मार्चमध्येच मे हिटचा तडाखा
By Admin | Updated: March 27, 2017 01:14 IST2017-03-27T01:14:43+5:302017-03-27T01:14:43+5:30
यंदा मार्च महिन्यातच जिल्हावासीयांना मे हिटचा तडाखा बसला आहे. गेल्या तीन दिवसांपासून जिल्ह्यात उष्णतेची लाट निर्माण झाली आहे.

मार्चमध्येच मे हिटचा तडाखा
पारा ४१ अंशावर : जिल्ह्यात सर्वत्र उष्णतेची लाट, अंगाची लाहीलाही
यवतमाळ : यंदा मार्च महिन्यातच जिल्हावासीयांना मे हिटचा तडाखा बसला आहे. गेल्या तीन दिवसांपासून जिल्ह्यात उष्णतेची लाट निर्माण झाली आहे.
दरवर्षी साधारणत: एप्रिल आणि मे महिन्यात उन्हाचा प्रकोप जाणवतो. मे महिन्यात तर पारा दररोज ४१ अंशावर पोहचतो. मात्र यावर्षी उन्हाची तिव्रता मार्चमध्येच जाणवत आहे. यामुळे मे हिटचा तडाखा मार्चमध्येच बसल्याने जिल्ह्यातील जनजीवन प्रभावीत झाले आहे. उन्हाच्या तिव्रतेने दुपारी रस्ते सामसूम झाले आहे. गेल्या १६ वर्षात यंदा प्रथमच मार्च महिन्यातच उन्हाचा पारा ४० अंशावर पोहचला. यामुळे सारेच नागरिक अचंबित झाले आहे. मार्च महिन्यातच उन्हाची तिव्रता एवढी प्रखर असेल, असे कुणाच्याच ध्यानीमनी नव्हते. येत्या एप्रिल आणि मे महिन्यात उन्हाचा प्रकोप आणखी किती वाढेल, हे सांगणे सध्या अवघड झाले आहे.
गेल्या तीन दिवसांपासून उन्हाचा प्रकोप वाढल्याने शीतपेय आणि शितफळांची विक्री मोठ्या प्रमाणात वाढली आहे. दुपारच्या सुमारास बाजारातील चहलपहल थांबली आहे. आज रविवार, हा बाजाराचा दिवस होता. मात्र उन्हाच्या झळांमुळे बाजारातील गर्दी मंदावल्याचे दृष्य अनुभवायला मिळाले. (शहर वार्ताहर)
नैसर्गिक आपत्ती विभागाने यंदाचे वर्ष उष्णतेचे राहणार असल्याचे आधीच स्पष्ट केले होते. त्यानुसार या विभागाने सर्व जिल्हाधिकाऱ्यांना उन्हाळ्यात घ्यावयाच्या काळजी बाबत जनतेला अवगत करण्याचे निर्देशही दिले होते. या विभागाचा अंदाज तूर्तास खरा ठरत आहे.
१६ वर्षांनंतर यंदाचा उन्हाळा तीव्र
गेली १६ वर्षे एप्रिल आणि मे महिन्यात उन्हाचा तडाखा बसत होता. मात्र यंदा मार्चमध्येच पारा भडकला आहे. उन्हामुळे नागरिक कासावीस झाले आहे. अनेकांनी कधीचेच कुलर बाहेर काढले आहे. दुपारी उन्हात बाहेर निघणे टाळले जात आहे. उन्हाचा हा प्रकोप आणखी सप्ताहभर कायम राहणार असल्याचे हवामान खात्याने स्पष्ट केले आहे.