‘मेडिकल’चे धुलाई केंद्र पावसाळ्यात कोलमडणार
By Admin | Updated: May 27, 2016 02:10 IST2016-05-27T02:10:09+5:302016-05-27T02:10:09+5:30
येथील शासकीय रूग्णालयात स्वच्छतेच्या नावाने कितीही गलगस्ती असली तरी, रुग्णांच्या बेडवरील चादरी मात्र स्वच्छ असतात.

‘मेडिकल’चे धुलाई केंद्र पावसाळ्यात कोलमडणार
कपडे सुकविण्यासाठी फ्लोरिंगच नाही : ३०० बेडशिटस्ची धुलाई केवळ तिघांवर
अविनाश साबापुरे यवतमाळ
येथील शासकीय रूग्णालयात स्वच्छतेच्या नावाने कितीही गलगस्ती असली तरी, रुग्णांच्या बेडवरील चादरी मात्र स्वच्छ असतात. दररोज हजारो चादरी धुणाऱ्या कामगारांच्या समस्या मात्र प्रशासकीय टेकूविना तुंबल्या आहेत. मेडीकल परिसरातील धुलाई केंद्रात फ्लोरिंग न केल्यास पहिल्याच पावसात धुलाई व्यवस्था कोलमडण्याची शक्यता आहे.
वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात दररोज हजारो रूग्णांची गर्दी असते. येथील रुग्णांना स्वच्छ बेड उपलब्ध असतात. रुग्णालयातील कापडांच्या स्वच्छतेसाठी परिसरातच यांत्रिक धुलाई केंद्र आहे. मात्र, हे केंद्र सध्या अडचणींचा सामना करीत आहे. दररोज अडीचशे ते ३०० बेडशीट धुण्यासाठी केवळ ३ कर्मचारी (धोबी) येथे कार्यरत आहेत. रोजच कामाचा ताण असल्याने त्यांना वर्षातून एकदाही सुट घेता येत नाही. पूर्वी या केंद्रात १० कर्मचारी होते. मात्र, दहा वर्षांपूर्वी काही कर्मचारी निवृत्त झाले तेव्हापासून राजेश चौधरी, मनीष खेळकर, महादेव चौधरी हे तीनच कर्मचारी आहेत. तर रेखा चौधरी यांना २९ दिवसाच्या रोजंदारीवर कामाला ठेवण्यात आले आहे. मेडीकलमधील साधारण ३० वॉर्डातील कपडे दर सोमवारी धुण्यासाठी येतात आणि ते शनिवारी द्यावेच लागतात. आॅपरेशन थिएटरचे कपडे रोज सकाळी आणणे आणि दुसऱ्या दिवशी देणे आवश्यक असते. कपडे देण्यास थोडासाही विलंब झाला, तर एखाद्या रुग्णाची शस्त्रक्रिया स्थगित केली जाते. मात्र, इतके महत्त्वाचे काम असूनही या केंद्राला सुविधा पुरविण्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. मागणी करूनही कर्मचारी वाढविले नाही. कर्मचारी कमी असल्याने कार्यरत कर्मचाऱ्यांना जादा कपडे धुवावे लागतात. त्यातून संसर्ग होण्याचा धोका आहे. या धुलाई केंद्रात एखाद्या खोलीएवढे धुलाई यंत्र आहे. २००२-०३ मध्ये हे १७ लाखांचे यत्र खरेदी करण्यात आले. मात्र, आता या यंत्राची क्षमता घटली आहे. वारंवार बिघाड होत आहे. परंतु, त्याच्या मेंटनन्सकडे लक्ष पुरविले जात नाही. दररोज हजारो कपडे, चादरी वाळविण्यासाठी रुग्णालयाच्या मोकळ्या परिसराचाच वापर करण्यात येत आहे. कपडे वाळविण्यासाठी जमिनीवर फ्लोरिंग करून देण्याची गरज असतानाही दुर्लक्ष केले जात आहे. सध्या उन्हाळा असल्याने उघड्यावर कपडे वाळविणे शक्य आहे. मात्र, पाऊस सुरू झाल्यावर केंद्राच्या परिसरातच मोठे डबके साचते.
त्यावेळी कपडे कसे वाळवायचे हा प्रश्न निर्माण होणार आहे. त्यासाठी नागपूर मेडीकलप्रमाणे फ्लोरिंग करण्याची नितांत गरज आहे. पण कपडे वाळविण्यासाठी साधी दोरी आणि बांबू पुरविण्याचीही तसदी प्रशासन घेताना दिसत नाही.
महाआरोग्य शिबिराचा ताण
मेडीकलमध्ये ५ जून रोजी महाआरोग्य शिबिर होणार आहे. त्यासाठी विविध समित्या गठीत करून जय्यत तयारी करण्यात येत आहे. मात्र, शिबिरात मोठ्या प्रमाणात शस्त्रक्रिया होण्याची शक्यता असतानाही धुलाई केंद्रात सुविधा पुरविण्याकडे लक्ष देण्यात आलेले नाही. सध्याच्या नियमित कामाचाच ताण कार्यरत तीन कर्मचाऱ्यांना पेलविणे शक्य नाही. त्यात शिबिरामुळे वाढणारा ताण ते कसा पेलणार, हा प्रश्न आहे.