शेतीचा खर्च लाखांमध्ये, उत्पन्न मात्र हजारोतही नाही

By Admin | Updated: October 25, 2014 01:51 IST2014-10-25T01:51:01+5:302014-10-25T01:51:01+5:30

यावर्षी निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांच्या घरात काहीही येऊ शकले नाही. २० एकरातील २० पोते सोयाबीन तेही निकृष्ट दर्जाचे झाले आहे.

Millions of agricultural expenses, not even thousands of income | शेतीचा खर्च लाखांमध्ये, उत्पन्न मात्र हजारोतही नाही

शेतीचा खर्च लाखांमध्ये, उत्पन्न मात्र हजारोतही नाही

महागाव : यावर्षी निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांच्या घरात काहीही येऊ शकले नाही. २० एकरातील २० पोते सोयाबीन तेही निकृष्ट दर्जाचे झाले आहे. २० एकर सोयाबीनचा खर्च २ लाख ४६ हजार रुपये व उत्पन्न मात्र ६० हजार रुपये अशी परिस्थिती बहुतांश शेतकऱ्यांची असल्याने यावर्षी दिवाळीत अपेक्षित विक्री झाली नसल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. बाजारात मंदीची लाट दिसून येत आहे.
दरवर्षी महागाव तालुक्याला केवळ कापड व्यवसायात दोन कोटी रूपयांच्या घरात उलाढाल होते. परंतु यावर्षी मात्र कापड व्यवसायी चांगलेच अडचणीत सापडले. यावर्षी त्यांचा अनुभव काही वेगळा आहे. दिवाळीसारख्या महत्त्वाच्या सणात कापड विक्रीतून केवळ लाखो रूपयांची उलाढाल झाली आहे. किराणा व्यापाऱ्यांचीसुद्धा त्यापेक्षा वेगळी अवस्था नाही. त्यामुळे संपूर्ण बाजारपेठेत मंदीची लाट असल्याचे दिसून येते.
करंजखेड येथील शेतकऱ्यांनी सोयाबीन काढण्यापेक्षा त्यामध्ये जनावरे सोडने पसंत केले. उटी येथील शेतकरी आत्माराम गावंडे यांना २० एकरात, २० क्विंटल सोयाबीन झाल्याचे त्यांनी सांगितले. सोयाबीनला आलेला खर्च पाहता २८ रुपयांची एक याप्रमाणे ४० बॅग लागल्या १ लाख १२ हजार रुपयांच्या बियाण्यांची दोन वेळा पेरणी केली. तीन हजार रुपये किमतीच्या औषधांच्या दोन वेळा फवारणी केली. निंदणासाठी ४० हजार रुपये, राण तयार करायला आलेला खर्च वेगळा. अशा प्रकारे २० एकरला २ लाख ४६ हजार रुपये खर्च आला. उत्पन्न मात्र केवळ २० क्विंटल आजच्या भावाने ६० हजार रुपये या मालाच्या हाती आले आहे. हिच स्थिती सधन शेतकऱ्यांची आहे. इतरांची परिस्थिती याहीपेक्षा बिकट आहे.
यासाठी सोयाबीनचे सामूहिक पंचनामे होणे गरजेचे आहे. माजी जिल्हा परिषद सदस्य पंजाबराव खडकेकर यांनी त्याची सुरूवात केली आहे.
हिवरा सर्कलच्या सर्व शेतकऱ्यांना जागरूक करून सोयाबीनचे पंचनामे तयार करायला सांगितले आहे. तरच शासनासमोर काहीतरी मागता येणार आहे. सोयाबीनचे पंचनामे नसतील तर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई इतर कुठल्याही आधारावर मिळने अशक्य आहे.
त्यासाठी नवनिर्वाचित आमदार राजेंद्र नजरधने यांनी तालुक्यातील सोयाबीनचा प्रश्न सोडविण्यासाठी तालुकास्तरावर प्रशासनाची बैठक घ्यावी आणि कृषी विभाग व महसूल विभागाला यामध्ये गांर्भीयाने लक्ष घालण्यास सांगून पंचनामे करण्यास भाग पाडावे. अशी तालुक्यातील शेतकऱ्यांची मागणी आहे.
(शहर प्रतिनिधी)

Web Title: Millions of agricultural expenses, not even thousands of income

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.