यवतमाळात २९ ला महामोर्चा
By Admin | Updated: September 28, 2016 00:26 IST2016-09-28T00:26:28+5:302016-09-28T00:26:28+5:30
बहुजन समाज पक्ष, अनुसूचित जाती-जमाती हक्क संरक्षण समितीच्या नेतृत्वात येत्या २९ सप्टेंबरला यवतमाळात महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.

यवतमाळात २९ ला महामोर्चा
बसपासह ३५ संघटना : अॅट्रॉसिटी कायद्यात बदलाची गरज नाही, विविध प्रमुख सात मागण्या
यवतमाळ : बहुजन समाज पक्ष, अनुसूचित जाती-जमाती हक्क संरक्षण समितीच्या नेतृत्वात येत्या २९ सप्टेंबरला यवतमाळात महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. हा मोर्चा कुणाहीविरूद्ध नसून आपल्या न्याय मागण्या प्रशासनाच्या लक्षात आणून देण्यासाठी असल्याचे येथील विश्रामगृहात मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत आयोजकांनी स्पष्ट केले.
या मोर्चाव्दारे २६ जानेवारी २0१५ च्या सुधारित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करावी, अनुसूचित जाती-जमातीकरिता असलेला अनुशेष त्वरित भरावा, त्यांना सरकारी नोकऱ्यांमधील पदोन्नतीत आरक्षण द्यावे, बोगस आदिवासींची चौकशी करून कठोर कारवाई करावी, मुस्लीम समाजाच्या आरक्षणाबद्दल रंगनाथन मिश्रा आयोगाच्या शिफारशींची त्वरित अंमलबजावणी करावी, तसेच सच्चर समितीच्या शिफारशी जशाच्या तशा लागू कराव्यात, मुस्लीम समाज अत्याचार प्रतिबंधक कायदा तयार करून लागू करावा आणि अनुसूचित जाती-जमातीच्या वसतगिृहांतील विद्यार्थ्यांना दर्जेदार सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, आदी मागण्या करण्यात येणार आहे.
हा मोर्चा कुणाच्याही विरूद्ध नसून प्रशासनाला समस्या लक्षात आणून देण्यासाठी आहे. देशात मुस्लीम, आदिवासी, दलितांवर अत्याचाराचे वातावरण निर्माण झाले असून ते निवळावे, असा हेतू आहे. हा मोर्चा शांतीपूर्वक होणार असून ३५ विविध संघटनांचा सहभाग राहणार असल्याचे बहुजन समाज पार्टीचे जिल्हाध्यक्ष तारीक लोखंडवाला, प्रदेश सचिव पंडित दिघाडे यांनी सांगितले. अॅट्रोसीटी कायद्यात बदलाची गरज नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. हा कायदा लागू झाल्यानंतर नागपुरात मनोरमा कांबळे हत्याकांड झाले. मात्र आरोपी निर्दोष सुटले. खैरलांजी प्रकरणात आरोपींना भादंविअंतर्गत अटक झाली. मात्र अॅट्रोसीटीमधून ते निर्दोष सुटले, असे अनेक प्रकरण झाल्याचे त्यांनी सांगितले. सामाजिक बांधीलकी जोपासून या मोर्चात सहकटुंब सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले.
पत्रकार परिषदेला बळीराम नेवारे, अजय घोडाम, प्रफुल गेडाम, संजय तरवरे, दिलीप नेहारे, बाळकृष्ण गेडाम, लक्ष्मण पाटील, दयानंद बनसोड, प्रफुल शंभरकर, धर्मपाल माने, काशिनाथ ब्राम्हणकर, बाबाराव मडावी, अजय शेंडे, शैलेश गाडेकर, कोडापे आदींची उपस्थिती होती. (शहर प्रतिनिधी)
मोर्चात सहभागी संघटना
आदिवासी अन्याय निवारण समिती, गोंड गोवारी सेवा मंडळ, गोंडवाना संग्राम परिषद, कास्ट्राईब कर्मचारी महासंघ, भारतीय बौद्ध महासभा, गोंडवाना गणतंत्र पार्टी, क्रांतिवीर शामादादा कोलाम समाज संघटना, आदिवासी परधान समाज संघटना, बंजारा क्रांती दल तथा राष्ट्रीय विमुक्त महासंघ, भीम टायगर सेना, आॅल इंडिया कौमी तंजीम, आदिवासी मुक्ती दल, राष्ट्रीय मातंग महासंघ, क्रांतिवीर शामादादा कोलाम सामाजिक संघटना, आदिवासी विद्यार्थी संघ, बिरसा ब्रिगेड, अखिल भारतीय आदिवासी विद्यार्थी परिषद, राष्ट्रीय रवीदास परिषद, गुरू रवीदास विचार मंच, बिरसा ट्रस्ट, अल्फा ओमेगा ख्रिश्चन महासंघ, आदिवासी गोवारी समाज संघटना, विदर्भ मातंग युवक संघटना, मांग गारोडी समाज जागृती मंच, मुस्लीम आरक्षण संघर्ष समिती, ओबीसी क्रांतीदल, तेली समाज महासंघ, भारतीय पिछडा समाज संघटना, अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस, दलित-मुस्लीम आदिवासी एकता महासंघ, अखिल भारतीय संवैधानिक हक्क परिषद, सम्राट अशोक ग्रुप, आदिवासी गोवारी समाज विकास कृती समिती, लोक स्वराज्य आंदोलन, कोलाम समाज युवक संघटना.