एमआयडीसीत जलवाहिनीचे भूमिपूजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2017 22:43 IST2017-10-01T22:43:21+5:302017-10-01T22:43:38+5:30
येथील औद्योगिक क्षेत्रात टेक्सटाईल पार्कची जलवाहिनी आणि इतर पायाभूत सुविधांचे भूमिपूजन पालकमंत्री मदन येरावार यांच्या हस्ते झाले.

एमआयडीसीत जलवाहिनीचे भूमिपूजन
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : येथील औद्योगिक क्षेत्रात टेक्सटाईल पार्कची जलवाहिनी आणि इतर पायाभूत सुविधांचे भूमिपूजन पालकमंत्री मदन येरावार यांच्या हस्ते झाले. यावेळी मंचावर अमरावती औद्यागिक विकास विभागाचे कार्यकारी अभियंता जे.व्ही. कांगणे, एमआयडीसीचे क्षेत्र व्यवस्थापक डी.डी. पारधी, एमआयडीसी असोसिएशनचे अध्यक्ष नंदलाल सुराणा, रेमण्ड युको डेनीमचे व्यवस्थापक नितीन श्रीवास्तव, जिल्हा उद्योग केंद्राचे व्यवस्थापक दयाल चव्हाण, उपअभियंता हेमंत कुलकर्णी आदी उपस्थित होते.
टेक्सटाईल पार्कमुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात गुंतवणूकदार येतील. त्यामुळे भविष्यात यवतमाळ ही उद्योग नगरी म्हणून उदयास येईल, असा विश्वास ना. येरावार यांनी यावेळी व्यक्त केला.
टेक्सटाईल पार्क जवळपास ९५ हेक्टरवर उभा राहात आहे. टेक्सटाईल पार्कमध्ये २.३० किलोमीटरचे रस्ते, २.३० किमीची पाईप लाईन, ३ एमएलडीवर आधारित सांडपाणी प्रक्रिया, ३ किमीची ड्रेनेज लाईन विकसित होणार आहे. सी-झोनचे काम सुरू आहे. येत्या दोन वर्षात येथे उद्योग सुरु होईल, असे प्रास्ताविक करताना कार्यकारी अभियंता कांगणे यांनी सांगितले.
यावेळी रेमण्डचे नितीन श्रीवास्तव आणि नंदलाल सुराणा यांनीसुध्दा मनोगत व्यक्त केले. एमआयडीसीत आणखी सुविधांची अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली. कार्यक्रमाला उद्योजक, कंत्राटदार व एमआयडीसीचे अधिकारी उपस्थित होते.