नेताजी चौक नाल्यात जिवंत अर्भक
By Admin | Updated: January 8, 2015 23:02 IST2015-01-08T23:02:08+5:302015-01-08T23:02:08+5:30
शहराच्या अत्यंत वर्दळीच्या नेताजी चौक परिसरातील नाल्यात गुरुवारी पहाटे एक दिवसाचे जिवंत अर्भक आढळून आले. एका महिलेच्या सतर्कतेने चिमुकल्याला जीवदान मिळाले.

नेताजी चौक नाल्यात जिवंत अर्भक
यवतमाळ : शहराच्या अत्यंत वर्दळीच्या नेताजी चौक परिसरातील नाल्यात गुरुवारी पहाटे एक दिवसाचे जिवंत अर्भक आढळून आले. एका महिलेच्या सतर्कतेने चिमुकल्याला जीवदान मिळाले. कडाक्याच्या थंडीतही तोंडात बोळा कोंबलेला चिमुकला जीवंत आढळल्याने सर्वच जण थक्क झाले.
यवतमाळ शहरातील नेताजी चौक परिसरातून एक नाला वाहतो. या नाल्याच्या तीरावर एक कचरा कुंडी आहे. या कचरा कुंडीत आणि लगत हॉटेलातील केरकचरा, शिळे अन्न टाकले जाते. गुरुवारी सकाळी एक महिला त्या ठिकाणी गेली असता एक अर्भक तिला दिसून आले. तिने आरडाओरडा केली असता परिसरातील नागरिक धावून आले. पाहतात तर काय तो चिमुकला जीवंत होता. त्याच्या तोंडात बोळा कोंबलेला होता. एवढेच नाही तर या अर्भकाच्या शेजारी एक मेलेला कुत्राही पडून होता. तसेच हॉटेलमधील फेकलेले शिळे अन्नही त्याच्या अंगावर दिसत होते. अशा परिस्थितीत असलेल्या या बालकाला स्वच्छ करून नागरिकांनी पोलीस ठाण्यात नेले. पोलिसांनी त्या बालकाला रुग्णालयात नेण्याचा सल्ला दिला. पुरुष जातीचे असलेले हे बालक सध्या वैद्यकीय महाविद्यालयात उपचार घेत असून त्याची प्रकृती ठणठणीत असल्याचे सांगण्यात आले. (स्थानिक प्रतिनिधी)