माकोडा शाळा पांढरकवड्यात अव्वल
By Admin | Updated: February 21, 2016 02:09 IST2016-02-21T02:09:36+5:302016-02-21T02:09:36+5:30
बालकाचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम-२००९ अन्वये ग्रामीण भागातील प्राथमिक शिक्षणाच्या गुणवत्ता ...

माकोडा शाळा पांढरकवड्यात अव्वल
मूल्यांकन झाले : १४ विद्यार्थी, शिक्षकांनी घेतले परिश्रम
पांढरकवडा : बालकाचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम-२००९ अन्वये ग्रामीण भागातील प्राथमिक शिक्षणाच्या गुणवत्ता विकास कार्यक्रमांतर्गत तालुक्यातील अतिशय दुर्गम भागातील माकोडा (पोड) येथील कनिष्ठ प्राथमिक शाळा मूल्यांकनामध्ये प्रथम क्रमांकावर आली आहे.
महाराष्ट्र शासनाच्या ग्रामीण व जलसंधारण विभागामार्फत दरवर्षी ग्रामीण भागातील शाळांची तपासणी करून मूल्यांकन करण्यात येते. भौतिक सुविधा, शालेय व्यवस्थापन, लाभार्थी योजना, लोकसहभाग, स्वच्छता, सामाजिक उपक्रम, विद्यार्थी संपादणूक, शिक्षक व्यक्तिमत्त्व अशा विविध बाबींचे मूल्यांकन या तपासणीत करण्यात आले. त्यात माकोडा (पोड) येथील जिल्हा परिषद शाळा उत्कृष्ट ठरली. विशेष म्हणजे ग्रामीण भागातील सर्वात दुर्गम भागात वसलेल्या या शाळेत जाण्यासाठी बारमाही रस्ताही नाही.
मोठमोठे दगड व चिखलाचे साम्राज्य, असलेल्या रस्त्यावरून विद्यार्थी शाळेत जातात. मात्र अशा विपरित परिस्थितीवर मात करीत येथील शिक्षकांची ९५ टक्के उपस्थिती असते. त्यांनी ९० टक्के गुणवत्ता कायम राखली आहे. शालेय परिसर निसर्गरम्य व सुंदर केला आहे. शाळेसभोवताल छायादार वृृक्ष, फुलझाडे व फळझाडे लावण्यात आली आहे. तेथे सांडपाण्यावार आधारित परसबाग फुलविण्यात आली. त्यातून पालेभाज्या व फळभाज्या पोषण आहारात वापरल्या जातात. १४ विद्यार्थी असलेल्या या शाळेत गांडूळखत प्रकल्पही राबविण्यात आला आहे.
प्रत्येक वर्ग हा ज्ञानरचनावादी असून विद्यार्थी ज्ञान वाचनातून अध्ययन करतात. याव्यतिरिक्त वर्गातील आरसा, कंगवा, नेलकटर, शौचालयाजवळ टॉवेल व साबणसुद्धा ठेवण्यात आले आहे. या शाळेत प्रभारी मुख्याध्यापक म्हणून विजय काळे, सहाय्यक शिक्षक म्हणून फिरोज खॉ पठाण परिश्रम घेत आहे. शाळेच्या या यशाबद्दल केंद्र प्रमुख एन.डब्ल्यू.गावंडे, शाळा समितीचे पदाधिकारी व गावकऱ्यांनी कौतुक केले. या शाळेचे तालुक्यातही कौतुक होत आहे. (वार्ताहर)