शेतकऱ्यांना सोडले व्यापाऱ्यांच्या दयेवर

By Admin | Updated: June 16, 2014 23:45 IST2014-06-16T23:45:31+5:302014-06-16T23:45:31+5:30

जिल्ह्यातील अनेक कृषी उत्पन्न बाजार समित्यांनी मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात कापूस उत्पादक शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांच्या दयेवर सोडल्याचे चित्र समोर आले. आदिवासी तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या

On the mercy of merchants who left the peasants | शेतकऱ्यांना सोडले व्यापाऱ्यांच्या दयेवर

शेतकऱ्यांना सोडले व्यापाऱ्यांच्या दयेवर

यवतमाळ : जिल्ह्यातील अनेक कृषी उत्पन्न बाजार समित्यांनी मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात कापूस उत्पादक शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांच्या दयेवर सोडल्याचे चित्र समोर आले. आदिवासी तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या बाजार समित्या यात आघाडीवर आहे. सहकार विभागानेही या सर्व प्रकाराकडे दुर्लक्ष केल्याने शेतकऱ्यांचा वाली कोण हा प्रश्न निर्माण झाला आहे.
गेल्या आठवड्यात एकाच दिवसात शेतकरी कापूस विक्री करण्यासाठी मार्केट यार्डवर आल्यानंतर हजार, ९००, ७०० रुपये इतके दर दाबले गेले. राष्ट्रीयस्तरावर भाव पडले नसले तरी स्थानिक स्तरावर व्यापाऱ्यांनी ते पाडले. बाजार समित्यांना ही बाब माहीत पडूनही त्यांनी कोणतीही पावले बाजार दर सावरण्यास उचलली नाहीत. उलट व्यापारी जो भाव देत आहे तो मान्य करून कापूस विका, दर पटत नसेल तर परत घेवून जा, आम्ही व्यापाऱ्यांना कापूस खरेदीविषयी सक्ती करू शेत नाही, अशी भूमिका घेतली.
देश, राज्यभराच्या बाजारपेठेतील दराची शेतकऱ्यांना बाजार समितीत आणि घरबसल्याही माहिती मिळते, पण त्याचा उपयोग होत नाही. पावसाळा काही दिवसांवर आला, खरेदीत मोजकेच व्यापारी उरले. उरलेल्या व्यापाऱ्यांनी संधी साधून आपआपले उखळ पांढरे करून घेतले.
सहकार विभागावर शेतकऱ्यांच्या हितसंवर्धनाची जबाबदारी असते तशी रास्त अपेक्षाही असते. पण या विभागाला शेतकऱ्यांची अशी काही लुबाडणूक होत आहे याची साधी कल्पनाही नसावी, याविषयी शंका उपस्थित केली जात आहे. शेवटी-शेवटी दर वाढतील म्हणून अनेक शेतकऱ्यांनी थोडाफार कापूस रोखून ठेवला होता. दरलाभ मिळण्याऐवजी मान मुरगळली गेली. या स्थितीनंतरही राजकीय पक्ष व शेतकऱ्यांच्या संघटनांची भूमिका कोठे दिसली नाही. (वार्ताहर)

Web Title: On the mercy of merchants who left the peasants

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.