जिल्हा परिषद अध्यक्षांच्या भेटीत वैद्यकीय अधिकारी गैरहजर
By Admin | Updated: November 29, 2014 02:24 IST2014-11-29T02:24:39+5:302014-11-29T02:24:39+5:30
पुसद तालुक्यातील माळपठार भागातील फेट्रा आरोग्य केंद्राला जिल्हा परिषद अध्यक्षांनी भेट दिली असता सर्व वैद्यकीय अधिकारी गैरहजर आढळून आले.

जिल्हा परिषद अध्यक्षांच्या भेटीत वैद्यकीय अधिकारी गैरहजर
बेलोरा : पुसद तालुक्यातील माळपठार भागातील फेट्रा आरोग्य केंद्राला जिल्हा परिषद अध्यक्षांनी भेट दिली असता सर्व वैद्यकीय अधिकारी गैरहजर आढळून आले. यावरून या आरोग्य केंद्राच्या कारभाराचा नमुना पुढे आला.
माळपठार भागातील नागरिकांना आरोग्य सुविधा मिळत नसल्याच्या वारंवार तक्रारी वरिष्ठांकडे करण्यात आल्या. परंतु अद्याप कुणीही त्याची दखल घेतली नव्हती. बेलोरा गटाचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या जिल्हा परिषद अध्यक्षा डॉ. आरती फुफाटे यांनी फेट्रा आरोग्य केंद्राला अकस्मात भेट दिली.
तज्ज्ञ डॉक्टर असलेल्या डॉ. फुफाटे यांनी आरोग्य केंद्राची परिस्थिती बघितली. तब्बल एक तास थांबूनही त्यांना दवाखान्यात डॉक्टरच काय परिचरही आढळून आला नाही. विशेष म्हणजे मुख्य दरवाजाही अध्यक्षांनाच उघडावा लागला. जिल्हा परिषद अध्यक्षांची ही अवस्था असेल तर सर्वसामान्यांचे काय असा प्रश्न उपस्थित होत आहे.
डॉ. फुफाटे यांनी आरोग्य केंद्रातील रजिस्टरवर शेरा लिहून संबंधितांवर त्वरित कारवाई करण्याचे आश्वासन दिले. आरोग्य अधिकारी मुख्यालयी राहत नसल्याने ग्रामीण रुग्णांना आरोग्य सुविधा मिळत नसल्याच्याबाबीवर जिल्हा परिषदे अध्यक्षांच्या भेटीने शिक्कामोर्तब झाले.
या भेटीने आरोग्य वर्तुळात खळबळ उडाली आहे. (वार्ताहर)