आढळते. गेली अनेक वर्षे ते सभागृहात आहेत. त्यांच्याबद्दल त्यांच्या मतदार संघातीलच नव्हे, तर जिल्ह्यातील जनतेच्याही मनातही आदर आहे. जिल्ह्यातील जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी ते नेहमी अग्रेसर असतात. त्यांचा अपवाद वगळता, गेल्या कित्येक वर्षांपासून सभागृहात असलेले काही मोजके सदस्य केवळ आपल्याच मतदार संघातील समस्या सोडविण्यासाठी आग्रही असतात, असा राग आळविला जात आहे. अशाच सदस्यांची जिल्हा परिषदेत चलती आहे. अधिकारी, कर्मचारीही त्यांनाच धार्जीणे दिसतात. सामान्य सदस्यांना ते ठेंगा दाखवितात, अशी ओरड होत आहे. (शहर प्रतिनिधी)