नवरात्रोत्सवाच्या गर्दीने बाजारपेठेला बळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2019 06:00 IST2019-10-07T06:00:00+5:302019-10-07T06:00:16+5:30
शहरातील खाचखळगे, रस्त्यांचे बांधकाम या सर्व अडचणी पार करीत भक्तांनी संपूर्ण शहर पायदळ तुडविले. मातेचे दर्शन घेतले. वडगाव ते गांधी चौक आणि माळीपुरा ते विश्वासनगरपर्यंतचा परिसर आणि लोहारापर्यंत भक्त गर्दी करीत आहेत. परगावातील अनेक जण सामूहिकरित्या वाहन करून आले. वाहनांचे ताफे रस्त्यांच्या दुतर्फा रात्रभर उभे राहत आहे.

नवरात्रोत्सवाच्या गर्दीने बाजारपेठेला बळ
रूपेश उत्तरवार ।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : देशातील दुसऱ्या क्रमांकाचा दुर्गोत्सव पाहण्यासाठी भक्त यवतमाळात अलोट गर्दी करीत आहे. या गर्दीने आजवरचे सर्व रेकॉर्ड मोडीत काढले आहे. रात्रभर रस्त्यांवर प्रचंड वर्दळ पहायला मिळत आहे. यातून शहराच्या अर्थव्यवस्थेत भर पडली आहे.
शहरातील खाचखळगे, रस्त्यांचे बांधकाम या सर्व अडचणी पार करीत भक्तांनी संपूर्ण शहर पायदळ तुडविले. मातेचे दर्शन घेतले. वडगाव ते गांधी चौक आणि माळीपुरा ते विश्वासनगरपर्यंतचा परिसर आणि लोहारापर्यंत भक्त गर्दी करीत आहेत.
परगावातील अनेक जण सामूहिकरित्या वाहन करून आले. वाहनांचे ताफे रस्त्यांच्या दुतर्फा रात्रभर उभे राहत आहे. अख्खी रात्र पालथी घातल्यानंतर दिवस कधी उगवला याचे भान भक्तांना राहत नाही. काही मंडळांपुढे तर मध्यरात्रीनंतरही दर्शनासाठी रांगा असतात. ही संपूर्ण गर्दी कुठली ना कुठली वस्तू खरेदी करते. यामुळे बाजारपेठेतील दुकाने रात्रीही उघडी असतात. यातून बाजारपेठेची उलाढाल मोठ्या प्रमाणात वाढली आहे. छोट्या व्यावसायिकांनाही मोठा रोजगार या कालावधीत मिळाला. अन्नदान असले तरी उपवास साहित्य आणि इतर खाद्यपदार्थांच्या दुकानावर वर्दळ
आहे.
जल चढविण्यासाठी मध्यरात्रीपासूनच रांगा
शितला मातेला जल चढविण्यासाठी महिलांच्या रांगा लागतात. नवरात्र उत्सवात शितला मातेची आराधना पावन असल्याचे मानले जाते. यामुळे मध्यरात्रीपासूनच महिला भाविकांच्या रांगा पहायला मिळतात.
वाहतूक व्यवसायात सर्वाधिक उलाढाल
गावखेड्यांतून राज्य परिवहन महामंडळाच्या बस, खासगी वाहने, टेम्पो ट्रॅक्समध्ये बसून भाविक यवतमाळात येत आहे. यामुळे वाहतूकदारांना अधिकचा रोजगार उपलब्ध झाला आहे. दुचाकी वाहनांची वर्दळही वाढली आहे. यातून पेट्रोल आणि डिझेलची उचलही वाढली आहे.