दहावी परीक्षेच्या पहिल्याच दिवशी मराठीची प्रश्नपत्रिका झाली व्हायरल;कॉपीमुक्तीचा फज्जा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2025 02:14 IST2025-02-22T02:13:36+5:302025-02-22T02:14:26+5:30
कोठारी केंद्रावर कारवाई

दहावी परीक्षेच्या पहिल्याच दिवशी मराठीची प्रश्नपत्रिका झाली व्हायरल;कॉपीमुक्तीचा फज्जा
महागाव (यवतमाळ) : दहावी परीक्षेच्या पहिल्याच दिवशी कॉपीमुक्त अभियानाचा फज्जा उडाला. महागाव तालुक्यातील कोठारी येथील आदर्श विद्यालयातून मराठीचा पेपर अर्ध्या तासात व्हॉट्सॲपवर व्हायरल झाला. या प्रकरणात शिक्षण विस्तार अधिकारी विजय बेतेवाड यांच्या तक्रारीवरून संशयित केंद्र संचालक व ज्या मोबाइल क्रमांकावरून पेपर व्हायरल झाला त्या अज्ञाताविरुद्ध गुन्हा नोंद झाला आहे.
सकाळी ११ वाजता पेपर सुरु झाला. साडेअकराच्या दरम्यान प्रश्नपत्रिकेतील काही भाग अनेक व्हाॅट्सॲप ग्रुपवर फिरत होता. घटनेची दखल घेऊन तहसीलदार अभय मस्के यांनी परीक्षा केंद्राची पाहणी केली. सायंकाळी ६ वाजता महागाव ठाण्यात तक्रार दिली.
फोटोतील बॅकग्राऊंड जुळले
विस्तार अधिकाऱ्यांच्या व्हॉट्सॲपवर प्राप्त प्रश्नपत्रिकेच्या फोटोमध्ये दिसणारे बाजूचे बॅकग्राऊंड केंद्र संचालक शाम कान्होजी तास्के यांच्या कार्यालय परिसरात दिसून आले. केंद्र संचालकांशी विचारणा केली असता, त्यांनी असा प्रकार आमच्याकडे झालेला नाही, असे सांगितले. परंतु, तेथे प्रश्नपत्रिकेच्या गठ्ठ्यातील शिल्लक राहिलेल्या चार प्रश्नपत्रिकांपैकी एक प्रश्नपत्रिका चोळामोळा केलेली आढळली. यावरून पेपर लिक केल्याचे स्पष्ट होते, असे तक्रारीत नमूद केले आहे.
जालना जिल्ह्यातील बदनापूर येथील परीक्षा केंद्रावर भेट दिली असता जी दोन पाने काही वृत्तवाहिन्यांवर प्रसारित झाली होती, त्याअनुषंगाने मराठी (प्रथम भाग) विषयाच्या मूळ प्रश्नपत्रिकेची छाननी केली असता, सदरची दोन पाने ही मूळ प्रश्नपत्रिकेचे नसून, अन्य खासगी प्रकाशनाने प्रकाशित केलेली दिसून आली. तसेच, प्रश्नपत्रिकेतील काही प्रश्न व त्या प्रश्नांची उत्तर हस्तलिखितामध्ये आढळली. म्हणजे ही प्रश्नपत्रिका फुटलेली नसून गैरमार्गाने करण्याच्या दृष्टीने प्रश्नपत्रिकेचे काही प्रश्न व उत्तर व्हायरल केल्याचे दिसून येते. तर यवतमाळ जिल्ह्यातील कोठारी येथील केंद्रावर प्रश्नपत्रिका मोबाइलवर व्हायरल झाली, अशा बातम्या आहेत. या दोन्ही प्रकरणांची गंभीर दखल घेतली असून, अहवाल मागवून कारवाई केली जाईल.
देविदास कुलाळ, सचिव, राज्य शिक्षण मंडळ, पुणे
बदनापूर, तळणी केंद्रावर गोंधळ आणि दगडफेक
जालना : बदनापूर आणि मंठा तालुक्यातील तळणी या दोन परीक्षा केंद्रांवरही मराठीचा पेपर फुटल्याच्या दाव्याने व चर्चेने गोंधळ उडाला.
बदनापूर केंद्रावर कॉपी पुरविण्यासाठी आलेल्या टोळक्याकडून केंद्रावर दगडफेकही झाली. पेपरफुटीचा प्रकार जालना, जिल्हाधिकारी तसेच राज्य मंडळाने फेटाळला आहे. याप्रकरणी बदनापूर पोलिसांनी झेरॉक्स सेंटर चालविणाऱ्यास ताब्यात घेतले असून, त्याची चौकशी सुरू आहे.
येवल्यात सामूहिक कॉपी
नाशिक : दहावीच्या पहिल्याच मराठी विषयाच्या परीक्षेसाठी येवला तालुक्यातील अंदरसूल येथील शाळेत सामूहिक कॉपीचा प्रकार उघडकीस आला. पुढील परीक्षांसाठी येथे कडक बंदोबस्त तैनात करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली.