घनकचरा, पाणी टंचाईवर उपाययोजना

By Admin | Updated: April 1, 2015 02:10 IST2015-04-01T02:10:09+5:302015-04-01T02:10:09+5:30

शहरातील घनकचरा व पाणी टंचाईची समस्या लक्षात घेऊन नगरपरिषदेने उपायोजना सुरू केल्या.

Measures on solid waste, water scarcity | घनकचरा, पाणी टंचाईवर उपाययोजना

घनकचरा, पाणी टंचाईवर उपाययोजना

वणी : शहरातील घनकचरा व पाणी टंचाईची समस्या लक्षात घेऊन नगरपरिषदेने उपायोजना सुरू केल्या.
उन्हाळ्यात दरवर्षी पाण्याची टंचाई जाणवते. चार वर्षांपूर्वी तर येथे भीषण दुष्काळात नागरिक पोळले होते. ही समस्या लक्षात घेऊन नगरपरिषदेने तोडगा काढण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे पाच ट्युबवेलचा प्रस्ताव पाठविला होता. त्यातील दोन ट्युबवेल नामंजूर झाल्या, तर तीन मंजूर झाल्या आहेत. सोमवारी वामनघाट येथे या ट्युबवेल खोदण्याचे काम सुरू झाले. जॅकवेल परिसरात दोन व गणेशपूर घाटावर एक, अशा तीन नवीन ट्युबवेलला आता सुरूवात झाली आहे.
शहराची जीवनदायीनी असलेली निर्गुडा नदी पूर्णत: आटली. त्यामुळे आत्तापर्यंत तिनदा नवरगाव धरणाचे पाणी नदीत सोडण्यात आले. आरक्षित पाणी व नवरगाव धरणाच्या पाण्याचा साठा बघता, हे पाणी फार काळ पुरणार नसल्याने वणीकरांची तहान भागविण्यासाठी नगरपरिषद विविध उपाययोजना करीत आहे. त्यामुळे उन्हाळ्यात पाण्याची टंचाई भासणार नाही, अशी ग्वाही नगराध्यक्ष प्रिया लभाने यांनी दिली आहे. सोबतच घनकचरा ही सर्वात मोठी समस्या आहे. त्यावर नगरपरिषदेने सन २0१0 मध्ये घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प उभारण्याचा संकल्प केला. मात्र काही नगरसेवकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे कलम ३०८ नुसार अपिल केल्याने हे काम रखडले होते. आता या प्रकल्पाचा मार्ग मोकळा झाला. त्यामुळे आरोग्य सभापती धनंजय त्रिंबके, नगराध्यक्ष प्रिया लभाने, उपाध्यक्ष अशोक बुरडकर, बांधकाम सभापती इंदिरा पारखी, जलपूर्ती सभापती कीर्ती देशकर, मुख्याध्याधिकारी गोपिचंद पवार, अभियंता गायकवाड, देशमुख यांनी सोमवारी जागेची पाहणी केली. तेथे घनकचऱ्यापासून गांडूळ खताची निर्मिती व ओला-सुका कचऱ्याच्या व्यवस्थापनाची व्यवस्था करण्यात येणार आहे.
शहरातील घनकचऱ्याची समस्या सुटून नगरपरिषदेच्या तिजोरीतही रक्कम जमा होण्याची शक्यता आहे. पाणी टंचाई व घनकचऱ्याच्या कामाला सुरूवात झाल्याने महत्वाच्या दोन समस्या सुटण्याची शक्यता बळावली आहे. (कार्यालय प्रतिनिधी)

Web Title: Measures on solid waste, water scarcity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.