विवाहितेच्या आत्महत्येत पती व सासऱ्याला अटक
By Admin | Updated: July 13, 2015 00:17 IST2015-07-13T00:17:20+5:302015-07-13T00:17:20+5:30
सासरच्या मंडळींनी पैशासाठी छळ केल्याने माझ्या मुलीने आत्महत्या केली अशी तक्रार दाखल केल्यानंतर पुसद शहर पोलिसांनी दीपाली सागर भालेकर...

विवाहितेच्या आत्महत्येत पती व सासऱ्याला अटक
हनुमान वॉर्डातील घटना : पैशासाठी छळ
पुसद : सासरच्या मंडळींनी पैशासाठी छळ केल्याने माझ्या मुलीने आत्महत्या केली अशी तक्रार दाखल केल्यानंतर पुसद शहर पोलिसांनी दीपाली सागर भालेकर आत्महत्या प्रकरणी पतीसह सासरच्या मंडळीवर गुन्हा दाखल केला आहे. पती व सासऱ्यास अटक करण्यात आली आहे. येथील हनुमान वार्डातील दीपालीने आत्महत्या केल्यानंतर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूचा गुन्हा नोंदविला होता.
दीपाली सागर भालेकर हिने १० जुलै रोजी सकाळी ११ वाजता आपल्या घरात गळफास लावून आत्महत्या केली होती. या प्रकरणी शहर पोलिसांनी मर्ग दाखल केला. दीपालीचे आई-वडील पंढरपूर यात्रेला गेले असल्याने त्यांना उशिरा निरोप मिळाला.
मुलीच्या आत्महत्येचा निरोप मिळताच त्यांनी पुसद गाठले. हदगाव तालुक्यातील कोळी येथील सतीश नामदेव मांढळे यांनी या प्रकरणी तक्रार दिली.
त्यात सासरच्या मंडळींनी पैशासाठी शारीरिक त्रास दिल्याने दीपालीने आत्महत्या केल्याचे म्हटले होते. त्यावरून पुसद शहर पोलिसांनी पती सागर भालेकर, सासरा सुभाष भालेकर, ननंद रिना राजेश काळे, रिनाचा पती आणि दीर ऋषिकेश भालेकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान शहर पोलिसांनी पती सागर व सासरा सुभाष यांना अटक केली आहे.
गत काही दिवसात विवाहितेच्या छळांच्या घटनात वाढ झाली असून शारीरिक व मानसिक त्रासामुळे विवाहितांना टोकाचा मार्ग स्वीकारावा लागत आहे. या घटनेने पुसद शहरात खळबळ उडाली असून पोलीस अधिक तपास करीत आहे. (प्रतिनिधी)