‘फेसबुक’पेक्षा जीवनाला ‘फेस’ करा

By Admin | Updated: November 29, 2014 02:17 IST2014-11-29T02:17:47+5:302014-11-29T02:17:47+5:30

आधुनिक तंत्रज्ञानाने तरूणाईच्या हाती मोबाईल आला. या मोबाईलने जगाशी संवाद सुरू झाला.

Make life 'Face' than 'Facebook' | ‘फेसबुक’पेक्षा जीवनाला ‘फेस’ करा

‘फेसबुक’पेक्षा जीवनाला ‘फेस’ करा

यवतमाळ : आधुनिक तंत्रज्ञानाने तरूणाईच्या हाती मोबाईल आला. या मोबाईलने जगाशी संवाद सुरू झाला. परंतु घरातील संवाद संपला. फेसबुक आणि वॉटस्अ‍ॅपच्या माध्यमातून खोटी प्रतिमा तयार होत आहे. त्यामुळे विविध समस्या निर्माण होत असून, फेसबुकमध्ये डोके खुपसून बसण्यापेक्षा जीवनाला फेस करा असे महाराष्ट्र भूषण डॉ. राणी बंग यांनी सांगितले.
यवतमाळ पब्लिक स्कूल पॅरेन्ट कौन्सीलच्यावतीने आयोजित जीवन शिक्षणावर आधारित ‘तारूण्यभान’ कार्यक्रमाच्या निमित्ताने यवतमाळात आल्या असता त्या ‘लोकमत’शी बोलत होत्या. वयात येताना तरूण मुला-मुलींमध्ये लैंगीकतेविषयी स्वाभाविक कुतुहल निर्माण होते. परंतु योग्य मार्गदर्शना अभावी आणि मित्रांच्या वाईट संगतीने मुले बिघडतात. भविष्यात त्यांचे मोठे नुकसान होऊ शकते. अशा मुला-मुलींना अचूक आणि शास्त्रीय माहिती डॉ. राणी बंग ‘तरूण्यभान’ कार्यक्रमाच्या माध्यमातून संपूर्ण राज्यभर देत आहेत. आतापर्यंत त्यांनी २८६ कार्यक्रमांच्या माध्यमातून २१ जिल्ह्यातील मुला-मुलींना मार्गदर्शन केले आहे.
डॉ. राणी बंग म्हणाल्या मी स्त्रीरोग तज्ञ असल्याने आपल्या शरीराबद्दल अनेकांचे कसे गैरसमज असतात हे जवळून पाहिले आहे. पतीला पत्नीचे आणि पत्नीला पतीच्या नेमक्या काय शारीरिक समस्या आहेत हे माहित नसते. किशोर वयात योग्य मार्गदर्शन मिळाले नाही की मग लैंगिकतेबद्दल आकर्षण निर्माण होते. आपल्याकडे लैंगिक शिक्षण म्हणजे अश्लिल असाच समज झाला आहे. परंतु लैंगिकता शिक्षण महत्वाचे आहे. समज-गैरसमज, भावना, विचार याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. परंतु आपल्याकडे लैंगिक शिक्षणाचा अभाव असल्याने कुमारी मातेसारखे प्रश्न समाजात निर्माण होतात. जळगाव कांड, निर्भयासारखे प्रकार पुढे येतात. विविध संघटना त्यावेळी आवाज काढतात परंतु त्याचा दूरगामी परिणाम होत नाही. कायदे करून प्रश्न सुटणार नाही. त्यासाठी प्रश्नाच्या मुळाशी जाणे गरजे आहे, आणि आम्ही आमच्या ‘तारूण्यभान’ कार्यक्रमाच्या माध्यमातून हाच प्रयत्न करीत असल्याचे त्यांनी सांगितले.
समाजात मोठ्या प्रमाणात प्रेमविवाह होत आहे. त्यापेक्षाही अधिक प्रमाणात घटस्फोट होतात. जोडीदाराची निवड आम्ही सहजपणे करतो. प्रेमविवाहात अ‍ॅडजेस्टमेंट शिकत नाही, नकार पचविण्याची ताकद नसते. क्षणिक आणि सिनेमातील प्रेमाला खरे प्रेम समजून बसतो. हा सर्व प्रकार संवाद हरवित चालल्याने वाढत आहे. आई-वडिल शेजारी, मित्र-मैत्रिणी यांच्यातील संवाद वाढविण्याची गरज आहे असे त्यांनी सांगितले. संवादाअभावी मुले व्यसनाधिन होतात, त्यातच आता तंत्रज्ञानाने भर घातली आहे. मोबाईलवर जगाशी संवाद साधतो परंतु घरात धड बोलत नाही. एका सर्वेक्षणानुसार मोबाईलचा अती वापर करणारे संवेदनहीन होत असल्याचे दिसून आले. मोबाईलमुळे संशयी प्रवृत्ती वाढत आहे. मुलांमध्ये चिडचिडेपणा येत आहे. त्यांच्यात तनाव दिसत आहे. अनेक मुले तर पॉर्न साईडही पाहतात, त्याचा विपरित परिणाम दिसून येतो. तंत्रज्ञानाचा वापर करताना तारतंत्र ठेवणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. मुलांतील चांगूलपणा बाहेर काढणे गरजेचे आहे. मुल अतिशय जबाबदार असतात त्यांच्यातील उर्जा बाहेर काढण्याचा प्रयत्न या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही करतो.
आपल्या ‘तारूण्यभान’ कार्यक्रमाविषयी बोलताना डॉ. राणी बंग म्हणाल्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून तरूणांना लैंगितेविषयी शास्त्रीय माहिती दिली जाते. वैज्ञानिक स्वरूपाची तीही मनोरंजनातून माहिती देत असतो. वाईट गोष्टी कोणत्या, प्रेम, आकर्षण म्हणजे काय, प्रजननअंग, आहार कसा असावा, लिंग निदान, गरोदरपणा याबद्दल मार्गदर्शन केले जाते. बेजबाबदार लैंगिकतेतून काय दुष्परिणाम होतात, यावर मार्गदर्शन या कार्यक्रमाच्या माध्यमातून केले जाते, असे त्या म्हणाल्या. संपूर्ण राज्यभर हा कार्यक्रम सुनंदा खोरगडे, ज्ञानेश्वर पाटील, राजेंद्र इसासरे यांच्या सहकार्याने गेल्या २० वर्षांपासून करीत असल्याचे डॉ. बंग यांनी सांगितले.
कार्यशाळेचे उद्घाटन
यवतमाळ पब्लिक स्कूल पॅरेन्ट कौन्सीलच्यावतीने महाराष्ट्र भूषण डॉ. राणी बंग यांच्या ‘तारूण्यभान’ या तीन दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन शुक्रवारी सकाळी १० वाजता स्वातंत्र्य संग्राम सेनानी जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या प्रतिमेला माल्यापर्ण आणि दीप प्रज्वलन करून झाले. उद्घाटन समारंभाला डॉ. राणी बंग, यवतमाळ पब्लिक स्कूल शाळा समितीचे अध्यक्ष किशोर दर्डा, प्राचार्य जेकब दास, प्राचार्य निहारिका प्रभूणे, पॅरेन्ट कौन्सीलच्या अध्यक्ष रेणू शिंदे, सहसचिव सुरूची खरे, संजना सोदी, कुंभलकर, चावरे उपस्थित होते. डॉ. राणी बंग आणि प्राचार्य जेकब दास यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमात डॉ. राणी बंग यांचा परिचय पॅरेन्ट कौन्सीलचे कोषाध्यक्ष मनोज जाधव यांनी करून दिला. प्रास्ताविक रेणू शिंदे यांनी केले. संचालन प्रवीण पाईकराव यांनी तर आभार मनीला सिंग यांनी मानले. यानंतर कार्यशाळेला प्रारंभ झाला.
(नगर प्रतिनिधी)

Web Title: Make life 'Face' than 'Facebook'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.