Maharashtra Election 2019 ; उमेदवारांचा दसरा, आमदारांची दिवाळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2019 06:00 AM2019-10-07T06:00:00+5:302019-10-07T06:00:11+5:30

अविनाश साबापुरे। लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : मतदारांच्या जीवनात अनन्यसाधारण महत्व असलेले दिवाळी, दसरा ऑक्टोबरमध्येच. तर मतदारांच्या आयुष्याला कलाटणी ...

Maharashtra Election 2019 ; Dussehra of candidates, Diwali of MLAs | Maharashtra Election 2019 ; उमेदवारांचा दसरा, आमदारांची दिवाळी

Maharashtra Election 2019 ; उमेदवारांचा दसरा, आमदारांची दिवाळी

googlenewsNext
ठळक मुद्देआज कुणाची माघार ? : विजयादशमीपूर्वीच प्रचाराच्या ‘सोन्या’ची खैरात, दिवाळीपूर्वीच ‘लक्ष्मीपूजना’ची शक्यता

अविनाश साबापुरे।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : मतदारांच्या जीवनात अनन्यसाधारण महत्व असलेले दिवाळी, दसरा ऑक्टोबरमध्येच. तर मतदारांच्या आयुष्याला कलाटणी देणारी विधानसभा निवडणूकही याच महिन्यात. जिल्ह्यातील सातही मतदारसंघासाठी शे-सव्वाशे इच्छुकांनी उमेदवारी दाखल केली आहे. दसऱ्याच्या पूर्वसंध्येला नेमके किती उमेदवार रिंगणात उरणार हे ठरणार आहे. तर दिवाळीच्या दोन दिवसाआधी सात आमदारांचा फैसला होणार आहे.
यवतमाळ, वणी, राळेगाव, आर्णी, पुसद, उमरखेड, दिग्रस या सातही मतदारसंघातील गावागावांत सध्या दसरा-दिवाळीपेक्षाही जास्त निवडणुकीची चर्चा आहे. दसरा आणि दिवाळीच्या धामधुमीतच २१ ऑक्टोबरला मतदान आहे. दसऱ्याच्या निमित्ताने लोक वैर विसरुन एकमेकांची गळाभेट घेतात. मात्र यंदा ऐन दसऱ्यातही भाजप-सेनेच्या युतीचा एकोपा टिकणार की नाही, मित्र पक्षाच्याच उमेदवारापुढे बंडखोरीचे आव्हान संकट निर्माण करेल का यावर खलबते झडत आहे. तर काँग्रेस-राष्ट्रवादीच्या मैत्रीचा खरेपणाही कितपत खरा असावा याची चर्चा सामान्य मतदारात रंगत आहे.
दसऱ्याच्या आदल्यादिवशी उमेदवारांची अंतिम यादी जाहीर होईल. दसऱ्याच्या दिवशी एकमेकांना प्रेमाने भेटून सर्वसामान्य मतदार दुसऱ्या दिवशी दैनंदिन जीवनात व्यस्त होणार असले तरी उमेदवारांना मात्र दसऱ्यापासून सुरू केलेला आपुलकीचा ‘व्यवहार’ दिवाळीपर्यंत दररोज कायम ठेवावा लागणार आहे. आश्वासनांचे सोने वाटतच रहावे लागणार आहे. यात मतदार ज्यांना मतांचे ‘रिटर्न गिफ्ट’ देईल, तेच आमदार होणार आहे. दरम्यान दिवाळीचा दिवस उजाडण्यापूर्वीच अनेक गावांमध्ये ‘लक्ष्मीपूजन’ होण्याचीही शक्यता आहे. आता दसऱ्यापासून प्रचाराचे सोने वाटल्यानंतर दिवाळीत कुणाचे फटाके फुटणार आणि कुणाचा बॅन्ड वाजणार याचा फैसला २४ ऑक्टोबरच्या मतमोजणीतच होणार आहे.

उमेदवारांमध्ये डॉक्टर, वकील, शिक्षकांचा भरणा
जिल्ह्यातील सातही विधानसभा मतदारसंघातून यावेळी सव्वाशे इच्छुकांनी नामांकन भरले आहे. यात व्यवसायाने डॉक्टर, वकील, शिक्षक, प्राध्यापक असलेल्या उमेदवारांची मोठी संख्या आहे. राजकारणात अल्पशिक्षित लोकांचाच भरणा असल्याची सतत ओरड होत असते. मात्र यावेळेसच्या निवडणुकीत उच्चशिक्षित उमेदवारांनी हा समज खोटा ठरविला आहे. विशेष म्हणजे हे उच्चशिक्षित उमेदवारही अपक्ष नसून विविध राजकीय पक्षांनी उभे केलेले आहे, ही दिलासादायक बाब. राळेगाव मतदारसंघात डॉ. अशोक उईके हे एमएस्सी, पीएचडी झालेले आहेत. तर प्रा. वसंत पुरके हेही एमए, एचडीएड आहेत. याच मतदारसंघात माधव कोहळे बीएड, डीएड आहेत. यवतमाळ मतदारसंघातही अ‍ॅड. अमोल बोरखडे बीएस्सी, एलएलबी, मदन येरावार डीफार्म आहेत. अनिल उर्फ बाळासाहेब मांगुळकर, संतोष ढवळे, योगेश पारवेकर बारावी उत्तीर्ण आहेत. या मतदारसंघात अशोक काळमोरे हे सर्वात कमी म्हणजे तिसरीपर्यंत शिक्षण झालेले उमेदवार आहे. वणी मतदारसंघात एमबीबीएस, डीजीओ, सीपीएस झालेले डॉ. महेंद्र लोढा, बीएस्सी बीएड झालेले विश्वास नांदेकर हे उच्चशिक्षित उमेदवार आहेत. तर वामनराव कासावार, संजीवरेड्डी बोदकूरवार यांनी बीए केले आहे. राजू उंबरकर यांचे शिक्षण दहावीपर्यंत आहे. दिग्रस मतदारसंघात एमकॉम, एमफील, बीएड, पीएचडी झालेले अजय दुबे यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे. येथे संजय राठोड बीकॉम, बीपीएड तर संजय देशमुख बीकॉम, मो.तारिक मो. सामी अकरावीपर्यंत शिकलेले आहे. आर्णी विधानसभा मतदारसंघात अ‍ॅड. शिवाजीराव मोघे एमकॉम, एलएलबी तर डॉ. संदीप धुर्वे एमबीबीएस, प्रा. राजू तोडसाम एमए, बीएड झालेले आहेत. शिवाय अपक्ष उमेदवार नयना ठाकूर यांनी बीएबीएड, बीकॉम पूर्ण केले असून एलएलबीच्या तिसºया वर्षाचे त्यांचे शिक्षण सुरू आहे. पुसद मतदारसंघातही इंद्रनील नाईक, नीलय नाईक एलएलबीपर्यंत शिकलेले आहे. तर सविता अधव यांनीही एमए, एमएड केले आहे. उमरखेड मतदारसंघात हरिश पाचकोरे एमए, एमफील, बीएड तर डॉ. विश्वनाथ विणकरे एमबीबीएस, एमएस, डॉ. प्रमोद दुथडे एमडीपर्यंतचे (मेडिसीन) शिक्षण घेणारे उच्चशिक्षित उमेदवार आहे. नामदेव ससाने यांनी एमए केले असून विजयराव खडसे यांचे शिक्षण दहावीपर्यंत झालेले आहे.
एकीकडे प्रमुख उमेदवारांमध्ये अनेक उच्चशिक्षितांचा भरणा असला तरी उर्वरित जवळपास शंभर उमेदवारांमध्ये केवळ पदवीपर्यंत शिक्षण झालेल्यांची मोठी संख्या आहे. त्यातही अनेक जण दहावी-बारावीपर्यंतच शिक्षण घेऊन निवडणुकीच्या मैदानात उतरले आहे. आश्चर्य म्हणजे अनेकांनी दहावीपर्यंतही मजल मारलेली नाही. तिसरी, सातवी, नववी उत्तीर्ण होऊन सार्वजनिक जीवनात सक्रिय झालेल्या उमेदवारांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे.

Web Title: Maharashtra Election 2019 ; Dussehra of candidates, Diwali of MLAs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.