वैद्यकीय अधिकाऱ्यांचा संप कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2020 05:00 IST2020-10-01T05:00:00+5:302020-10-01T05:00:16+5:30
यवतमाळचे जिल्हाधिकारी अपमानजनक वागणूक देतात असे सांगत जिल्हा परिषदेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या ‘मॅग्मो’ संघटनेने दोन दिवसांपासून कामबंद आंदोलन पुकारले आहे. त्यांच्या या आंदोलनाला एसडीओ, तहसीलदार, बीडीओ, मुख्याधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी या संघटनांनी पाठिंबा दर्शविला. बुधवारी आयएमए तसेच शासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या विविध २५ संघटनांनी या आंदोलनाला पाठिंबा दर्शविला आहे.

वैद्यकीय अधिकाऱ्यांचा संप कायम
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी पुकारलेले कामबंद आंदोलन थांबण्याची स्थिती नाही. बुधवारी मध्यस्थीसाठी आलेल्या विभागीय महसूल आयुक्त पीयूष सिंग यांच्यासोबतची बैठक बारगळली. जिल्हाधिकारी एम.डी. सिंह यांची बदली झाल्याशिवाय कामबंद आंदोलन थांबणार नाही, उलट राज्यभर त्याचे पडसाद उमटतील अशी रोखठोक भूमिका आंदोलकांनी घेतली. प्रयत्न अयशस्वी झाल्याने आयुक्तांना परत जावे लागले.
यवतमाळचे जिल्हाधिकारी अपमानजनक वागणूक देतात असे सांगत जिल्हा परिषदेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या ‘मॅग्मो’ संघटनेने दोन दिवसांपासून कामबंद आंदोलन पुकारले आहे. त्यांच्या या आंदोलनाला एसडीओ, तहसीलदार, बीडीओ, मुख्याधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी या संघटनांनी पाठिंबा दर्शविला. बुधवारी आयएमए तसेच शासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या विविध २५ संघटनांनी या आंदोलनाला पाठिंबा दर्शविला आहे. त्यातील तीन संघटना गडचिरोली, नांदेड व बीडच्या आहेत. शेतकरी नेते किशोर तिवारी यांनीही मंडपात भेट देऊन वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या संपाला पाठिंबा जाहीर केला.
बुधवारी ‘मॅग्मो’ संघटनेचे राज्याध्यक्ष डॉ. राजेश गायकवाड व इतर पदाधिकारी यवतमाळात पोहोचले. त्यांनीही आक्रमक भूमिका कायम ठेवली. सायंकाळी विभागीय महसूल आयुक्तांशी शिष्टमंडळाची चर्चा झाली. त्यात यश न आल्याने आयुक्त आंदोलकांच्या मंडपात गेले. मात्र तेथेही तोडगा निघाला नाही. अखेर आयुक्तांना परत जावे लागले. जिल्हाधिकाऱ्यांना तत्काळ हटवा अथवा आम्ही दिलेले राजीनामे मंजूर करा, अशी भूमिका घेण्यात आली आहे. गुरुवारपासून राज्यभर टप्प्याटप्प्याने काळ्याफिती, धरणे व कामबंद असे आंदोलन शनिवारपर्यंत केले जाणार आहे. डॉक्टरांच्या आंदोलनाने आरोग्य व्यवस्था प्रभावित झाली आहे. रुग्णांचे स्वॅब तपासण्याचे काम मंदावले आहे. तर जिल्हाधिकाऱ्यांच्या समर्थनार्थही काही जण उतरले होते. त्यांनी पोस्टरबाजीही केली.
कलेक्टर चर्चेस तयार
जिल्हाधिकारी एम.डी. सिंह यांनी बुधवारी व्हीडीओ जारी केला. आंदोलक वैद्यकीय अधिकाऱ्यांशी चर्चेस तयार आहोत. त्यांच्या जिल्हास्तरावरील मागण्यांचा येथेच निपटारा तर शासन स्तरावरील मागण्यांचा प्रधान सचिवांकडे पाठपुरावा केला जाऊ शकतो. त्यासाठी चर्चा होणे महत्वाचे आहे, असे त्यांनी त्यात सांगितले.