कर्मचाऱ्यांचा मुख्यालयाला खो
By Admin | Updated: January 6, 2015 23:10 IST2015-01-06T23:10:04+5:302015-01-06T23:10:04+5:30
वणी तालुक्यातील शासकीय, निमशासकीय कर्मचारी, ग्रामसेवक, शिक्षक, तलाठी, आरोग्य कर्मचाऱ्यांसह विविध विभागांचे कर्मचारी मुख्यालयी राहात नाहीत. ते तालुक्याचा ठिकाणी

कर्मचाऱ्यांचा मुख्यालयाला खो
नांदेपेरा : वणी तालुक्यातील शासकीय, निमशासकीय कर्मचारी, ग्रामसेवक, शिक्षक, तलाठी, आरोग्य कर्मचाऱ्यांसह विविध विभागांचे कर्मचारी मुख्यालयी राहात नाहीत. ते तालुक्याचा ठिकाणी राहून कार्यालयाचा कारभार हाकत आहे. परिणामी जनतेची कामे खोळंबली आहेत. ग्रामस्थांना कामासाठी कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा करावी लागत आहे. एवढेच नव्हे तर त्यांच्या शोधासाठी आर्थिक खर्च व पायपीट करावी लागत आहे.
शासनाने सर्व कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहण्याचे निर्देश दिले आहेत. मुख्यालयी राहून त्यांनी जनतेची कामे करावीत, असा हेतू आहे. मात्र या हेतूलाच आता तिलांजली दिली जात आहे. अनेक कर्मचारी मुख्यालयी भेटणे दुरापास्त झाले आहेत. शिक्षक आणि तलाठी यांनी तर मुख्यालयाला खो दिला आहे. ग्रामीण भागातील शाळांवर कार्यरत बहुतांश शिक्षक तालुक्याच्या ठिकाणाहून ये-जा करतात. शाळेत १० वाजता पोहोचणे व सायंकाळी ५ वाजता परत जाण्यासाठी त्यांची घाई सुरू असते. सायंकाळी ५ वाजताच शिक्षकांना घराची ओढ लागते. कधी एकदाचे ५ वाजतात, याची त्यांना प्रतीक्षा असते. यात महिला कर्मचारी तर सतत घडाळ्याकडेच बघत बसतात. त्यामुळे घराची ओढ लागलेल्या या शिक्षकांकडून उत्कृष्ठ ज्ञानार्जनाच्या कार्याची अपेक्षा पालक करूच शकत नाहीत. संबंधित गावात घर मिळत नसल्याची ओरड त्यांच्याकडून होते. बहुधा ती खरीही असावी. मात्र अनेक गावांमध्ये सहज घर मिळू शकते. तरीही तेथे कुणी राहात नाहीत. मात्र मुख्यालयी राहात असल्याचे खोटे दाखले ग्रामपंचायत व शिक्षण समितीचा पदाधिकाऱ्यांना हाताशी पकडून दिले जाते. या दाखल्यावरूनच त्याचे वेतन निघते.
तलाठीसुद्धा मुख्यालयी राहात नाही. एका तलाठ्याकडे चार ते पाच गावांचा कारभार असतो. त्यामुळे एका गावातील ग्रामस्थाने विचारले, तर ते दुसऱ्या गावात असल्याचे सांगतात. दुसऱ्या गावातील ग्रामस्थाने विचारले, तर तिसऱ्या आणि तिसऱ्याने विचारले तर चौथ्या गावात असल्याचे ठोकून देतात. प्रत्यक्षात बहुतांश तलाठी यापैकी कोणत्याच गावात नसतात. ते तालुक्याच्या ठिकाणी ठाण मांडून दिसतात. त्यामुळे ग्रामस्थांना नाहक तालका स्थळी पोहोचून कामे करवून घ्यावी लागतात. यात त्यांचा वेळ, पैसा आणि श्रम वाया जातात.
वणी तालुक्यात शासनाने कर्मचाऱ््यांना नक्षल भत्ता लागू केला आहे. या सोभतच कर्मचाऱ्यांना घरभाडे भत्ताही मिळतो. शासनाच्या डोळ्यात धूळफेक करून हे भत्ते पदरात पाडून घेतले जातात. हा सर्व प्रकार वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती आहे. मात्र तरीदेखील कर्मचाऱ्यांचा घरभाडे अथवा व नक्षल भत्ता कपात करण्याची तसदी ते घेत नाहीत. कारण कर्मचारी संघटना बळकट असतात. त्यांचा रोष ओढवून घेणे त्यांना कठीण जाते.
शासकीय सेवेत रूजू होताना मुख्यालयी राहून काम करण्याची अट असते. त्यानुसार कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहणे अनिवार्य असताना केवळ वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने अनागोंदी कारभार सुरू आहे. या कर्मचाऱ्यांना पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई का केली जात नाही, हासुद्धा प्रश्न आहे. ग्रामीण भागातील ग्रामपंचायतीत जनता व शासनाचा दुवा म्हणून काम करणाऱ्या ग्रामसेवकांनी तर कहर केला आहे. दुपारी १२ वाजता गावात पोहोचणे, ३ वाजता परत जाणे, असे प्रकार सर्रास सुरू आहे. बहुतांश ग्रामसेवकही मुख्यालयी राहात नाही. त्यामुळे त्यांना गाव, विकास, गावाची कामे जनतेच्या समस्यांशी काहीही देणे-घेणे असल्याचे दिसत नाही. (वार्ताहर)