अवकाळीमुळे एप्रिलमध्ये आला मिलमिली नदीला पूर: नेरमध्ये गारपीट
By विशाल सोनटक्के | Updated: April 7, 2023 19:13 IST2023-04-07T19:13:19+5:302023-04-07T19:13:30+5:30
यवतमाळ, बाभूळगाव, महागावमध्ये बरसला पाऊस

अवकाळीमुळे एप्रिलमध्ये आला मिलमिली नदीला पूर: नेरमध्ये गारपीट
यवतमाळ : हवामान विभागाने वर्तविलेला अंदाज पावसाने तंतोतंत खरा ठरविला. शुक्रवारी दुपारी यवतमाळसह बाभूळगाव, महागाव तालुक्यात अवकाळी पाऊस बरसला. नेरमध्ये गारपीट झाली असून या पावसामुळे नेर बसस्थानकाजवळच्या मिलमिली नदीला पूर आला होता. दरम्यान, या पावसामुळे आंब्यासह गहू, कांदा पिकांचे नुकसान झाले असून भाजीपाल्यालाही या पावसाचा फटका बसला आहे.
हवामान विभागाने शुक्रवार आणि शनिवार या दोन दिवसात गारपीटीसह वादळी पाऊस होण्याचा अंदाज वर्तविला होता. शुक्रवारी सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. दुपारच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. यवतमाळमध्ये या पावसामुळे व्यापाऱ्यांची धावपळ उडाली. यवतमाळ शहरात सुमारे अर्धा तास पाऊस बरसला. नेरमध्ये दुपारी ३ च्या सुमारास जोरदार पावसाला सुरुवात झाली.
या ठिकाणी गारपीटही झाली असून सुमारे दीड तास झालेल्या पावसाने पिकांचे अतोनात नुकसान केले आहे. बाभूळगाव, महागावमध्येही अवकाळी पाऊस बरसला आहे. दरम्यान, या पावसादरम्यान महागाव तालुक्यातील पेढी येथे दिगंबर माधवराव भाराटे यांच्या शेतात वीज कोसळून त्यात गाईचा मृत्यू झाला. तर महागाव तालुक्यातीलच मौजा संगम येथे धुऱ्यावर बोरीच्या झाडावर वीज कोसळल्याने रेणुकादास वामन शिंदे यांच्या दोन बैलांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती कळताच हिवरा येथील तलाठ्यांनी घटनास्थळी जावून पंचनामा केला असून याचा प्राथमिक अहवाल महागाव तहसीलदारांकडे पाठविण्यात आला आहे.
जिल्हा प्रशासनाने जारी केला अलर्ट
शुक्रवारी यवतमाळसह जिल्ह्याच्या विविध भागात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने शेतकऱ्यांचे नुकसान केले. शनिवार ८ एप्रिल रोजीही जिल्ह्याच्या काही भागात अवकाळी पावसासह गारपीट होण्याचा अंदाज प्रादेशिक मौसम पूर्वानुमान केंद्र नागपूर यांनी वर्तविला आहे. या अनुषंगाने निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार वऱ्हाडे यांनी नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.
उन्हाळ्यात पूर पाहण्यासाठी बघ्यांची गर्दी
नेर येथे दुपारी ३ ते ४:३० या दीड तासात जोरदार पाऊस झाला. काही ठिकाणी तुरळक गारपीट झाली आहे. या पावसामुळे नेर शहरातील मिलमिली नदीला पूर आला. ऐन उन्हाळ्यात आलेला हा पूर पाहण्यासाठी नागरिकांनी नदी काठावर गर्दी केली हेाती. दरम्यान पावसामुळे अनेकांच्या घरावरील टीनपत्रे उडाली असून गहू, भाजीपाल्यासह आंब्याचे नुकसान झाले आहे. तर टरबूज पिकालाही याचा फटका बसला आहे.