महिला बचत गटांच्या वस्तूंना परप्रांतातही मार्केट

By Admin | Updated: December 23, 2016 02:25 IST2016-12-23T02:25:40+5:302016-12-23T02:25:40+5:30

येथील समता (पोस्टल ग्राऊंड) मैदानातील ‘समृद्धी’ प्रदर्शनात महिला बचत गटांनी तयार केलेल्या वस्तूंना

Market in the context of the items of women saving groups | महिला बचत गटांच्या वस्तूंना परप्रांतातही मार्केट

महिला बचत गटांच्या वस्तूंना परप्रांतातही मार्केट

गोमूत्र अर्क दिल्लीत : मासोळ्यांचे लोणचे, जूट पिशव्या व मुसळी, तीन जिल्ह्यातील बचत गटांची हजेरी
रूपेश उत्तरवार यवतमाळ
येथील समता (पोस्टल ग्राऊंड) मैदानातील ‘समृद्धी’ प्रदर्शनात महिला बचत गटांनी तयार केलेल्या वस्तूंना स्थानिकांकडून पसंती मिळत नसली, तरी इतर राज्यांनी त्याची दखल घेतली आहे. या प्रदर्शनातील सॅनेटरी नॅपकिनला चक्क दार्जीलिंगमधून मागणी आल्याचे सांगण्यात आले.
ग्राम विकास विभाग आणि जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेतर्फे या प्र्र्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. यात यवतमाळसह अमरावती व बुलडाणा जिल्ह्यातील बचत गट सहभागी आहेत. यवतमाळ जिल्ह्याच्या मारेगाव तालुक्यातील जळका येथील सुलभ महिला बचत गटाने सॅनेटरी नॅपकीनचा स्टॉल लावला आहे. कंपन्यांच्या स्पर्धेत या बचत गटांनी तयार केलेले सॅनेटरी नॅपकीन दर्जेदार असल्याने थेट दार्जीलिंग, बंगळूरू, सीमला येथे पोहोचले आहे. या नॅपकीनचा दर्जा आणखी सुधारण्याच्या सूचना बटत गटाला मिळत आहे. यासाठी नवीन मशीन खरेदी करावी लागणार आहे. सध्या तीन हजार नॅपकीनची निर्मिती केली जात आहे. गटाच्या अध्यक्ष सुनिता सातपुते यांनी या नॅपकीनचा शासनस्तरावर विचार व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त केली.
अमरावती जिल्ह्याच्या नांदगाव तालुक्यातील बोपी येथील महिला बचत गटाने गोमूत्र अर्काचा स्टॉल लावला आहे. या अर्काने १०८ रोेगांवर उपचार होत असल्याचा दावा केला जात आहे. आयुर्वेद औषधी म्हणून त्याला मोठी मागणी आहे. दिल्लीतील एका मॉलकडून या अर्काची मागणी नोंदविण्यात आली. राज्यातील इतर भागातही गोमूत्र अर्क पाठविले जात असल्याचे वनिता साखरकर यांनी सांगितले.
अमरावती येथील कुमकुम महिला बचत गटाने चहा पावडर तयार केले. ग्रीन मसाला पावडर, कडीपत्ता पावडर, दुधी पावडरची निर्मिती केली. मनीषा टवलारे यांनी चहा पावडर आरोग्यासाठी चांगले असल्याचे सांगितले. इंझाळा (ता.घाटंजी) येथील जिजाऊ महिला बचत गटाने सोयाबीन बिस्कीट, डाळ, ग्रीन मसाला तयार केल्याचे स्मिता ठाकरे यांनी सांगितले. घाटंजी तालुक्याच्या चिखलवर्धा येथील आदर्श बचत गटाने सहदाचा स्टॉल लावला आहे. हे शहद नैसर्गिक असल्याचा दावा रेखा सलाम यांनी केला. राळेगावातील उन्नती स्वयंसहायता गटाने मासोळयांपासून लोणचे, सेव, चकली व पापड तयार केले. हा वेगळा पदार्थ या प्रदर्शनात पाहायला मिळतो.
महागाव तालुक्याच्या पिंप्री येथील संस्कृती गटाने जुटपासून पिशव्या निर्मितीचा स्टॉल लावला. पिशव्या विक्रीतून त्यांनी कर्जाची परतफेडही केल्याचे सचिव गायत्री रानडे यांनी सांगितले. बुलडाणा जिल्ह्यातील भीमाई आणि सावित्रीबाई फुले बचत गटाने मुसळीची शेती सुरू केली. त्यापासून मुसळी पावडर निर्माण केले. या पावडरला चांगली मागणी असल्याचे उज्वला हिवराळे यांनी सांगितले. याशिवाय ठिकठिकाणच्या बचत गटांचे स्टॉल या प्रदर्शनात लावण्यात आलेले आहे.

Web Title: Market in the context of the items of women saving groups

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.