महावितरण कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांची दुरवस्था
By Admin | Updated: November 16, 2014 22:55 IST2014-11-16T22:55:52+5:302014-11-16T22:55:52+5:30
येथील विद्युत उपकेंद्रात कार्यरत कर्मचाऱ्यांसाठी महावितरणे येथे निवासस्थाने बांधली आहेत. मात्र या निवासस्थानांच्या बांधणीनंतर त्यांची दुरुस्ती व देखभाल करण्याकडे दुर्लक्ष झाल्याने आता

महावितरण कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांची दुरवस्था
घोन्सा : येथील विद्युत उपकेंद्रात कार्यरत कर्मचाऱ्यांसाठी महावितरणे येथे निवासस्थाने बांधली आहेत. मात्र या निवासस्थानांच्या बांधणीनंतर त्यांची दुरुस्ती व देखभाल करण्याकडे दुर्लक्ष झाल्याने आता ही निवासस्थाने जीर्ण झाली आहे. परिणामी कर्मचाऱ्यांना तेथे वास्तव्य करणे कठीण झाले आहे.
येथे महावितरणचे ३३ के.व्ही. क्षमतेचे विद्युत उपकेंद्र आहे़ महावितरणचे कनिष्ठ अभियंता कार्यालयही येथे आहे. या केंद्रातून परिसरातील जवळपास २0 ते २५ गावांना वीज पुरवठा केला जातो. त्यामुळे हे उपकेंद्र परिसरासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. त्यासाठीच येथे कर्मचाऱ्यांना राहण्यासाठी महावितरणतर्फे निवासस्थाने बांधण्यात आली होती. त्यात कर्मचाऱ्यांनी वास्तव्य करून ग्राहकांना योग्य सेवा द्यावी, अशी अपेक्षा होती.
महावितरणने येथे निवासस्थाने बांधली क्री, मात्र नंतर त्यांच्या दुरुस्ती आणि डागडुजीकडे दुर्लक्ष केले. तरीही जीर्ण झालेल्या या निवासस्थानांमध्ये काही कर्मचारी कसेबसे वास्तव्य करीत आहे़ तथापि गेल्या कित्येक वर्षांपासून या निवासस्थानांची दुरूस्ती न झाल्यामुळे ही निवासस्थाने आता भकास झाली आहे. त्यांचा मूळ चेहराच गायब झाला आहे. काही निवासस्थानांच्या खिडक्यांच्या काचा फुटलेल्या असून प्रसाधन गृहांची प्रचंड दुरवस्था झाली आहे. या प्रसाधन गृहांमधून आता दुर्गंधी पसरत आहे़ त्याचा त्रास आजूबाजूला राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना होत आहे.
महावितरणच्या या निवासस्थानांसभोवताल घाणीचे साम्राज्य पसरले आहे़ या घाणीची दुर्गंधी सुटल्याने त्यात वास्तवय करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांचे आरोग्य धोक्यात सापडले आहे. त्यांचे कुटुंबिय जीव मुठीत धरून तेथे वास्तव्य करीत आहे. विशेष म्हणजे या निवासस्थानांच्या दुरूस्तीसाठी दरवर्षी निधी येत असल्याचे समजते. तथापि हा कोणत्या निवासस्थानांच्या दुरुस्तीवर अथवा डागडुजीवर खर्च केला जातो, हे एक कोडेच आहे. त्यामुळे हा निधी नेमका जातो कुठे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबत आता महावितरणच्या वरिष्ठांनीच तपासणी करण्याची गरज आहे. (वार्ताहर)