लोकसभेतील पराभवाचेही मोघेंकडून समर्थन
By Admin | Updated: June 24, 2014 00:04 IST2014-06-24T00:04:52+5:302014-06-24T00:04:52+5:30
लोकसभा निवडणुकीत काँग्रेस उमेदवारांच्या झालेल्या पराभवाबाबत एकीकडे दिल्लीत पक्षश्रेष्ठी चिंतन करणार असले तरी यवतमाळ-वाशिममधील उमेदवार शिवाजीराव मोघे यांनी आपल्या कमी मतांनी झालेल्या

लोकसभेतील पराभवाचेही मोघेंकडून समर्थन
म्हणे, लोक लाखोंनी पडले, मी तर केवळ ९३ हजाराने
राजेश निस्ताने - यवतमाळ
लोकसभा निवडणुकीत काँग्रेस उमेदवारांच्या झालेल्या पराभवाबाबत एकीकडे दिल्लीत पक्षश्रेष्ठी चिंतन करणार असले तरी यवतमाळ-वाशिममधील उमेदवार शिवाजीराव मोघे यांनी आपल्या कमी मतांनी झालेल्या पराभवाचेही जोरदार समर्थन चालविले आहे.
यवतमाळच नव्हे तर संपूर्ण राज्यात काँग्रेसच्या झालेल्या पराभवाची कारणमिमांसा करण्यासाठी शनिवारी २८ ला दिल्लीत राज्यातील प्रमुख नेत्यांची बैठक बोलविली गेली. तेथे पराभवामागील कारणांचा शोध घेतला जात असताना यवतमाळात मात्र पराभूत उमेदवार शिवाजीराव मोघे आपल्या पराभवाचेही समर्थन करताना दिसत आहेत. पराभवाचे फारसे शल्य त्यांच्या चेहऱ्यावर दिसत नाही. मात्र त्याच वेळी ते मी केवळ ९३ हजाराने तर पडलो, असे समर्थन करताना दिसतात.
मोघेंच्या खासगीतील युक्तीवादानुसार, राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादीच्या दिग्गज उमेदवारांनी निवडणुकीत कोट्यवधी रुपये खर्च केले. त्यानंतरही त्यांना दोन लाख, तीन लाख, चार लाख अशा प्रचंड मतांनी पराभव पत्करावा लागला. त्यांचा परंपरागत मतदारसंघ, पाच वर्षांपासूनची पकड, परिश्रम, अनुभव असूनही ते पराभूत झाले. त्या तुलनेत आपला मतांचा फरक केवळ ९३ हजाराचा आहे, शिवाय आपल्यासाठी मतदारसंघ नवा होता, प्रचाराला वेळही केवळ १५ दिवसांचाच होता. त्यामुळे ९३ हजार मतांनी झालेला पराभव फार वाईट नाही. १५ दिवसांच्या परिश्रमावर तब्बल तीन लाख ८४ हजार मते मिळू शकतात याचेच मोघे यांना ‘अप्रुफ’ वाटत आहे. पराभव कुणामुळे झाला हे शोधण्याऐवजी स्वत: मोघेंकडूनच पराभवाचे समर्थन केले जात आहे. मोघेंच्या पराभवाला नियोजनाचा अभाव, निष्ठावंत कार्यकर्त्यांना दूर ठेवणे, संधीसाधू नेतेकम कंत्राटदारांना महत्वाची जबाबदारी देणे, विरोधी पक्षातील इतिहासजमा चेहऱ्यांना आर्थिक पाठबळ देणे या बाबी प्रकर्षाने कारणीभूत ठरल्या. मोघेंच्या प्रचारासाठी फिरणारे काँग्रेसचे सामान्य कार्यकर्ते उपाशी आणि ‘आयतोबा’ म्हणून ओळखले जाणारे तथाकथीत नेते तुपाशी असे विसंगत चित्र ठिकठिकाणी पाहायला मिळत होते. पैशाचा अमाप आणि चुकीच्या पद्धतीने वापर, विरोधी पक्षातील असंतुष्टांना खूश करणे तसेच पक्षातील नेत्यांना अॅडजेस्ट करून कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडण्याचा निर्णयच काँग्रेसच्या अंगलट आला. पैशाचा वारेमाप खर्च यालाच नियोजन समजले गेल्याने मोघेंना निवडणुकीत फटका बसला. एकूनच ‘सनदी’ प्रचार तंत्राने मोघेंचा घात केल्याचा सुर त्यांच्याच निकटवर्तीयांकडून ऐकायला मिळत आहे. (जिल्हा प्रतिनिधी)