शेतकऱ्यांची पेरणीची लगबग

By Admin | Updated: June 12, 2015 02:10 IST2015-06-12T02:10:24+5:302015-06-12T02:10:24+5:30

पावसाचे संकेत प्राप्त होताच आता खरिपाची लगबग सुरू झाली आहे. रोहिणी नक्षत्राने ४ जूनला जोरदार हजेरी लावली होती.

Long time for farmers' sowing | शेतकऱ्यांची पेरणीची लगबग

शेतकऱ्यांची पेरणीची लगबग

पावसाची प्रतीक्षा : बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्यांची धावपळ, मृगधारा कोसळल्या
वणी : पावसाचे संकेत प्राप्त होताच आता खरिपाची लगबग सुरू झाली आहे. रोहिणी नक्षत्राने ४ जूनला जोरदार हजेरी लावली होती. त्यानंतर बुधवारी मृगधारा कोसळल्याने शेतकऱ्यांनी पेरणीपूर्व शेती कामांना चांगलाच वेग दिला आहे. बियाणे खरेदीसाठी आता शेतकरी कृषी केंद्रात गर्दी करताना दिसत आहे.
वणी तालुक्यात एकूण १६२ गावांमध्ये ९२ हजार ३८५ हेक्टर क्षेत्र आहे. त्यापैकी ६२ हजार २६८ हेक्टर क्षेत्र खरिपाच्या लागवडीयोग्य आहे. यावर्षी त्यातील ४८ हजार ६३ हेक्टरवर कपाशीची पेरणी होण्याची शक्यता आहे. मागीलवर्षी ४२ हजार ३३८ हेक्टरवर कपाशीची पेरणी झाली होती. यावर्षी त्यात वाढ होण्याची शक्यता आहे. मात्र सोयाबिनच्या पेरणी यावर्षी घट होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. यावर्षी सहा हजार ५८० हेक्टरवर सोयाबीन पेरणी होण्याची शक्यता आहे.
मागीलवर्षी तालुक्यात ४८ हजार हेक्टरवर खरिपाची पेरणी झाली होती. मात्र पावसाअभावी त्यातील २८ हजार ९३३ हेक्टरवर शेतकऱ्यांना दुबार-तिबार पेरणी करावी लागली होती. मागीलवर्षी मृग नक्षत्रापासून पावसाने तब्बल महिनाभर दडी मारली होती. त्यामुळे शेतकरी संकटात सापडले होते. त्यांना दुबार आणि तिबार पेरणी करावी लागली होती. त्यामुळे आताही शेतकरी धास्तावूनच आहे. पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणी न करण्याचा निणर्याप्रत ते आले आहेत. मागीलवर्षी तालुक्यात एकूण ४१ हजार ४९४ हेक्टरवर कपाशी, सात हजार ५९ हेक्टरवर सोयाबीन, पाच हजार ४४६ हेक्टरवर तूर, तर ५७८ हेक्टरवर ज्वारीची पेरणी झाली होती. यावर्षी सोयाबिनची पेरणी एक हजार हेक्टरने कमी होणार असल्याचे यावरून दिसून येते. तालुक्यातील बहुतांश शेती कोरडवाहू आहे. केवळ १७ टक्केच शेती सिंचनाखाली आहे. ११ हजार हेक्टर क्षेत्रच ओलिताखाली आहे.
आता पावसाची चाहूल लागल्याने शेतकरी पेरणीसाठी धावपळ करीत आहे. धारवडणी जवळपास पूर्णत्वास गेली आहे. आता पाऊस आल्यास कपाशीच्या पेरणीसाठी ‘सारे’ फाडण्यासाठी शेतकरी तयारीत आहे.
एकदाचा चांगला पाऊस झाल्यास ‘सारे’ फाडून शेतकरी कपाशीची पेरणी करण्यासाठी आतुर झाले आहे. मात्र ७0 मीलीमीटर पाऊस झाल्याशिवाय पेरणी करणे अंगलट येण्याची शक्यता असल्याचा इशारा कृषी विभागाने दिला आहे. दरम्यान गुरूवारी सायंकाळी जोरदार पावसाने वणीत हजेरी लावली. (कार्यालय प्रतिनिधी)

वणी तालुक्यात ३२ कोटींची उलाढाल
४वणी तालुक्यात २६ हजारांच्यावर शेतकरी आहेत. खरिपात बियाणे, किटकनाशके, रासायनिक खतांची खरेदी करावी लागते. त्यासाठी तालुक्यात जवळपास खरीप हंगामात ३0 ते ३२ कोटी रूपयांची दरवर्षी उलाढाल होते. मागीलवर्षीच्या अल्पवृष्टीमुळे आता शेतकऱ्यांजवळ पैसाच नाही. तरीही बँक तथा खासगी कर्ज घेऊन अनेक शेतकरी शेती उभी करताना दिसत आहे. मात्र पावसाने निराशा केल्यास यावर्षी शेतकरी कोलमडून पडण्याची शक्यता आहे. दोन वर्षांपूर्वी अतिव्ष्टी झाली अन् मागीलवर्षी कोरडा दुष्काळ पडला. त्यामुळे हे तिसरे वर्ष कसे जाणार, अशी चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे.

बियाण्याचे दर झाले कमी
४यावर्षी शासनाने काही जातीच्या बियाण्यांचे दर नुकतेच कमी केले आहेत. संबंधित बियाण्याच्या पिशवीवर जास्तीत जास्त किंमत (एमआरपी) लिहिलेली असते. त्यापेक्षा आता हे बियाणे १00 रूपयांनी कमी दरात मिळणार आहे. त्यामुळे अनेक लहान शेतकऱ्यांना थोडा दिलासा मिळाला आहे. तथापि डोक्यावरील कर्जामुळे बियाण्यांचे दर कमी होऊनही टांगती ललवार कायमच आहे. यावर्षी पावसाने दगा दिल्यास मात्र जगाचा पोशिंदाच उपाशी राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Web Title: Long time for farmers' sowing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.