फुलसावंगीत घडले सामाजिक सौहार्दाचे दर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2017 21:55 IST2017-09-08T21:55:15+5:302017-09-08T21:55:30+5:30
सर्वधर्म समभाव आणि धार्मिक एकात्मतेसाठी प्रसिद्ध महागाव तालुक्यातील फुलसावंगीत बकरी ईद आणि गणेश विसर्जन मिरवणुकीत सामाजिक सौहार्दाचे दर्शन घडले.

फुलसावंगीत घडले सामाजिक सौहार्दाचे दर्शन
विवेक पांढरे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
फुलसावंगी : सर्वधर्म समभाव आणि धार्मिक एकात्मतेसाठी प्रसिद्ध महागाव तालुक्यातील फुलसावंगीत बकरी ईद आणि गणेश विसर्जन मिरवणुकीत सामाजिक सौहार्दाचे दर्शन घडले. बकरी ईदला गणेश मंडळांनी साऊंड सिस्टीम पाच तास बंद ठेवून मुस्लीम बांधवांचे स्वागत केले, तर गणेश विसर्जन मिरवणुकीत गणेशभक्तांचा मुस्लीम बांधवांनी सत्कार केला.
महागाव तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ असलेली फुलसावंगी या ना त्या कारणांनी चर्चेत असते. परंतु गावातील सर्वधर्म समभावाला तडा गेला नाही. सर्वधर्मीय नागरिक शांततेने आणि गुण्यागोविंदाने नांदतात. एकमेकांच्या सुख-दु:खात धावून येतात. गत आठवड्यात पार पडलेल्या बकरी ईदच्या पर्वावर एकात्मतेचे दर्शन घडले. ईदची नमाज अदा होईपर्यंत सर्व गणेश मंडळांनी राऊंड सिस्टीम तब्बल पाच तास बंद ठेवले. तसेच नमाज अदा करून येणाºया मुस्लीम बांधवांना शुभेच्छा देऊन त्यांचे स्वागत केले.
याच एकात्मतेला आणखी बळकटी मिळाली ती विसर्जनाच्या मिरवणुकीत. फुलसावंगीतील मुस्लीम बांधवांनी स्वातंत्र्य सेनानी अण्णासाहेब नाईक चौकात मंडप उभारला. सर्व गणेश मंडळांच्या अध्यक्षांचा गावातील मुस्लीम समाजाच्यावतीने सत्कार केला. सर्वधर्मीय बंधुत्वामुळे फुलसावंगीत एकात्मतेची झालर लागली. भविष्यात फुलसावंगी गावासाठी आणि दोन्ही समाजांच्या तरुण पिढीसाठी ही पायाभरणीच ठरली.
या प्रसंगी विजयराव महाजन, उपसरपंच अमर दळवे, नासीरखाँ बशीरखाँ, समशेरखाँ, बाबूखाँ, पोलीस पाटील राजेश नाईक, इकबालभाई, शम्मी खान, बंटी पठाण, याकूब लाला, हमीदभाई, सै.नासीर, इबाद खान, आरिफ लाला, गणपत बोंढारकर, महागावचे ठाणेदार करीम बेग मिर्झा, एपीआय कैलास भगत, गुणवंत गोटे, जमादार माणिक पवार, नायब तहसीलदार जी.एन. कदम, मंडळ अधिकारी आर.डब्ल्यू. पुरी, तलाठी जी.एच. कलाने यांच्यासह गावकरी उपस्थित होते.
डीजे सिस्टीमला बगल
शांतता कमिटीच्या बैठकीत पोलिसांनी डीजे वाजवून नये व शांततेत गणेश विसर्जन करून पोलीस प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले होते. त्याला प्रतिसाद देत येथील आठ गणेश मंडळांनी डीजे साऊंड सिस्टीमला बगल दिली. ढोलताशांच्या गजरात गणेशाचे विसर्जन केले. त्यामुळे सहायक पोलीस निरीक्षक कैलास भगत यांनी सर्व गणेश मंडळांचे स्वागत केले.