रमजानसाठी बाजारपेठ सजली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2019 00:07 IST2019-06-05T00:07:14+5:302019-06-05T00:07:43+5:30
रमजानच्या पर्वावर यवतमाळची बाजारपेठ सजली आहे. सौंदर्य प्रसाधनांसोबत विविध प्रकारचे सुगंध आणि कपड्यांचा यामध्ये समावेश आहे. मेवा आणि विदेशी फळेही बाजारात मोठ्या प्रमाणात आली आहेत. संपूर्ण कळंब चौक रोषणाईने सजला आहे. सायंकाळ होताच या ठिकाणी चहलपहल पहायला मिळत आहे.

रमजानसाठी बाजारपेठ सजली
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : रमजानच्या पर्वावर यवतमाळची बाजारपेठ सजली आहे. सौंदर्य प्रसाधनांसोबत विविध प्रकारचे सुगंध आणि कपड्यांचा यामध्ये समावेश आहे. मेवा आणि विदेशी फळेही बाजारात मोठ्या प्रमाणात आली आहेत. संपूर्ण कळंब चौक रोषणाईने सजला आहे. सायंकाळ होताच या ठिकाणी चहलपहल पहायला मिळत आहे.
स्थानिक कळंब चौकात इदचा बाजार सजला आहे. या ठिकाणी विविधरंगी दुकानांनी परिसराची शोभा वाढविली आहे. पताका, झिल्ली आणि रोषणाईने संपूर्ण परिसर उजळून निघाला आहे. ईदच्या निमित्ताने या ठिकाणी मेव्याचे दुकाने मोठ्या संख्येत लागली आहेत. यासोबतच फेनी आणि शेवईचे दुकानही आहेत.
या ठिकाणी थेट सौदीअरब येथून खजूर आले आहेत. याच्या खरेदीसाठी सर्वाधिक गर्दी पाहायला मिळत आहे. खरबुज, टरबुज आंबे आणि इतर फळेही जिल्ह्यातील विविध ठिकाणासह इतर राज्यातून आली आहे. यामुळे फळांची रेलचेल झाल्याचे चित्र आहे.
आभूषणांच्या खरेदीसाठी महिलाही बाजारात गर्दी करीत आहे. यामध्ये बाहुबली ज्वेलरी, पदमावती सेटची सर्वाधिक मागणी आहे. याकरिता थेट हैदराबादवरून श्रृंगार साहित्य बाजारात आले आहे. हैदराबादी कंगण, वेस्टर्न आणि जयपूर कंगणला सर्वाधिक मागणी आहे. महाराणी हारची चांगलीच चलती आहे. विविध प्रकारचे सेंट आणि अत्तर विक्रीसाठी आले आहेत. चादर आणि विविध साड्यांच्या पॅटर्न बाजारात आले आहेत. त्यात विविध टीव्ही सिरीयलमधील साड्यांच्या पॅटर्नला मागणी वाढली आहे.
जकात आणि सहेरीतून मदतीचा हात
एकूण उत्पन्नाचा काही हिस्सा जकातमध्ये वळता करायचा असतो. ईदच्या पूर्वी या रकमेतून धान्यासह ईदच्या साहित्याची खरेदी करण्यात येते. ते गरजवंतांपर्यंत पोहोचविले जाते. यासोबतच सहेरीमध्ये भोजनाची विशेष व्यवस्था समाज सहभागातून करण्यात येते. यासाठी शेकडो हात दररोज झटतात. बाहेरगावी असणाऱ्या आणि शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी या ठिकाणी भोजनाची व्यवस्था करण्यात येते. ही सेवा गत अनेक वर्षांपासून पुरविली जात आहे.