शेतकऱ्यांच्या गर्दीने बाजार फुलला

By Admin | Updated: June 13, 2017 01:21 IST2017-06-13T01:21:20+5:302017-06-13T01:21:20+5:30

यावर्षी कधी नव्हे ते मृग नक्षत्रात पावसाने हजेरी लावली. शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसू लागले.

The markets flooded the farmers' crowd | शेतकऱ्यांच्या गर्दीने बाजार फुलला

शेतकऱ्यांच्या गर्दीने बाजार फुलला

पावसाची हजेरी : पेरणीसाठी लगबग, कृषी केंद्रांमध्ये वाढली गर्दी
लोकमत न्यूज नेटवर्क
पुसद : यावर्षी कधी नव्हे ते मृग नक्षत्रात पावसाने हजेरी लावली. शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसू लागले. पुसद तालुक्यात दोन दिवसांपासून पडणाऱ्या पावसाने पेरणीची लगबग वाढली आहे. बियाणे, खत खरेदीसाठी शेतकऱ्यांची पुसदच्या बाजारात गर्दी दिसू लागली आहे. कृषी केंद्रात शेतकरी बियाण्यांची चाचपणी करीत आहे.
पुसद शहरासह तालुक्यात गुरुवारपासून म्हणजे मृग नक्षत्राच्या दिवसापासून पावसाने दमदार हजेरी लावली. तीन तासात ५५ मिमी पाऊस झाला. शुक्रवारी पुन्हा दोन तास पावसाने हजेरी लावली. १६ मिमी पावसाची नोंद झाली. रविवारी सायंकाळी सुरू झालेला पाऊस रात्री १० वाजेपर्यंत सुरू होता. या कालावधीत ३२ मिमीएवढा पाऊस झाला. मान्सूनपूर्व ८ मिमी एवढा झाला होता. आतापर्यंत १११ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
शेतकऱ्यांसाठी खरीप हंगाम महत्त्वाचा असतो. शेतकऱ्यांचे संपूर्ण अर्थकारण याच पेरणीवर अवलंबून असल्याने शेतकरी या हंगामाच्या पेरणीसाठी मोठी काळजी करतो. कोणतीही कसर ठेवत नाही. शेतकऱ्यांसोबत बाजारपेठेचे भविष्यही याच हंगामावर अवलंबून असते. बाजारपेठेचा मुख्य कणा हा खरीप हंगामातील पेरणी असतो. व्यापाऱ्यांची खरीप हंगामापासून सुगी सुरू होते. दरवर्षी पावसाळ्याच्या तोंडावर बाजारपेठ शेतकऱ्यांच्या गर्दीने फुलतो. यंदा मृगनक्षत्रात पावसाने हजेरी बऱ्याच वर्षानंतर लावली. त्यामुळे शेतकरी आनंदात आहे. पेरणीयोग्य पाऊस झाल्याने कामाला वेग आला असून बाजारपेठेत साहित्य खरेदीसाठी गर्दी करीत आहे.
यंदाच्या खरीप हंगामात शेतकरी नगदी पिकाकडे वळल्याचे दिसत आहे. त्यात प्रामुख्याने कापूस, सोयाबीनचा पेरा होणार आहे. यंदा कापूस आणि सोयाबीन दोन्ही पिके सारखेच क्षेत्र राहण्याची शक्यता आहे. सध्या पुसदच्या बाजारात शेतकरी गर्दी करत असून सर्वच कृषी केंद्र हाऊसफुल्ल झाले आहे.

खरेदी केलेल्या बियाण्यांचे पक्के बिल घेण्याचे शेतकऱ्यांना आवाहन
दिग्रस : शेतकऱ्यांनी शासनाने बंदी घातलेली कोणतीही बियाणी घेवून नये. तसेच कोणत्याही कृषी केंद्रावर बियाणे खरेदी करताना कृषी केंद्र चालकाकडून पक्के बिल घेण्याचे आवाहन तालुका कृषी अधिकारी पी.एस. बागडे यांनी केले आहे. अवैध बियाणे विक्री केल्यास त्वरित पंचायत समितीच्या कृषी अधिकाऱ्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. पेरणी झाल्यानंतर बियाण्यांची पिशवी जपून ठेवावी. तसेच पिशवी खालून फोडावी. बोगस बियाणे निघाल्यास कारवाई करण्यास उपयोगी येईल. शेतकऱ्यांनी बियाणे खरेदी करताना जागरूक राहावे, असे त्यांनी सांगितले.

Web Title: The markets flooded the farmers' crowd

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.