महिला सरपंच आरक्षणाने अनेकांचे गणित बिघडले
By Admin | Updated: April 8, 2015 02:17 IST2015-04-08T02:17:41+5:302015-04-08T02:17:41+5:30
सरपंच पदासाठी गेल्या अनेक दिवसांपासून गुडघ्याला बाशिंग बांधून असलेल्या गावपुढाऱ्यांचे गणित महिला आरक्षण सोडतीने बिघडविले आहे.

महिला सरपंच आरक्षणाने अनेकांचे गणित बिघडले
पुसद : सरपंच पदासाठी गेल्या अनेक दिवसांपासून गुडघ्याला बाशिंग बांधून असलेल्या गावपुढाऱ्यांचे गणित महिला आरक्षण सोडतीने बिघडविले आहे. ११९ पैकी ६० ग्रामपंचायतीमध्ये महिला सरपंच होणार असून यवतमाळच्या जिल्हाधिकारी कार्यालयात त्यावर शिक्कामोर्तब केले आहे. आता आपण नाही तर आपल्या कारभारीणला पुढे करण्यासाठी धडपड सुरू आहे.
पुसद तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या २०१५ ते २०२० मध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी सरपंचपदाचे आरक्षण जाहीर झाले आहे. तालुक्यात ११९ ग्रामपंचायती आहे. त्यापैकी ६० ग्रामपंचायतीमध्ये सरपंचपद महिलांसाठी आरक्षित आहे. यामध्ये अनुसूचित जातीसाठी दहा, अनुसूचित जमातीसाठी ११, इतर मागासप्रवर्ग महिलांसाठी १६ तर खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी २३ ग्रामपंचायतीचा समावेश आहे. या आरक्षणामुळे राजकीय घडामोडींना वेग आला आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून सरपंचपदाचे स्वप्न पाहणाऱ्या अनेकांना यामुळे हादरा बसला. सरपंचपदाची सोडत निघत होती. त्यावेळी अनेक इच्छुक सोडतीकडे डोळे लावून बसले होते. काहींच्या आनंदाला पारावार उरला नाही तर काहींचा अपेक्षा भंग झाला. आता आपण नाही तर आपल्या कारभारीणला सरपंच करण्याचा चंग या गावपुढाऱ्यांनी बांधला आहे. सरपंच पदासाठी मोर्चेबांधणी करतानाच गावातील पॅनलही आपलेच निवडून यावे, यासाठी प्रयत्न सुरू आहे. कोणत्या प्रवर्गासाठी कोणता वार्ड आहे, कोण या भागात प्रभावी आहे, याची चाचपणी सुरू आहे. सध्या पुसद तहसीलमध्ये निवडणुकीसाठी नामांकन दाखल करणेही सुरू झाले आहे. निवडणूक अर्ज मागे घेण्याच्या दिवशी निवडणुकीचे चित्र स्पष्ट होईल. परंतु भर उन्हाळ्यात आता ग्रामीण भागातील वातावरण चांगलेच तापले आहे. (प्रतिनिधी)